नगर रुग्णालय आग प्रकरण – गुदमरल्याने सहा जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-hospital-fire

नगर जिल्हा सरकारी रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या रुग्णांचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला आहे. त्यानुसार मृत 11 पैकी सहा जणांचा मृत्यू गुदमरून, तर तिघांचा होरपळून, एकाचा 60 टक्के भाजल्यामुळे मृत्यू झाला आहे. तसंच एका रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

रुग्णालयात शनिवारी लागलेल्या आगीत या 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. आग प्रकरणाची चौकशी आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याच्या तपासासाठी तो अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. या कक्षात 17 रुग्ण होते. त्यातील सहा जणांना अन्यत्र हलवण्यात यश आलं असून त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, या घटनेत केवळ ऑक्सिजन बंद पडल्याने नव्हे, तर भाजल्यानेही मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने आगीची भीषणता लक्षात येते.