नवी मुंबईत दोन गटांत हाणामारी, तिघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुना वाद मिटवण्यासाठी सुरू असलेल्या बैठकीत दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना ऐरोली येथील चिंचपाड्यात घडली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे.

शिवकुमार नार (२५), त्याचा भाऊ शिवराज नार आणि आरोपी सुभान रेहमानी यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद पुढे वाढू नये या उद्देशाने चिंचपाडा येथील शंकर मंदिरासमोर दोन्ही गटांची बैठक बोलावली होती. चर्चा सुरू असताना दोन्ही गटांच्या तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही मारामारी सोडवण्यासाठी शिवकुमार नार, शिवराज नार आणि सुनील नार हे मध्यस्थी करण्यास गेले असता आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक करून, बांबू, लोखंडी रॉड, धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात तिघेही गंभीर जखमी झाले.