
सामना ऑनलाईन । लखनौ
पत्नीसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका नराधमाने त्याच्या एक महिन्याच्या बाळाची पायाखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील सांभल जिल्ह्यात घडली आहे. अर्शद असे त्या निष्ठूर बापाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अर्शदने त्याच्या एक महिन्याच्या बाळाचा चेहरा पायाने ठेचून त्याला निर्घृणपणे मारून टाकले.
Sambhal: An infant was allegedly crushed to death by his father after he lost his temper following an argument with his wife. Police says, ‘The accused has been arrested & further investigation is underway’. pic.twitter.com/RwK7MOzvnA
— ANI UP (@ANINewsUP) June 23, 2018
अर्शद व अकिला यांना महिनाभरापूर्वीच पुत्रप्राप्ती झाली होती. त्यांनी धुमधडाक्यात बाळाचे बारसे करून त्याचे नाव अरहान ठेवले होते. शुक्रवारी दुपारी अर्शद जेवण्यासाठी कामावरून घरी आला. अकिलाने त्याला जेवण वाढले मात्र त्याला जेवण न आवडल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. हे दोघे भांडत असतानाच अरहान रडत होता. त्याच्या रडण्याच्या आवाजाला कंटाळून जमिनीवर झोपलेल्या अरहानच्या चेहऱ्यावर अर्शदने पाय ठेवला व त्याचा चेहरा चिरडला. या हल्ल्यात अरहान जागीच ठार झाला. बाळाचा जीव गेल्याचे लक्षात आल्यावर अर्शदने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र अकिलाने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी अर्शदला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.



























































