महाभारतातील ज्येष्ठांचे विचारमंथन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षितीज झारापकर

‘आरण्यक’. रत्नाकर मतकरींचं अजून एक कसदार नाटक. महाभारतातील संहारानंतर सारे ज्येष्ठ नातेसबंधांचा अर्थ लावू पाहतात.

एक संपूर्ण नाटक लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हे. हल्ली तर खूप छोटा विचार घेऊन तो कलाकारांच्या मदतीने फुलवण्याकडे जास्त कल दिसतो. पण नाटकाचा आशय दोन अडीच तासांच्या साचेबद्ध खेळात सादर करणारे लेखक खरं तर आधीच्या पिढीतले. कानिटकर, शिरवाडकर, कालेलकर ही नावं आजही मराठी नाटय़ वर्तुळात अत्यंत अदबीने आणि आदराने घेतली जातात. त्या पिढीतल्या लेखकांचं भाषाप्रभुत्व अचाट होतं. लेखकाच्या शब्दांप्रमाणेच नाटक करावं असं नटांना वाटावं असा तो काळ होता. नटाने पदरचं वाक्य नाटकात घेणं हा गुन्हा मानला जायचा. नाटककारांच्या पल्लेदार वाक्यांवर कितीतरी मातब्बर कलाकारांची करीयर घडली आहेत. मग कालांतराने समाजाची भाषा बदलली. पल्लेदार संवादांपेक्षा बोली भाषेतल्या वाक्यांना महत्त्व प्राप्त होऊ लागलं. मराठी नाटककारांच्या नव्या पिढीने हा बदल आत्मसात केला. पल्लेदार संवादांच्या जागी आता शाब्दिक पंच आणि कोटय़ा नटांचं करीयर घडवू लागल्या. त्यामुळेच तुटपुंजा आशयाची दोनअंकी नाटकं होऊ लागली. फुल्ल लेंथ आशयघन नाटकं आज येतच नाहीत असं नाही, पण विरळाच. आधीच्या पिढीतल्या शब्दप्रभू नाटककारांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काहीजण आजही सुदैवाने कार्यरत आहेत. ज्यांना ‘द लास्ट ऑफ द मोहिकन्स’ म्हणता येईल त्यापैकी एक देदीप्यमान नाव आहे रत्नाकर मतकरी.

रत्नाकर मतकरी हे नाव खरं तर कधीच पडद्याआड गेलं नाही. याचं कारण त्यांचा प्रेक्षकवर्ग नेहमीच त्यांच्यापेक्षा पंधरा ते वीस वर्षांनी तरुण होता. बालनाटय़ांमधून मतकरींनी आपले प्रेक्षक जोडायला सुरुवात केली आणि गूढकथांमधून त्यांनी तो वाढवत नेला. यामुळेच रत्नाकर मतकरी यांचा म्हणून जो प्रेक्षक आहे तो आजही मराठी नाटकाचा मूलभूत प्रेक्षक आहे. हे  हेरूनच ‘झी’ समूहाने राहुल भंडारे आणि अद्वैत थिएटर्सबरोबर रत्नाकर मतकरी यांचं एक वेगळं नाटक दसऱयाच्या मुहूर्तावर सुरू केलं– ‘आरण्यक’.

