
>> अभय मिरजकर
महाराष्ट्रात वनक्षेत्राच्या बाबतीत लातूर जिल्ह्यास वाळवंटच समजावे लागेल. कारण जिल्ह्यात 52.34 चौरस किलोमीटर वन जमीन क्षेत्रात केवळ 0.6 टक्के वनक्षेत्र आहे. मागील काही वर्षांत लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न राज्यात प्रथम ाढमांकावर होता, पण वनक्षेत्रात लातूर पॅटर्न राज्यात शेवटच्या ाढमांकावर आहे. लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासनकर्ते, अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील नागरिकांना या गोष्टीची खरे तर शरम वाटली पाहिजे होती, परंतु असे काही कोणाला वाटतच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र, वृक्ष आच्छादन वाढत नाही असे म्हणावे लागेल.
सध्या महाराष्ट्रात 61992.76 चौरस किलोमीटर वन जमीन क्षेत्र उपलब्ध आहे. यामध्ये राखीव जंगल, संरक्षित जंगल, अवर्गीकृत जंगल यांचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये वन विभागाचे एकूण 11 विभाग करण्यात आलेले आहेत. यामध्ये ठाणे, नाशिक, धुळे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या ताब्यात 3177.19 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे. अमरावती विभागाच्या ताब्यात 583.85 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे. यवतमाळ विभागाच्या ताब्यामध्ये 3483.77 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे. नागपूर विभागाच्या ताब्यामध्ये 7753.03 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे. चंद्रपूर विभागाच्या ताब्यामध्ये 4845.30 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे.
नियमानुसार किमान 33 टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्यातील वनक्षेत्राची पाहणी केली तर मराठवाडा याबाबतीत दुष्काळीच म्हणावा लागेल. लातूर जिल्हा तर थेट वाळवंटच म्हटले तर वावगे ठरणार नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9.1 टक्के वनक्षेत्र आहे. नांदेड जिल्ह्यात 13.1 टक्के वनक्षेत्र आहे हिंगोली जिल्ह्यात 7 टक्के वनक्षेत्र आहे. धाराशिव जिल्ह्यात 0.7 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर जिल्ह्यात 0.6 टक्के वनक्षेत्र आहे. जालना जिल्ह्यात 0.84 टक्के वनक्षेत्र आहे. परभणी जिल्ह्यात 1.65 टक्के, तर बीड जिल्ह्यात 1.53 टक्के वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र वाढवण्यासाठी आणखी किती पिढीपर्यंत वाट पाहावी लागेल किंवा यापेक्षाही आणखी किती घट होईल? हे येणारा काळच ठरवेल.
























































