
>> श्रीकांत आंब्रे
मुंबईच्या संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे पार उद्ध्वस्त करणारे मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांचे ‘प्रहार ब्रह्मास्त्राचा’ हे आत्मकथन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. डी. शिवानंदन यांच्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद निवृत्त ए. सी. पी. शिरीष इनामदार यांनी केला आहे. अतिशय ओघवता आणि कथनात्मक असा हा अनुवाद आहे. मुंबईच्या गुन्हेगारी साम्राज्यावर दोन दशके अधिराज्य गाजविणाऱया आणि हिंसा, मारामाऱया, आपापसातील टोळीयुद्धामुळे मुंबईकरांना सतत भयग्रस्त तणावाच्या वातावरणात ठेवणाऱया या गुंड टोळय़ांचा साफ नायनाट कसा झाला याचा साद्यंत इतिहास पुस्तकबद्ध करण्याचा प्रयत्न डी. शिवानंदन यांनी केला आहे. या गुन्हेगारी टोळय़ांनी मुंबईत घातलेल्या धुमाकुळाचा हा रक्त उसळणारा वृत्तांत आहे.
प्रस्तुत लेखक डी. शिवानंदन तेव्हा मुंबई पोलिसांतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱया गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याचवेळी मुंबईतील गुन्हेगारीचा पुरता बीमोड करून त्यांना पुन्हा उभे राहू न देण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्ग चोखाळण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. त्यांनी ही जबाबदारी गुन्हे शाखेवर सोपवली. मुंबई पोलिसांनी भारतीय पुराणात उल्लेख असलेले आणि सर्वाधिक शक्तिशाली आणि संहारक शस्त्र असलेल्या ब्रह्मास्त्राचा प्रतिकात्मक प्रयोग करून या गुन्हेगारी टोळय़ांचा नि:पात केला.
‘ब्रह्मास्त्र’ हेच विशेषण पोलिसांच्या हाती असलेल्या शस्त्राला अचूक लागू पडते. कारण जो कोणी या शस्त्राच्या मार्गात आला, त्यास त्याने पुरते नामोहरम केले. त्याची धास्ती इतकी की, आजतागायत गुन्हेगारी जगतातील या संघटित टोळय़ांना पुन्हा मान वर काढता आली नाही. त्याची कहाणी हाच या पुस्तकाचा गाभा आहे. समाजमनाच्या स्मृतिपटलावर या वास्तवाची नोंद व्हावी हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश असल्याची लेखकाची धारणा आहे. गुन्हेगारी जगताचा नायनाट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेचे नेतृत्व त्या वेळी डी. शिवानंदन यांनी केले होते. मात्र या मोहिमेच्या यशाचे सारे श्रेय ते मुंबई पोलीस दलाला देतात. म्हणूनच लेखकाचे हे आत्मकथन म्हणजे मुंबई पोलीस आणि त्यांच्या शूर, धाडसी व कर्तव्यनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱयांनी मुंबईकरांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर केलेल्या लढाईची गाथा आहे, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
वरदराजन, हाजी मस्तान आणि करीमलाला या त्रिकुटाने मुंबईच्या गुन्हेगारी साम्राज्यावर किमान दोन दशके निरंकुश राज्य केले. ते म्हणतील ती पूर्वदिशा हा नियम होता. त्या तिघांच्या एकाधिकारशाहीतून सुटका करून घेण्यासाठी आणि टोळय़ांवरील त्यांचे वर्चस्व संपवण्यासाठी त्या टोळय़ातील हुशार डोकेवाल्यांनी संघटित गुन्हेगारी टोळय़ांची कल्पना कृतीत आणली. तत्कालीन पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी गुन्हेगारीचे हे सिंडीकेट जिवाची पर्वा न करता जमीनदोस्त करण्याचा विडा उचलला तेव्हा त्यांना मुंबईतील या टोळय़ांनी माजवलेल्या दहशतीचा सामना करावा लागला. हे आत्मकथन लिहिताना त्यांनी या संघटित गुन्हेगारीने मुंबईत कसा धुडगूस घातला होता याची उगमकथा सांगताना लोक गुन्हेगारीकडे का वळतात, गुन्हेगारीसाठी मुंबईच का निवडतात, रिअल इस्टेट आणि बांधकाम उद्योग, चित्रपट उद्योग, हॉटेल उद्योग आणि केबल टीव्ही उद्योगातच का शिरकाव करतात याची सखोल चिकित्सा केली आहे. टोळय़ांनी खंडणी, अपहरण, अमली पदार्थ व्यापार, शस्त्रास्त्रांची आणि सोने, चांदी तसेच इतर मौल्यवान गोष्टींची बेलगाम तस्करी, चित्रपटांना अर्थपुरवठा आणि बांधकाम व्यवसायातून बक्कळ पैसा कमावण्यास सुरुवात कशी केली याचीही सविस्तर माहिती दिली आहे.
