
सामना प्रतिनिधी । पारनेर
वारंवार देण्यात येणा-या अश्वासनानुसार लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती होत नसल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या 30 जानेवारी, महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथी दिनी राळेगणसिद्धीमध्ये आंदोलनास प्रारंभ करणार आहेत. हजारे यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री राजनाथसिंह यांना शनिवारी पत्र पाठविले असून सरकारच्या वेळकाढूपणाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
याच मागणीसाठी हजारे हे 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करणार होते, मात्र राज्याचे आरोग्य मंत्री गिरीष महाजन यांनी मध्यस्ती करून हजारे यांना आंदोनापासून परावृत्त केले होते. त्यावेळीही देण्यात आलेल्या अश्वासनाची पुर्तता न झाल्याने हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. हजारे आपल्या पत्रात म्हणतात, देशात वाढत चालेल्या भ्रष्टाचारास कंटाळून जनतेने 2011 मध्ये लोकपाल, लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी करोडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले होते. रामलिला मैदानावर आपण केलेल्या आंदोलनानंतर 1 जानेवारी 2014 रोजी लोकपाल, लोकायुक्त कायदा अस्तित्वात आला. आता देशातील भ्रष्ट्राचारास आळा बसेल अशी आशा जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आंदोलनानंतर मोदी सरकार सत्तेत आले, मात्र लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती झाली नाही. त्यासाठी मोदी सरकारकडे आपण तिस वेळा पत्रव्यवहार केला, मात्र या पत्राचे साधे उत्तरही देण्यात आले नाही. सुरूवातीस विरोधी पक्षनेता नाही, ज्येष्ठ विधिज्ञ नाही अशी कारणे सांगून लोकपालाच्या नियुक्ती टाळली गेली.
लवकरात लवकर लोकपाल लोकायुक्त नियुक्त करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनेकदा फटकारले, तरीही काही ना काही कारणे देत केंद्राने या नियुक्त्या करणे टाळले. म्हणजेच मोदी सरकारने चार वर्षे बहाणेबाजी करीत कायद्याची अंमलबजावणी टाळली. त्यानंतर 23 मार्च 2018 रोजी आपण पुन्हा दिल्लीत रामलिला मैदानावर उपोषण सुरू केले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाने लिखित अश्वासन देताना सांगितले की लवकरात लवकर लोकपाल, लोकायुक्त नियुक्त करू. त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना आपण 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा उपोषण करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यावेळीही दोन्ही नियुक्त्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे पंंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री तसेच इतर मंत्रयांनी सांगितले. त्यांच्या विनंतीनुसार आपण ऑक्टोबरमध्ये आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. लोकपाल व लोकायुक्त हा आपला वैयक्तीक प्रश्न नसून देशातील भ्रष्टाचार रोखण्याचा प्रश्न आहे. चर्चेतून प्रश्न सुटतात यावर आपला विश्वास आहे. मात्र आता असे वाटत आहे की सरकारने जनतेसोबत विश्वासघात केलेला आहे. सरकारला साडेचार वर्षाचा कालावधी झालेला आहे. एवढा प्रदिर्घ कालावधी उलटल्यानंतरही लोकपालाची नियुक्त होत नाही. यावरून हे स्पष्ट होते की सरकारला लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची इच्छा नाही. सरकारने दिलेल्या अश्वासनाप्रमाणे लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती झाली नाही तर पूर्वीच जाहिर केल्याप्रमाणे 29 जानेवारी पासून आपण राळेगणसिद्धीत उपोषण करणार असल्याचे हजारे यांनी या पत्रात नमुद केले आहे.

































































