लेख – मोकळेपणा कोंडला तर महानगरं गुदमरतील

>> अजित कवटकर, [email protected]

माणसांच्या गर्दीने गजबजलेली शहरं ही मोकळेपणात श्वास घेतात, परंतु हाच मोकळेपणा जेव्हा कोंडला जातो तेव्हा ही महानगरं गुदमरू लागतात. त्यांच्या निरोगी अस्तित्वासाठी शहरांतील मैदानं, उद्यानं, पार्क, समुद्र – नदी – तलाव किनारे, पाणथळ जमिनी, खाडय़ा, वन-आरक्षित जमिनी वगैरेंवर अतिक्रमण होण्यापासून, त्या अनारक्षित होण्यापासून, त्यांच्यावरील वनस्पती आच्छादन हटविण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण करणे गरजेचे आहे. आज मॉस्को, सिंगापूर, सिडनीसारख्या विकसित शहरांचा जवळपास पन्नास टक्के भाग हा ‘पब्लिक ग्रीन स्पेसेस’नी व्यापला आहे. मानव विकास, पर्यावरण संतुलन, हवामान बदल, स्वच्छता इत्यादींच्या दृष्टीने केलेल्या या उपाययोजना आहेत आणि म्हणूनच जीवन गुणवत्तेच्या स्तरावरदेखील ही शहरं शिखराच्या दिशेने वाटचाल करत आहेत, पण आपल्या इथे मात्र असलेल्या मोकळ्या हरित क्षेत्रांवरच विकासाच्या नावाखाली अतिक्रमण होताना पाहायला मिळणे दुर्दैवी आहे.

हिंदुस्थानची आर्थिक राजधानी मुंबई. इथल्या स्थानिकांसाठी, भूमिपुत्रांसाठी ती मायभूमी, कर्मभूमी, पण काही जणांना ती बहुधा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटत असावी. म्हणून की काय, तिचे पोट फाडून एकदाच काय ते सगळं ओरबाडून काढण्याचा घाट घातला जात आहे. अशी भीती निर्माण करणाऱया अनेक हालचाली आकार घेत असल्याचे जाणवू लागले आहे. जागतिक कीर्ती लाभलेल्या या शहराला जागतिक दर्जाच्या सेवासुविधा मिळणे अत्यावश्यक आहेतच, परंतु ते करत असताना इथली संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य, प्राकृतिक ठेवण, परिसंस्था, भूमिपुत्र जपणे त्याहूनही अधिक गरजेचे आहे, परंतु त्यादृष्टीने आज तसे जाणीवपूर्वक, प्रयत्न केले जात आहेत का, की त्याच्या अगदी विपरीत होत आहे?

औद्योगिकीकरणाचे किती जरी विकेंद्रीकरण होत असले तरी मुंबईत होत असलेले स्थलांतर हे दिवसागणिक वाढतच चालले आहे. इतके की, हा फुगवटा जर एका मर्यादेपलीकडे जाऊ दिला तर तो एके दिवशी विस्फोटक ठरू शकेल. तसे असले तरी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार कोणीही हिंदुस्थानी नागरिक हा देशात कुठेही नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने संचार करू शकतो किंवा तात्पुरता वा कायमचा स्थायिक होऊ शकतो. याकारणाने मुंबईसारख्या महानगरांवरील ताण हा इतका वाढतो आहे आणि तो इतका वाढू दिला जात आहे की, शहर नियोजन म्हणून तयार होणाऱया आराखडय़ाला काही तर्कसंगत धोरणांचा आधार दिला गेला आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. एखाद्या शहराचा खरा विकास हा केवळ काँक्रिटीकरणाच्या प्रसारातून मोजणे योग्य नाही, तर समाधान, आनंद, आरोग्य, स्वच्छता इत्यादी मापदंडांवर त्याने उच्चांक गाठणे आवश्यक आहे. महानगरांतील दरडोई उत्पन्न, राहणीमान जरी इतरांच्या तुलनेत अधिक असले तरी इथला हरवत चाललेला मोकळेपणा हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्याच्या ऱहासास कारणीभूत ठरला आहे. हिरवळीमुळे लाभणाऱया सौंदर्याची सर ही या जगात इतर कशातच नसल्याकारणाने झाडांच्या गर्दीने व्यापलेला मोकळेपणा मोकळा करून तिथे विकासाच्या नावाखाली उभारला जाणारा निर्जीवपणा हा तेथील कुठल्याच सजीवाला सुखी तर करू शकत नाही, पण त्याचा आनंद मात्र दूषित करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

