अन्वय नाईक प्रकरण फडणवीस सरकारने दाबले- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jayant-patil

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे सरकारवर होत असलेल्या टीकेला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. पूर्वीच्या सरकारने हे प्रकरण दाबले होते. त्यांच्या काळात गोस्वामींच्या घरी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला. खरे तर गुह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो. मात्र, पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार झाला, असा आरोप करतानाच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्य सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नाही. अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी आज स्पष्ट केली.

राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोकण दौऱयावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पाटील म्हणाले, आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव आहे. आणखी दोघांची नावं त्यात आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नाईक कुटुंबीयांनी न्यायालयाला विनंती केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आलं. त्यामुळे त्यांना अटक केली, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.