
सप्टेंबर 2021 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन, दरमहा कोविड भत्ता आणि ग्रामपंचायतीकडून मिळणारा प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नाही. हे थकीत वेतन आणि भत्ता त्वरीत मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सप्टेंबर 2021 पासूनचे आशा कर्मचाऱ्यांचे वेतन, दरमहा कोविड भत्ता आणि ग्रामपंचायतीकडून मिळणारा प्रोत्साहन भत्ता जिल्ह्यातील दीड हजार आशा कर्मचाऱ्यांना मिळाला नसल्याचे नमूद करण्यात आले. ही थकीत रक्कम त्वरीत मिळावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.




























































