निवडणूक आयोगाची कॉपीपेस्ट ऑर्डर, अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. निवडणूक आयोगाने शिवसेनेतून गद्दारी करणाऱयांबाबतीत जो न्यायनिवाडा केला होता तीच ऑर्डर ‘राष्ट्रवादी कुणाची?’ यासंदर्भात निर्णय करताना कॉपीपेस्ट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हावर शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष आणि अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस हे नाव आणि घडय़ाळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेससंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केली असता बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा अजित पवार यांना असल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या निकाल पत्रात म्हटले आहे. पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही पद्धतीने झालेल्या नाहीत, असेही यामध्ये नमूद केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात जाणार; शरद पवार हाच पक्ष – जयंत पाटील
शरद पवारांनी शून्यातून पक्ष उभा केला. त्याची फळे चाखणारे अनेक जण आहेत. शरद पवारांमुळे आमच्यासारख्या अनेकांना मंत्रीपदे मिळाली. आज तोच पक्ष पवारसाहेबांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. तीच आमची शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय याला लवकरच स्थगिती देईल ही आम्हाला अपेक्षा आहे. परिस्थिती कशीही असली तरी आम्ही डगमगणारे नाही. पवारसाहेबांच्या साथीने याला तोंड देऊ. शरद पवार जिथे उभे राहतात तिथे महाराष्ट्रात पक्ष उभा राहतो हा आमचा विश्वास आहे. शरद पवार हाच पक्ष असा समजणारे अनेक मतदार आहेत.

कुणाच्या बाजूने किती लोकप्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेतील 41 आमदारांनी अजित पवार तर 15 आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यातील पाच आमदारांनी दोन्ही गटाला पाठिंबा असल्याचे पत्र आयोगाला दिले आहे.

लोकसभेतील 4 पैकी 2 खासदारांनी अजित पवार आणि 4 खासदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यापैकी एका खासदाराने दोन्ही गटांना पाठिंबा दिला आहे.

विधानपरिषदेतील 9 पैकी 5 आमदारांनी अजित पवार तर 4 आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिलाय. राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदाराने अजित पवार तर 3 खासदारांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे.

नागालँडमधील 7 आणि झारखंडच्या 1 आमदाराने अजित पवार यांना पाठींबा दिला आहे. तर केरळमधील 2 आमदाराने शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे.

निकालपत्रात काय म्हटले आहे
आयोगाने दोन्ही गटांनी दाखल केलेल्या समर्थनाच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केली आणि असा निष्कर्ष निघतो की, अजित पवार यांना बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्हा वापरण्याचा अधिकार आहे.
चिन्हांच्या आदेशाच्या अंतर्गत आयोगासमोर येणारी बहुसंख्य चिन्ह विवाद प्रकरणे दर्शवतात की, राजकीय पक्ष एकतर नियमित संघटनात्मक निवडणुका घेत नाहीत किंवा त्या पक्षाच्या घटनेनुसार घेत नाहीत. राजकीय पक्षांच्या अशा कृतींमुळे वादग्रस्त प्रकरणांचा निवाडा करण्यासाठी पक्षाच्या घटनेची चाचणी लागू करण्याच्या आयोगाच्या व्याप्तीवरच परिणाम होत नाही तर पक्षाच्या संघटनात्मक विभागातील बहुमत चाचणीचा अर्जही अप्रभावी ठरतो, असेही निवडणूक आयोगाने निकालपत्रात म्हटले आहे.

शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाला नव्या नावासाठी आजची मुदत
शरद पवार यांच्या नेतृत्वातील खासदार व आमदारांना वेगळा गट म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह सुचविण्यासाठी बुधवार 7 फेब्रुवारी दुपारी 4 वाजेपर्यंतची मुदत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

निर्णय विनम्रपणे स्वीकारला – अजित पवार
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत, अशी एका ओळीतील प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवरून दिली आहे. आपल्या नावासमोर त्यांनी ‘राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असेही लिहिले आहे.

निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात
पक्ष स्थापन केला त्याच्याच हातून पक्ष काढून घेण्यात आला. मराठी माणूस, महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती कार्यरत आहे. जे षडयंत्र शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांविरोधात रचण्यात आले तेच षडयंत्र शरद पवार आणि आमच्या विरोधात रचले, असे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ईसी… एन्टायरली कॉप्रमाईज्ड! तडजोड बहाद्दर!!
निवडणूक आयोग खरंच स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का? ‘ईसी’ म्हणजे एन्टायरली कॉप्रमाईज्ड… तडजोड बहाद्दर, हे पुन्हा एकदा आयोगाने दाखवून दिले आहे, असा निशाणा शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी साधला.