नगरमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात कांदा दरात पुन्हा घसरण झाली आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत 58 हजार गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला 300 ते 1400 रुपयांचे आणि सरासरी 900 रुपयांचा दर मिळाला. मागील आठवडय़ात साधारण दोन हजारांपर्यंत दर होता. कांद्याच्या दरात वरचेवर घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. किरकोळ बाजारात मात्र हाच कांदा 30 ते 40 रुपये किलो दराने विकला जात आहे.

नगर जिह्यात रब्बीत कांद्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा रब्बीत आतापर्यंत सुमारे 1 लाख 55 हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. रब्बीत लवकर लागवड झालेला कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढलेली दिसताच कांद्याचे दर पाडले जात असल्याचे दिसून येत आहे.

मागील आठवडय़ात साधारण दोन हजारांच्या पुढे प्रतिक्विंटल दर होता. तो दर आता 1400 रुपयांपर्यंत आला असून, सरासरी 900 रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. घोडेगाव (नेवासा), राहाता, संगमनेर, राहुरी, पारनेर बाजार समितीतही अशाच पद्धतीने दर आहे. गेल्या वर्षभरात जास्तीचा पाऊस व अन्य संकटांमुळे कांदा उत्पादक सातत्याने आडचणीत येत आहेत.

यंदा पुरेसे बियाणे उपलब्ध झाले नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट दराने बियाणे खरेदी करावे लागले. आता कांदा घरात येऊ लागला की दर पाडले जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच पुन्हा दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकटही कांदा उत्पादकांच्या जीवाला घोर लावत आहे. नगर बाजार समितीत एक नंबरच्या कांद्याला 1100 ते 1400, दोन नंबरच्या कांद्याला 800 ते 1100, तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 800 व चार नंबरच्या कांद्याला 300 ते 500 रुपयांचा दर मिळाला.