
एसी लोकलचे भाडे प्रवाशांना परवडणारे असावे आणि एसी लोकलची संख्या आणखीन वाढविण्यात यावी अशा बाबींवर मुंबईच्या भेटीवर आलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी रेल्वे अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. तसेच एसी लोकलमध्ये चढल्यानंतर प्रवाशांना उर्वरित तिकिटाच्या फरकाची रक्कम आयत्यावेळी भरण्याची सुविधा देण्याचीही योजना असल्याचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा प्रथमच मुंबईच्या भेटीवर आले आहेत. काल त्यांनी पश्चिम रेल्वेवर आणि आज मध्य रेल्वेच्या विविध उपक्रमांना भेटी देऊन लोकलमधून प्रवास करीत प्रवाशांशी चर्चा केली. यावेळी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांनी पश्चिम रेल्वेवर अधिक एसी लोकलच्या ट्रायल घेण्याची योजना असल्याचे सांगितले. तसेच एसी लोकलच्या भाडय़ाचे सुसूत्रीकरण करण्याची योजना असल्याचे यावेळी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले. एसी लोकलला प्रवाशांचा पाठिंबा मिळण्यासाठी सेमी एसी लोकल तयार करण्याऐवजी तिच्या भाडय़ावर विचार सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या युनिफाईड कमांड ऍण्ड कंट्रोल सेंट्रलचे लोकार्पणही अध्यक्ष सुनीत शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुंबई सेंट्रल येथे आयआरसीटीसीच्या नव्या पॉड हॉटेलचे निरीक्षण अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी यावेळी केले. तसेच सोमवारी मध्य रेल्वेच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. तसेच यावेळी मुंबई रेल्वे विकाम महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांचे सादरीकरण केले.


























































