
>> डॉ. राजेंद्र मुंढे
लोकधन’ हे संजय बोरुडे यांचे दैनिक ‘सामना’मधील लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या विविधांगी आयामांचा अभ्यास मांडणारे लोकप्रिय सदर होते. ते आता पुस्तकरूपाने उपलब्ध झाले आहे. लोकजीवनाच्या अस्सल अनुभवांमधून साकारलेले ‘लोकधन’ म्हणजे लोकगीत, लोककथा, म्हणी, व्रतवैकल्ये, नृत्य-नाटय़, लोकविश्वास. हा केवळ सांस्कृतिक वारसा नसून समाजाच्या मानसिकतेचा, त्याच्या इतिहासाचा आणि परंपरांचा जिवंत दुवा आहे, हे लेखकाने स्पष्ट केले आहे. आधुनिकतेच्या आणि जागतिकीकरणाच्या वावटळीत हरवत चाललेल्या लोकपरंपरांचे जतन व दस्तऐवजीकरण ही काळाची गरज असल्याची जाणीव संजय बोरुडे यांनी सुरुवातीलाच मांडली आहे.
पुस्तकातील विषयांवर आधारित लोकगीतांच्या विभागामध्ये श्रमगीत, ओवी, झोपाळ्याची गाणी, लग्नगीते आणि सणांसाठी गायली जाणारी गीते यांचा अभ्यास करून त्यामागील सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ, शेतमजुरी करताना गायल्या जाणाऱया ओव्या किंवा बैलगाडय़ांच्या खेचताना उच्चारल्या जाणाऱया लयीतून लोकांच्या श्रमाला मिळणारा मानसिक आधार लेखकाने नोंदवला आहे. एका ओवीचे उदाहरण देत त्यांनी लोकांच्या नातेसंबंधातील आपुलकी स्पष्ट केली आहे, तर इतर ओळींमधून निसर्गाशी असलेली नाळ आणि श्रमाशी असलेला स्नेह स्पष्ट होतो.
लोककथांचे वेगवेगळे प्रकार सांगून त्यांचे प्रयोजनही स्पष्ट केले आहे. कुलचिन्ह अर्थात टोटम किंवा देवक यांचा विचार लेखकाने युथावस्थेच्या काळापासून केलेला दिसतो. आदिम जमातींमध्ये देवकांची प्रथा कशी सुरू झाली, त्यातून निसर्गात दिसणारी झाडे, पशू, पक्षी यांना आपले कुलचिन्ह कसे बनवले गेले यांचा यथासांग अन्वय लेखक बोरुडे मांडतात. सण, उत्सव आणि धार्मिक परंपरा या विभागात लोकधर्माचा समाजजीवनावर असलेला परिणाम विशद केला आहे. लोकधार्मिकता ही अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन सामाजिक बंध निर्माण करणारी प्रािढया आहे, असे लेखकाने नमूद केले आहे. गावातील एकत्र पूजा, व्रते, सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून लोकांच्या सहजीवनाची केंद्रे आहेत. ‘ग्रामदेवतेच्या यात्रेत लोक एकत्र येतात, भांडण विसरतात,’ अशी निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत. व्रतांमधून महिलांचे योगदान आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक जडणघडण यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. नवरात्र, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांमागची मिथके त्यांनी उलगडून दाखवली आहेत. ‘लोकमाता’ अर्थात राज्यातील महत्त्वाच्या नद्या आणि त्यावरील ओव्या व कथानके यांचा समर्थ मागोवा लेखकाने एका प्रकरणात घेतला आहे.
परिशिष्टात ग्रंथात आढळणाऱया फोटोंबद्दलची माहिती दिलेली आहे. वेलुवतन (तामीळनाडू) येथील मंदिर, जे कैलास मंदिरासारखे खडक कोरून ‘आधी कळस मग पाया’ या पद्धतीने कोरल्याचा संदर्भ ते देतात. खांबावरचे कीर्तीमुख; उत्खननात संपलेली मदर गॉडेस; तंजावर, संगमेश्वर, कुणकेश्वर येथील मंदिरे, शिळेवरील तीर्थंकरांचे शिल्प, वीरगळावरील शिवाचार्य, शिव अर्थात केरळमधील मुरूगन अशी अनेक पूरक माहिती दिलेली आहे.
लोकसाहित्यामध्ये ज्या अभ्यासकांना नवी प्रमेये शोधायची असतील असे अभ्यासक आणि लोकसाहित्यात रुची असणाऱया प्रत्येक रसिकाने हा ग्रंथ वाचायलाच हवा. या दृष्टीने संजय बोरुडे यांचे ‘लोकधन’ हे पुस्तक लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी आणि समाजाभिमुख वाचकांसाठी मार्गदर्शक ठरते.
लोकधन
लेखक : संजय बोरुडे
प्रकाशक : साहित्याक्षर प्रकाशन
मूल्य : 250/- रु.






























































