अमळनेरात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

अमळनेरच्या पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संमेलनस्थळी तीन सभागृहे उभारण्यात आली असून, संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहराचा कायापालट करण्यात आला आहे.

संमेलनानिमित्त सभामंडप क्रमांक 1 खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी सभागृह, सभामंडप क्रमांक 2 कविवर्य ना. धों. महानोर सभागृह, तर सभामंडप 3 बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह अशी नावे देण्यात आली असून, सभामंडप क्रमांक 1 हे ‘जर्मन हँगर’ पद्धतीचे उभारण्यात आले आहे. यात 10 हजार साहित्यप्रेमींच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील प्रताप महाविद्यालय परिसरातही रंगरंगोटी, सुशोभीकरणासह मंडप उभारणी, प्रवेशद्वारासह आदी कामेही पूर्ण झाली असून, संमेलनस्थळी प्रवेश करण्यासाठी महाविद्यालयासमोर भव्य व आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, संत सखाराम महाराज, पूज्य साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी, श्रीमंत प्रताप शेटजी यांच्या प्रतिमा लावण्यात आहेत. याशिवाय महाविद्यालय परिसरातील भिंतींवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत.

प्रकाशन कट्टा अन् सेल्फी पॉइंट

सभामंडप क्रमांक 2 कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात 500जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली असून, सभामंडप क्रमांक 3 बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहातही 500 जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. हे सभामंडप प्रताप महाविद्यालयातील जुन्या नाट्यगृहात आहे. बी. फार्मसी महाविद्यालयाजवळ 300 ग्रंथदालने उभारण्यात आली असून, खवय्यांसाठी काही दालने राखीव ठेवण्यात आली आहेत. याच परिसरात प्रकाशन कट्टा व सेल्फी पॉइंटदेखील उभारण्यात आले आहेत.