
आमदार नवाब मलिक यांना सोबत घेऊ नका, असे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे. या पत्रानंतर अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी अजित पवार जेव्हा विधीमंडळ परिसरात दाखल झाले तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यावर याच मुद्दावरून प्रश्नाचा भडीमार केला होता. कातावलेल्या अजित पवार यांनी या संदर्भात नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन असे म्हटले आहे.
मलिकांची भूमिका तटस्थ
नवाब मलिक हे सध्या जामिनावर असून त्यांना माध्यमांशी बोलण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. नवाब मलिक यांनी आपण तटस्थ राहणार असल्याचे आधीपासून स्पष्ट केले असून आपली तीच भूमिका कायम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा म्हटल्याचे कळते आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मलिक यांना अजित पवारांच्या मागे तिसऱ्या रांगेत 49 क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे. मात्र ते दुसरीकडे बसले.
सकाळी पाठराखण करणाऱ्या फडणवीसांची संध्याकाळी कोलांटउडी
भाजपकडून ज्या नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप सातत्याने करण्यात आले, तेच मलिक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसले. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही,’ असे म्हणणारे आज त्यांच्यासोबत कसे? असा सवाल केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलो, असे सांगत मलिकांची सकाळी पाठराखण केली. दानवे यांनी भरसभागृहात प्रश्न उपस्थित करून दिलेल्या दणक्यानंतर भानावर आलेल्या फडणवीस यांनी अखेर संध्याकाळी माघार घेत मलिक यांना सोबत घेऊ नका, असे पत्र अजित पवार यांना पाठवत कोलांटउडी मारली.
पत्रात काय?
नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही, असे आमचे मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचार घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीसांनी अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.


























































