
आता मॉन्सूनने देशात प्रवेश केला आहे. मॉन्सून तळकोकणात दाखल झाला असून लवकरच तो राज्य व्यापणार आहे. मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेची उष्णतेपासून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. मॉन्सूनच्या काळातही देशात अनेक ठिकाणी उष्णता जाणवणार आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.
याबाबत केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, १९७९ ते २०२१ या काळात, उष्णता मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने वाढत आहे. जागतिक हवामान बदलाच हिंदुस्थानातील अधिक भागांवर लक्षणीय परिणाम होत आहे. अत्यधिक उष्णता आणि आर्द्रता असल्यामुळे शरीराला जास्त घाम येतो. मात्र, उष्णता एवढी प्रचंड असते की शरीर लवकर थंड होत नाही, त्यामुळे उकाडा आणि उष्णता असह्य होते.
एका अभ्यासानुसार २ अंश सेल्सिअस जागतिक तापमानवाढ झाल्यास हिंदुस्थानात मान्सूनचा हंगाम लांबतो आणि उष्णता आणि आर्द्रता वाढते. त्यामुळे उकाडा असह्य होतो. ‘अमेरिकन जिओफिजिकल युनियन (AGU) ॲडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार, हवामानात उष्णता वाढत असल्याने पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबरदरम्यान उकाड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता असते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गांधीनगर आणि अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड व पर्ड्यू विद्यापीठांमधील संशोधकांनी म्हटले आहे की, उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये दीर्घकाळ टिकणारी उष्णता, दाट लोकवस्तीच्या आणि संवेदनशील प्रदेशांमध्ये सार्वजनिक आरोग्य, श्रम उत्पादकता आणि हवामान बदलांना तोंड देण्याच्या क्षमतेसाठी गंभीर आव्हाने निर्माण करू शकतो. उष्णतेत सतत होणारा वाढ मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, ज्यामुळे उष्णतेशी संबंधित आजार, अवयव निकामी होणे आणि मृत्यू ओढवू शकतो.
या उन्हाळ्यात सर्वाधीक उष्णता जाणवली आहे. त्यामुळे देशाच्या आठ टक्के भागावर परिणाम झाला आणि त्याचा वार्षिक उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूदराशी अधिक घनिष्ठ संबंध आढळला. मॉन्सूनच्या हंगामात केवळ एक टक्का भागावर परिणाम झाल्याचे आढळले.
प्रामुख्याने उष्ण-दमट परिस्थितीतीमुळे मान्सूनचा हंगाम उष्णता वाढवणार ठरू शकतो. हवामान बदलामुळे त्यात वेगाने बदल होत आहेत. औद्योगिक-पूर्व काळाच्या तुलनेत २ अंश सेल्सिअस तापमानवाढ झाली आहे. त्याचा देशाच्या जवळपास उन्हाळ्याच्या हंगामाइतक्याच क्षेत्रावर परिणाम होईल. त्यामुळे उन्हाळ्यात ६० टक्के आणि मान्सूनच्या हंगामात ५३ टक्के उष्णता जाणवण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या तापमानवाढीमुळे प्रभावित होणारी एकूण लोकसंख्या ०.८ ते १.२ अब्ज दरम्यान असू शकते, असा अंदाज या टीमने वर्तवला आहे. देशाच्या इंडो-गंगेच्या मैदानी प्रदेशात आणि किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त उकाडा जाणवतो. यामागे उच्च तापमान आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनपूर्व वाऱ्यांमुळे होणारी आर्द्रतेची अंतर्गत वाहतूक, यांसारख्या इतर घटकांचा संभाव्य परिणाम असू शकतो.
संशोधकांना असे आढळले की मान्सूनच्या हंगामात प्रामुख्याने ३५ अंश सेल्सिअस ते ३८ अंश सेल्सिअस या मर्यादित तापमान श्रेणीत दमट आणि जास्त उष्णता जाणवते. देशाच्या वायव्य भागातील पंजाब राज्यात पावसाळ्यात असह्य उष्णतेचा ताण (uncompensable heat stress) निर्माण झाला आहे, असे या टीमने म्हटले आहे. पावसाळ्यात जास्त आर्द्रता असणे आणि विशेषतः पावसाळ्यातील विश्रांतीच्या काळात हवेचे तापमान मध्यम असल्याने, तीव्र उष्णतेचा ताण निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते, असे त्यांनी म्हटले आहे.




























































