अर्जुन तेंडुलकरचा आयपीएलमध्ये श्रीगणेशा?

1275

भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघासोबत तो यूएईला गेला आहे. सध्या तो नेटमध्ये गोलंदाजी करतोय. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय व आयपीएल व्यवस्थापनाकडून नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघासोबत असलेल्या खेळाडूंना गरज भासल्यास अंतिम अकरामध्ये खेळवता येऊ शकणार आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरचा आयपीएलमध्ये श्रीगणेशा होण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सहभागी, नेटमध्ये करतोय गोलंदाजी

अर्जुन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतोय. पण नेटमध्ये गोलंदाजी करायची ही त्याची पहिलीच वेळ नाही. मुंबई इंडियन्ससाठी त्याने याआधीही नेटमध्ये गोलंदाजी केलीय. तसेच हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघ 2017 सालामधील वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता तेव्हाही त्याने महिला क्रिकेटपटूंना नेटमध्ये गोलंदाजी केली होती. एवढेच नव्हे तर त्याच्या यॉर्करने इंग्लंडचा जॉनी बेअरस्टॉही जखमी झाला होता. यानंतर जॉनी बेअरस्टॉला संपूर्ण मोसमाला मुकावे लागले होते.

लिलावात समावेश नाही पण

अर्जुन तेंडुलकरचा आयपीएलसाठीच्या लिलावात समावेश करण्यात आला नव्हता. पण तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सचे दरवाजे उघडे होऊ शकतात. एखादा खेळाडू जखमी झाल्यास किंवा त्याला कोरोनाची लागण झाल्यास पर्यायी खेळाडू म्हणून तिथे उपस्थित असलेल्या अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान मिळू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या