Air India- उड्डाणादरम्यान हृदयविकाराचा झटका; आपत्कालीन लँडिंगमुळे मिळाले जीवनदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियाचे विमान बंगळूरूहून दिल्लीकडे निघाले असताना त्यात काही नाट्यमय प्रसंग घडल्याने, सर्वच प्रवाशी चिंताग्रस्त झाले. प्रवासादरम्यान 80 वर्षीय प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने विमानात एकच खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला आणि वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेसचे एआय-2418 हे विमान गुरुवारी सायंकाळी बंगळूरूहून दिल्लीकडे रवाना झाले होते. विमान हजारो फूट उंचीवर असताना एका वृद्ध प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक मदत सुरू केली. त्याचवेळी वैमानिकाने एटीसीला परिस्थितीची माहिती दिली.

एटीसीने तातडीने विमानाचा मार्ग बदलून ते लखनौ विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेतला. रात्री सुमारे पावणे अकराच्या सुमारास विमानाचे लखनौ विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान उतरण्यापूर्वीच डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती. विमान थांबताच वैद्यकीय पथकाने संबंधित प्रवाशावर उपचार सुरू केले. वेळीच मिळालेल्या उपचारांमुळे त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या विमानात एकूण 128 प्रवासी प्रवास करत होते. असे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

दरम्यान, देशातील विविध भागांतील खराब हवामानाचाही विमानसेवांवर परिणाम होत असल्याचे दिसून आले. हैदराबादहून जगदलपूरकडे जाणारे इंडिगोचे 6E-7104 हे विमान प्रतिकूल हवामानामुळे गंतव्यस्थानी उतरू शकले नाही. अखेर वैमानिकाने विमान पुन्हा हैदराबादला परत नेण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच तासांच्या उड्डाणानंतर विमान सुरक्षितपणे हैदराबाद विमानतळावर उतरले. त्यानंतर संबंधित उड्डाण रद्द करण्यात आले आणि सर्व 79 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हजारो फूट उंचीवर घडलेल्या या प्रसंगात वैमानिक, एटीसी आणि वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे एका प्रवाशाला अक्षरशः नवजीवन मिळाले.