अवनीच्या हत्येची उच्चस्तरीयच चौकशी हवी – प्राणीमित्र राजू बटूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरातील राळेगाव हद्दीतील बोऱ्हाटीच्या जंगलात अवनी या वाघिणीला ठार मारल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून, अकोल्याच्या वनशास्त्र महाविद्यालयातील राजू साहेबराव बटूर (रा.किनवट) यांनीही आता अनेक प्रश्न उपस्थित करीत वनखात्याच्या कारभारावर शंका व्यक्त केली आहे. ज्या १३ जणांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यापैकी एकाचाच मृत्यू हा वाघाच्या हल्ल्यामुळे झाला, असा अहवाल शवविच्छेदनात आढळून आला असताना अवनीला का मारण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अवनीच्या हत्येची उच्चस्तरीयच चौकशी, तपासणी झालीच पाहिजे, आणि जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राजू बटूर यांनी केली आहे.

राजू बटूर हे पक्षी व प्राणीमित्र असून, वेगवेगळ्या पध्दतीने पशू व पक्षांबद्दल अभ्यास करत असतात. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, ज्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे ते जंगल समृध्द जंगल म्हणून मानले जाते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वाघाचा दरारा हा जंगलात असणे आवश्यक आहे. अन्यथा या देशातील वने उदध्वस्त होतील. मोठ्या प्रमाणात जंगलतोड होईल आणि त्यामुळे पशू, पक्षी, जीवजंतू यांचे अस्तित्व धोक्यात येईल व ते नामशेष होतील, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. वाघाला १९७२ मध्ये राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला. तो काय त्यांचा जीव घेण्यासाठी का, १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरु करण्यात आले. तो त्यांचा जीव घेण्यासाठी का, व्याघ्र संरक्षण दल निर्माण करण्यात आले तेही त्यांचा जीव घेण्यासाठी का, असा सवाल त्यांनी वनखात्याला विचारला आहे.

मनुष्यावर अवनीचा पहिला हल्ला २०१६ मध्ये झाला. त्यावेळी वनविभाग काय करत होते? असा सवाल करुन त्यांनी म्हटले आहे की, ज्यात तेरा जणांच्या मृत्यूचा आरोप अवनीवर लावला जातोय, त्यापैकी तीन जणांचेच शवविच्छेदन का करण्यात आले, अन्य शवविच्छेदने का झाली नाहीत, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला असून, ज्या तीन जणांचे शवविच्छेदन झाले. त्यापैकी एकाचाच मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला, असे शवविच्छेदन अहवाल म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाने अगोदर बछड्यांना जेरबंद करा आणि नंतर वाघीणीला बेशुध्द करुन पकडा, असे आदेश दिले होते. मग अवनीला का मारण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अवनीला मारण्यासाठी प्रशिक्षित हत्ती, श्वान पथक, पॅरागायडर, निष्णांत शिकारी यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. यासाठी दोनशे ते पाचशे व्यक्तींचा समूह कार्यरत होता. अवनीला ज्या रात्री मारण्यात आले त्यावेळी एकही उच्च वन अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता. नरभक्षकाच्या नावाखाली वाघ मारण्याचा प्रकार असाच सुरु राहिला तर जंगलात वाघच शिल्लक राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

राळेगाव हद्दीतील बोराटीच्या जंगलात शुटर अजगर अली यांनी अत्यंत निर्दयपणे अवनीला ठार मारले. तिला दोन लहान बछडे होते, त्यांचा थांगपत्ता अजूनही लागला नाही.संविधानामध्ये मूलभुत कर्तव्यात ५१ ए नुसार वने, तळी, नद्या व वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाच्या संरक्षण व सुधारणा करणे, सजीव प्राण्यांबाबत भूतदया बाळगणे असा उल्लेख आहे. कलम ४८ ए मध्ये वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करणे असा उल्लेख आहे. त्याचे पालन अवनीच्या हत्येसंदर्भात झाले नाही, अशाच प्रकारे वाघांच्या हत्या झाल्यास जंगलात एकही वाघ शिल्लक राहणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.