‘योगी सरकारने राम, सीता आणि रावणालाही पेन्शन द्यावी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
akhilesh

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशातील योगी अदित्यनाथ सरकारने साधुसंताना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्धांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेत साधुसंतांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना विचारले असता, त्यांनी अनोख्या शैलीत भाजपला शालजोडीतले हाणले. आमच्या समाजवादी पक्षाने रामलीलामध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी पेन्शन योजना सुरू केली होती. भाजपने राम, सीता यांना पेन्शन सुरू करावी आणि पैसे शिल्लक राहिलेच तर रावणालाही पेन्शन द्यावी असा टोला अखिलेश यांनी हाणला.

पेन्शन योजनेवरून भाजपवर अखिलेश यांनी चौफेर हल्ला चढवला. योगी सरकारने साधुसंताना कमीतकमी 20 हजार रुपये पेन्शन द्यावी. यश भारती आणि समाजवादी पेन्शनही सुरू करावी. रामायण पाठ आणि रामलीलामध्ये काम करणाऱ्यांनांही पेन्शन लागू करावे, अशी मागणी अखिलेश यांनी केली आहे.

अखिलेश यादव यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नव्या पंतप्रधानांची देश आतुरतेने वाट पाहतोय, असे ते म्हणाले. भाजपकडे पंतप्रधानपदासाठी कोणी दुसरा उमेदवार असेल तर पक्षाने त्याचे नाव सूचवावे, असा टोला त्यांनी लगावला. बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावर भाजप आमदार साधना सिंह यांनी दर्जा सोडून टीका केली आहे. त्याचाही त्यांनी निषेध केला. अशा टीकेतून भाजपची मानसिकता दिसून येते, असे ते म्हणाले. निवडणूक जवळ आल्यावर भाजपच्या भाषेचा दर्जा आणखी घसरेल असेही ते म्हणाले. भाजप खोटारडा पक्ष आहे. राजकारणात कोणीही बोलले नसेल एवढे खोटे भाजपवाले बोलत आहे. साडेचार वर्षात भाजपने सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी, बेरोजगार यांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.