
साहेब, आमच्या मागण्या मान्य करा, असे म्हणत एक अंगणवाडी सेविका धायमोकलून रडत आज थेट मुख्यमंत्र्यांसमोर पोहोचली. मुख्यमंत्र्यांचे पाय धरत तिने टाहो फोडल्याने यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तपोवनात मैदानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिक येथे आले होते. पाहणी करीत असतानाच एक अंगणवाडी सेविका धायमोकलून रडत त्यांच्यासमोर आली. तुटपुंज्या मानधनावर परवडत नाही, आम्हाला न्याय द्या, आमच्या सर्व मागण्या मान्य करा, असे म्हणत तिने टाहो फोडला. यामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. मुख्यमंत्री, त्यांच्या समवेत असलेले मंत्री दादा भुसे हेही गोंधळून गेले. या महिलेची कशीबशी समजून काढण्याच्या प्रयत्नात ते पुढे चालते झाले. महिला पोलिसांनी अंगणवाडी सेविकेला घटनास्थळावरून दूर नेले.

























































