अलिबाग वडखळ महामार्गाला अलिबाग विरार कोरिडॉरचा खोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

वडखळ अलिबाग चौपदरी महामार्ग होणार असल्याने अलिबाग हा महामार्गाला जोडला जाणार होता. यासाठी महामार्गाच्या मोजणीचे कामही पुर्ण झाले होते. प्रकल्पबाधितांना नवीन भुसंपादन कायद्यातील तरतुदींनुसार मोबदला दिला जाणार होता. आता मात्र या महामार्गासाठी होणाऱ्या चौपदरीकरणाचे काम अचानक थंडावले आहे. प्रस्तावित अलिबाग विरार कॉरीडोरने खोडा घातल्याचे सांगीतले जात आहे.

मुंबई गोवा महामार्गाबरोबरच वडखळ ते अलिबाग आणि दिघी ते माणगाव या दोन महामार्गांच्या रुंदीकरणाला भुपृष्ठ वाहतुक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. अलिबाग वडखळ मार्गाची भुसंपादन अधिसुचना प्रसिध्द झाली असून संयुक्त मोजणीचे कामही पुर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी भुसंपादनाचे काम सुरु होणार होते. त्यासाठीचा सुधारीत प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. सगळकाही सुरळीत सुरु असतांनाच, आता हा प्रकल्प रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या कॉरीडोरमुळे वडखळ अलिबाग मार्गाच्या रुंदीकरणात खोडा निर्माण झाला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अलिबाग ते विरार दरम्यान मल्टी कॉरीडोर विकसित केला जाणार आहे. २००८ साली यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला होता. पण भुसंपादनातील अडचणीमुळे आणि निधीची कमतरता यामुळे गेली दहा वर्ष या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. आता प्रकल्पासाठी लागणारी ६० टक्के जमिन सिडकोने देण्याची तयारी दर्शवली आहे. तर प्रकल्पासाठी अर्थपुरवठा करण्यास वित्तीय संस्थानी तयारी दाखवली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. हे काम सुरु होण्याची शक्यता असल्याने आता अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण मात्र रद्द होण्याची शक्यता आहे.

याबाबात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, प्रशासकीय सूत्रांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. एकाच परिसरात दोन महामार्गांचे काम शक्य नसल्याने हे काम सुरु होण्यापुर्वीच थांबविण्यात येणार आहे. अलिबाग वडखळ महामार्ग चौपदरीकरणासाठी १७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील ९०० कोटी रुपये हे भुसंपादनासाठी लागणार आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन हा मार्ग कॉँक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या शिवाय महामार्गावर २.२ किलो मिटरचा बोगदा, आणि साडेसात किलोमिटरचा बाह्यवळण रस्ता काढला जाणार होता. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च चांगलाच वाढणार होता.

लोकसभा निवडणूकीपुर्वी अलिबाग वडखळ महामार्गाचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. पण आता हे काम थांबविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अलिबागकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे. दुसऱ्या बाजूला अलिबाग विरार कॉरीडोरच्या पहिल्या टप्प्यात विरार ते पनवेल दरम्यानच्या दृतगती मार्गाचे काम होणार आहे. त्यामुळे अलिबागकरांना विरार मल्टीकॉरीडोरसाठी आणखिन काही वर्षांची प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

अलिबाग वडखळ महामार्ग हा पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम सध्या अस्तित्वात असणाऱ्या मार्गाचे १० मीटर पर्यंत रुंदीकरण करेल. तर एमएमआरडीए यासाठी निधी उपलब्ध करून देईल – प्रशांत फेगडे, कार्यकारी अभियंता महामार्ग प्राधिकरण