गोरेगावातील आग दुर्घटनेची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव पश्चिमेतील उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीत लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती आठवडाभरात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करणार आहे.

गोरेगाव पश्चिममधील उन्नतनगर येथील एसआरएच्या सात मजली जय भवानी इमारतीतील पार्किंगमध्ये शुक्रवार, 7 ऑक्टोबरला पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनास्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन केली असून पुढील सात दिवसांत रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे.

याची होणार चौकशी
आगीची घटना नेमकी कशामुळे घडली, आगीला जबाबदार कोण, अग्निशमन यंत्रणा सुरू होती का, अग्निप्रतिबंधक उपकरणे उपलब्ध होती का, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबतच्या शिफारशी या चौकशी अहवालात समितीकडून केल्या जाणार आहेत.

ही आहे आठ जणांची समिती
मुंबई महापालिकेने स्थापन केलेल्या आठ जणांच्या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे समितीचे अध्यक्ष आहेत. उपायुक्त विश्वास शंकरवार हे समिती सचिव आहेत. मुंबई पोलीस उपायुक्त अजय कुमार भन्सल, उपअभियंता एसआरए रामा मिटकर, सहाय्यक आयुक्त ‘पी-दक्षिण’ राजेश अक्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, पालिकेचे मुख्य चौकशी अधिकारी एस. बी. सतावलेकर, म्हाडा इमारत परवानगी सेल उपअभियंता राजीव शेठ हे समितीचे सदस्य आहेत.