भाजपचा महाराष्ट्रद्वेष उघड होतोय! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

ज्यांना महाराष्ट्र गद्दार व खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे, हे चुकून केलेले विधान नाही तर अतिशय सुनियोजित आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करायचे हा या सरकारचा डाव आहे. राज्यपाल जे बोलतात तेच हे पर्यटनमंत्री बोलले आहेत. यातून महाराष्ट्रद्वेष लोकांसमोर येत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज भाजप व मिंधे सरकारवर घणाघाती हल्ला केला.

नागपूरमध्ये 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक विधान भवनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगडावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेशी केली याकडे पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अशा लोकांबरोबर करणे हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे. हा पक्षाचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे. ही वस्तुस्थिती लोकांसमोर आली आहे. हे मंत्रीही ‘रिऑलिटी’ ओळखणारे नाहीत ‘रिअॅल्टी’ ओळखणारे आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यांनी मंगलप्रभात लोढा यांना मारला.

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गुजरातमधील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातून उद्योग पळवले तसे आमच्या महाराष्ट्रातून गावे पळवतील. कारण तिथेही निवडणुका आलेल्या आहेत. पण हे महाराष्ट्राचे खच्चीकरण किंवा ‘इकॉनॉमिक आयसोलेशन’ व्हावे म्हणून हे सर्व सुरू आहे. याचे पडसाद अधिवेशनात उमटतीलच. वास्तविक राज्यपालांच्या वक्तव्याचा सर्वांना राग यायला हवा होता. या सर्वांवर मुख्यमंत्री आणि खोके सरकार शांत का आहेत? ते का काही बोलले नाहीत? हे राज्यपाल त्यांचे सर्व ऐकत असतील आणि मुख्यमंत्र्यांना पेढे भरवणारे हे राज्यपाल असतील तर मग मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना एवढे तरी ऐकवायला पाहिजे होते अशी अपेक्षा यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

वेदांता फॉक्सकॉनवर तुम्ही उद्योगमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कालही आम्ही वेदांता फॉक्सकॉनचा विषय लोकांसमोर आणला. यासंदर्भात उद्योगमंत्र्यांना कधीच आव्हान दिले नव्हेत. कारण उद्योगमंत्री म्हणून काम करताना त्यांना मी पाहिलेच नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेतून त्यांना या सरकारने बाहेर ठेवलेले आहे.

ज्यांचा या खात्याशी संबंध नाही त्यांनी विधानसभेतही उत्तर देऊ नये, असे आदित्य ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे की, खात्याच्या सर्वांना घेऊन मंचावर या माध्यमांच्या उपस्थितीत माझ्यासोबत चर्चा करा. हे मुख्यमंत्री घटनाबाह्य असले तरी मी त्यांना आव्हान दिले आहे जे सध्या खुर्चीला चिकटून बसले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मारला.

गोवरबाबत सरकार उदासीन

गोवरच्या साथीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या साथीमध्ये 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. पण सरकारकडून-मंत्र्यांकडून कुठेही काहीही माहिती दिलेली नाही. एकही ‘ब्रिफिंग’ झालेले नाही. कोविडच्या काळात आमच्या सरकारकडून प्रत्येक दिवशी एक ‘बुलेटिन’ येत होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत होते, पण आता कोणतीही सत्य परिस्थिती लोकांसमोर पुढे आलेली नाही. दुसऱया बाजूला आरोग्य खात्याच्या सचिवांची बदलीही झाली आहे. केंद्र सरकारकडून गोवरच्या बाबतीत काळजी घेण्याची सूचना राज्याला आली आहे. अशी परिस्थिती कोविडच्या काळात झालेली नव्हती.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य राज्यपालांना वाचविण्यासाठी

हिवाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विरोध करण्यात येईल का, असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर अधिवेशनात विरोध करण्याची वेळच का यावी असा प्रतिप्रश्न करून आदित्य ठाकरे म्हणाले की, वास्तविक याच खोके सरकारने राज्यपालांना पदमुक्त करून परत पाठवायला पाहिजे होते, पण तशी प्रतिक्रिया अजून तरी एकाही मंत्र्याकडून आलेली नाही. उलट राज्यपालांनी केलेले वक्तव्य झाकण्यासाठी वेगवेळी वक्तव्ये होत आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यही या राज्यपालांना वाचवण्यासाठी असेल अशी शंका आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.