गतकाळातील मुंबईच्या कुख्यात गुंडांची माहिती देताना रक्तरंजित आणि विधिनिषेधशून्य गुन्हेगारी जगातील दाऊदच्या चलतीच्या काळातील त्याच्या कारवायांची, त्याने वैर घेतलेल्या प्रतिस्पर्धी टोळय़ांच्या केलेल्या खातम्याच्या प्रयत्नांचीही जंत्री दिली आहे. दाऊदच्या कुटुंबाची, नातेवाईकांची तसेच दाऊदने आपल्या ‘कामगिरी’साठी जवळ केलेल्या छोटय़ा राजनने त्याच्या दृष्टीने केलेल्या परामानंतर एकाच दिवशी एका टोळीतील पाच सदस्यांना दिवसाढवळय़ा गोळय़ा घालून “ार करणाऱया शार्पशूटरची कहाणीही सांगितली आहे. त्यानंतर दाऊद किंवा डी कंपनीशी वैर घेण्यास कुणी धजावत नव्हते. दाऊद आणि बॉलीवूड, दाऊद आणि ािढकेट मॅच फिक्सिंगशी त्याचे असलेले नाते, बेटिंगचे रॅकेट याची उदाहरणे दिल्यावर दाऊदने पाकिस्तानात बसून 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट कसे घडवले आणि 250 हून अधिक मुंबईकरांचा त्यात बळी कसा गेला याचाही वेध घेतला आहे.
लेखकाने दाऊद व राजन यांच्यातील विकोपाला गेलेला संघर्ष आणि त्यातून घडलेले बँकाँक गोळीबार कांड, इंडोनेशियाने राजनचे भारताला केलेले प्रत्यार्पण, त्यानंतर मुंबईत उदयाला आलेल्या आणि छोटय़ा राजनचा जानी दुष्मन असलेल्या मुंबईच्या अरुण गवळी उढर्फ डॅडी याने मुंबईत केलेल्या हत्याकांडाचे आणि खंडणी वसुलीचे कारनामेही प्रस्तुत केले आहेत. मुंबईतील कुप्रसिद्ध गुंड आणि त्यांची वंशावळ, मुंबई माफियांची विकास कथा या प्रकरणात उजेडात आणली आहे. मुंबईला हादरविणाऱया गुन्हेगारी जगतातील अनेकांच्या हत्या अखेर कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येपर्यंत येऊन पोहोचतात. याचा आढावाही घेतला आहे.
मुंबई पोलिसांची बहुआयामी रणनीती स्पष्ट करताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार, तत्कालीन सहकाऱयांच्या त्यांच्याविषयीच्या भावनांची नोंदही या आत्मनिवेदनात घेतली आहे. काही दशकांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मुंबईच्या गुन्हेगारी जगताचे समग्र आणि सर्वंकष वर्णन असलेले, अष्टपैलू पोलीस अधिकाऱयाच्या लेखणीतून उतरलेले हे आत्मनिवेदनपर पुस्तक विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱया पोलिसांना निश्चितच प्रेरणा देणारे आहे.
प्रहार ब्रह्मास्त्राचा
(मुंबईच्या गुन्हेगारी जगताच्या अंताची कथा सांगणारे आत्मकथन)
लेखक : डी. शिवानंदन
प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स, बेलापूर
संपादक : डॉ. मुकुंद कुळे
मूल्य : रुपये 391/- ह पृष्ठे – 232





























































