महावितरण ठेकेदारांचे काम बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

प्रकाशगड, मुंबई येथे महावितरणचे प्रकल्प संचालक साबु यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत महावितरणची कामे करणार्‍या राज्यभरातील ठेकेदारांनी विविध समस्यांबाबत लक्ष वेधले. महावितरणची कमी दरसुची, त्या तुलनेत मार्केट दर जास्त असल्याने व जाचक अटींमुळे कामे करणे कठीण बनत असून सध्याच्या बाजारभावाप्रमाणे दर द्यावा. तोपर्यंत महावितरणचे कोणतेही काम करणार नसल्याचा इशारा यावेळी सर्व ठेकेदारांनी दिला असल्याची माहिती सिंधुदुर्गातील ठेकेदार तथा पावशी ग्रा.पं.चे शिवसेनेचे सरपंच भिकाजी (बाळा) कोरगांवकर यांनी दिली.

महावितरणच्या कामांची टेंडर दर सुची सध्याच्या बाजारभावापेक्षा २० ते २५ टक्के पेक्षा कमी असल्याने ठेकेदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणाची कामे करणार्‍या सर्वच ठेकेदारांनी महवितरणच्या कामांची टेंडर भरण्यास असमर्थता दाखवल्याने कृषी जोडणीसह अनेक कामे रेंगाळली आहेत. याची दखल घेत राज्यभरातील सर्व ठेकेदारांसमवेत प्रकल्प संचालकांनी बैठक घेतली. या बैठकीत सर्वच ठेकेदारांनी टेंडर प्रक्रिया व कामे करताना, साहीत्य बाहेरून आणण्यात येणार्‍या अडीअडचणी मांडत सध्याच्या बाजार भावानुसार कामांचे (टेंडर) दर द्यावेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत महावितरणाची कामे करणार नसल्याची भुमिका सर्वच ठेकेदारांनी यावेळी घेतली आहे अशी माहिती श्री. कोरगांवकर यांनी दिली. सिंधुदुर्गातून श्री.कोरगांवकर (कुडाळ),संतोष पावसकर (माणगांव) व शिवाजी नलावडे (कणकवली) यांनी या बैठकीला उपस्थित राहुन सिंधुदुर्गातील समस्यांबाबत लक्ष वेधले.