अनिल देशमुखांची सीबीआयकडून दहा तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यावर सीबीआयने राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी जवळपास दहा तास चौकशी केली. सकाळी 10 वाजता चौकशीसाठी गेलेले अनिल देशमुख सायंकाळी 6 वाजल्यानंतर घराकडे रवाना झाले.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना एपीआय सचिन वाझे याच्याकरवी मुंबईतील बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांकडून तब्बल 100 कोटी रुपये आणून देण्याची मागणी केली होती असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर आरोपाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या पाच जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आधी सीबीआयने परमबीर सिंग, निलंबित एपीआय सचिन वाझे, मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील  यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यानंतर बुधवारी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहावे असे समन्स सीबीआयने बजावले होते.