
सामना प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड
अजितदादांनी सिंचन घोटाळा केला आहे. त्यांच्या दारात पोलीस उभा आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल असे भाष्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अटल संकल्प महासंमेलनात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पुण्याचा महापौर मुक्ता टिळक, पिंपरी शहराचे महापौर राहुल जाधव, शहाराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते.
दानवे म्हणाले, की “2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. मावळ आणि शिरूर मधील कार्यकर्त्यांमध्ये उत्सहा आहे. 2014 मध्ये आम्ही मोदी लाटेवर निवडून आलो. मात्र त्यांनतर केंद्रात व राज्यात केलेल्या विकास कामांमुळे भाजपने प्रत्येक ठिकाणी सत्ता काबीज केली आहे.” त्यातूनच हा पक्ष नंबर एकवर गेला आहे आणि यापुढेही नंबर एकवर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.





























































