उलटा प्रवास

राजकारणात साधारणपणे खालून वर असा प्रवास होतो. जिल्हा परिषद, आमदार, खासदार मंत्री, अशी धाटणी असते, मात्र उपेंद्र कुशवाह यांनी सध्या तरी राजकीय प्रवासाचे ‘शीर्षासन’ करून दाखविले आहे. एके काळी नितीशकुमारांचे खास दोस्त असलेले कुशवाह हे तसे जयप्रकाश नारायणांच्या चळवळीतले एक शिष्य.

नितीशबाबूंचे बोट पकडून त्यांनी राजकारण सुरू केले. नितीशकुमारांशी मतभेद झाल्यानंतर राज्यसभेचा राजीनामा देऊन या महाशयांनी लोकसमता पार्टी नावाचा पक्षही स्थापन केला. गमतीचा भाग म्हणजे 2014 मध्ये या पक्षाचे चारेक खासदार निवडून आले आणि कुशवाह हे केंद्रात मंत्रीही बनले. त्यानंतर भाजपशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी ‘एनडीए’तून बाहेर उडी घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची एकही जागा निवडून आली नाही. राजकीय ग्राफ घसरतोय, हे लक्षात आल्यानंतर जुने यारदोस्त नितीशबाबूंशी हातमिळवणी करून त्यांनी आपल्या पक्षाचे संयुक्त जनता दलात विलीनीकरण केले. भाजपच्या त्रासाला कंटाळलेल्या नितीशबाबूंना उपेंद्रबाबूंची साथ मोलाची वाटली.

त्यांनी लागलीच त्याची उपेंद्र कुशवाह यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून करून परतफेड केली. उपेंद्र कुशवाह हे कुशवाह समाजाचे मोठे नेते. राज्यातील दोन्ही विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य तसेच लोकसभा व राज्यसभेचे सदस्य अशा सर्वच विधान मंडळाचे सदस्य होण्याचा अनोखा विक्रम या निमित्ताने का होईना उपेंद्र कुशवाह यांनी करून दाखिवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या