‘आरण्यक’ हे महाभारतकालीन कथानक. महाभारताचं युद्ध संपलं. आता उरलेल्या कुरुवंशीयांचं हे नाटक. त्यातही धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदूर यांचं. उद्ध्वस्त झालेले हे जीव राजमहाल सोडून वानप्रस्थाश्रमाला अरण्यात जातात यावर बेतलेलं कथानक. त्यात युधिष्ठर आणि युयुत्सूदेखील आहेत आणि एक सेवक. ‘आरण्यक’ हे यांच्या आपसातल्या संबंधावर भाष्य करणारं नाटक आहे. रत्नाकर मतकरी यांनी ‘आरण्यक’ लिहितानाच एक मस्त गंमत केलेली आहे. हे नाटक मुक्तछंदात लिहिलं गेलं आहे. त्यामुळे त्याला स्वतःची अशी एक विशिष्ट लय आहे. या लयीमुळे ‘आरण्यक’ दृश्यात्मक काव्य बनतं. रत्नाकर मतकरी यांनी स्वतः ते दिग्दर्शित केलेलं असल्यामुळे ही काव्यात्मकता संपूर्ण नाटकभर जपली जाते. शिवाय यातील मुख्य कलाकार हे जेव्हा हे नाटक सत्तरीच्या दशकात पहिल्यांदा झालं तेव्हाचेच असल्याने आजही ते तितक्याच डिसिप्लीनने नाटक सादर करतात. ‘आरण्यक’ हे खरं तर आजच्या रंगकर्मींकरिता वर्कशॉप आहे. नाटय़शास्त्रात लयकारी कशी वापरली जाऊ शकते हे या नाटकातून दिसतं. कोणतंही नाटक हे एका अंतर्भूत लयीतच बांधलेलं असतं, पण याची जाण हल्लीच्या रंगकर्मींमध्ये अभावनेच पहायला मिळते. ‘आरण्यक’चे सर्व ज्येष्ठ कलाकार आपल्याला या गोष्टीचा प्रत्यय देतात आणि ठायीठायी त्याचं महत्त्व पटवून देतात. धृतराष्ट्राच्या भूमिकेत रवी पटवर्धन आपल्या धीरगंभीर बॅरिटोन आवाजातून प्रेक्षकांना हिप्नोटाईज करतात तर गांधारीच्या आयुष्याची कैफीयत प्रतिभा मतकरी अत्यंत प्रभावीपणे या मुक्तछंदाचा उपयोग करत मांडतात. कुंतीच्या भूमिकेत मीनल परांजपे खूपच प्रभावी झाल्या आहेत. खरं तर ‘आरण्यक’ हे कुंती आणि विदुराचं नाटक आहे. मीनल परांजपे कुंती कमालीच्या समंजसपणाने साकारतात. नकुल घाणेकर हा मुळातच एक नृत्यनिपूण कलाकार. त्याला ‘आरण्यक’ची लय सांभाळणं काही फार कठीण काम नाही. नकुलने युधिष्ठाrर छान उभा केलाय. विक्रम गायकवाडने युयुत्सू तितक्याच आवेशाने सादर केलाय. राजसेवक म्हणून अतुल महाजन खूप प्रभावी काम करून जातो.  या सगळ्यात विदूर स्थितप्रज्ञ बनून उभा राहतो. इथे दिलीप प्रभावळकर विदुराची विरक्तीची भूमिका कुशलतेने मांडतात. आदित्य कदम, रोहित माळवे, निखिल चव्हाण, प्रकाश साळवे, संजय निवंगुणे, संदीप शेंगदाणे, अभिषेक साळवी ही सर्व मंडळी ‘आरण्यक’मध्ये आपापली कामगिरी चोख करून जातात.

असं नाटक साकारताना खूप विचार करावा लागतो. शशांक वैद्य यांनी नेपथ्य करताना चारपदरी लेव्हल्सचा वापर करून ‘आरण्यक’ सतत वेगवेगळ्या पातळ्यांवर खेळतंय हे दर्शवलंय. मतकरींनी मग दिग्दर्शनात या लेव्हल्सचा पुरेपूर वापर करून पात्रांच्या विचारांमधल्या या विविध पातळ्या दाखवल्या आहेत. प्रमुख कलाकार हे सगळे सत्तरी पलीकडले असूनही त्यांनी या चौपदरी लेव्हल्स लीलया गाठल्या आहेत. कौशल इनामदारांचं संगीत ‘आरण्यक’ची एकूण परिणामकारकता वाढवण्यात मदत करतं. मघा जकाते यांची वेशभूषा आणि उलेश खंडारे यांची रंगभूषा विशेष कौतुकास पात्र आहे. मराठी नाटक मोठं व्हायला हवं तर ही तंत्रज्ञ मंडळीच महत्त्वाची होणार आहेत हे ओळखणारे राहुल भंडारे आणि गोटय़ा सांवतांचंही इथे कौतुक करायला हवं. ‘आरण्यक’ हे विविध स्तरांवर एक महत्त्वाचं नाटक आहे. लेखनात एका वेगळ्या शैलीचा उपयोग, दिग्दर्शनात सुंदर रंगमंचीय वापर, नेपथ्यात फार कल्पकतेने भव्यता साध्य करण्याचा यशस्वी प्रयत्न आणि अभिनयात एक लयबद्ध अनुशासन. या सगळ्यामुळे ‘आरण्यक’ हे एक महानाटय़ बनतं.

रत्नाकर मतकरी हे आम्हाला खूप काही अत्यंत प्रेमाने शिकवणारे गुरुवर्य पुन्हा एकदा आपल्या जादुई पोतडीतून एक गंमत काढून आम्हाला सांगताहेत- बघा, नाटक असं असतं बाबांनो…

नाटक-आरण्यक

निर्मिती-अद्वैत थिएटर्स

निर्माते-राहुल भंडारे

सादरकर्ते-झी मराठी

लेखक/दिग्दर्शक-रत्नाकर मतकरी

नेपथ्य-शशांक वैद्य

प्रकाश-शीतल तळपदे

संगीत-कौशल इनामदार

सूत्रधार-गोटय़ा सावंत

कलाकार-प्रतिभा मतकरी,मीनल परांजपे, नकुल घाणेकर, रवी पटवर्धन, दिलीप प्रभावळकर

दर्जा-***