माणसांच्या गर्दीने गजबजलेली शहरं ही मोकळेपणात श्वास घेतात, परंतु हाच मोकळेपणा जेव्हा कोंडला जातो तेव्हा ही महानगरं गुदमरू लागतात. त्यांच्या निरोगी अस्तित्वासाठी शहरांतील मैदानं, उद्यानं, पार्क, समुद्र – नदी – तलाव किनारे, पाणथळ जमिनी, खाडय़ा, वन-आरक्षित जमिनी वगैरेंवर अतिक्रमण होण्यापासून, त्या अनारक्षित होण्यापासून, त्यांच्यावरील वनस्पती आच्छादन हटविण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यांच्या अस्तित्वात निर्माण झालेल्या मोकळेपणामुळे तेथील हवा खेळती राहते, स्वच्छ राहते, प्रदूषणविरहित राहते. अशा सार्वजनिक मोकळ्या जागा या तेथील स्थानिकांसाठी विरळ होत चाललेल्या विरंगुळ्याचे एक हक्काचे ठिकाण ठरते. शांत, मोकळ्या ठिकाणी येऊन, फेरफटका मारून बोलत बसण्यासाठीचे ते एक केंद्र बनते. जागेची कमतरता भेडसावणाऱया महानगरांत मग व्यायाम म्हणून चालण्यासाठी, धावण्यासाठी अशी ठिकाणं सर्वात सुंदर व आरोग्यदायी पर्याय ठरतात. तेथील वनराई ही केवळ प्रदूषणच नव्हे, तर उष्णतेवर आपल्या शीतलतेचा शिडकावा करून हवा शुद्ध व तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. वन्य जीवांना अधिवास देते. वन्य जीवांचा सहवास हा आपल्याला आपल्या वेदना, चिंता या काही क्षणांसाठी का होईना, पण विसरायला मदत करतो. असे वातावरण हे मानसिक संतुलन स्थिर व आनंदी राखण्यास कामी येते. आजच्या धकाधकीच्या तणावग्रस्त जीवनशैलीत आपल्या अवतीभवती असा एखादा हिरवागार मोकळेपणा असल्यास कामाचा ताण घालवता येतो. अशाच नैसर्गिक साधनांच्या कमतरतेमुळे आज शहरवासी अनेक विकारांना, आजारांना सहज बळी पडू लागले आहेत. शालेय वयोगटाची शारीरिक व मानसिक जडणघडण ही बऱयाच अंशी खेळाच्या मोकळ्या मैदानांवर होत असते. त्यांच्यामधील उपजत, परंतु सुप्तावस्थेत असणाऱया कलागुणांना, कौशल्याला अशा मोकळेपणात प्रोत्साहन, सर्जनशीलता प्राप्त होते. म्हणूनच शहर नियोजनात टप्प्याटप्प्यावर अशा मोकळेपणाला उद्यानं, मैदानं, अभयारण्यं इत्यादींच्या रूपात रुजवणे अत्यावश्यक आहे.

परंतु आज महानगरांतील जमिनीच्या किमती गगनाला भिडणारी झेप घेत असल्यामुळे तेथील प्रत्येक इंच जमीन ही स्वाभाविकपणे व्यावसायिक उपयुक्ततेच्या दृष्टीनेच बघितली जाते, वापरली जाते. जमीन हे आज श्रीमंत संसाधन झाले असल्याकारणाने ती मोकळी सोडणे हे आजच्या शुद्ध व्यावहारिक मानसिकतेच्या अर्थकारणाला मोठे नुकसानकारक वाटते. यातूनच नैसर्गिकतेला हटवून हिरवळीचा आभास निर्माण करणारी काँक्रीट जंगलं आज वाढताना दिसत आहेत. मुंबईचे प्रदूषण हे आज उच्चांक गाठण्यासाठीच्या स्पर्धेत उतरल्याचे जाणवत आहे. याचे एक प्रमुख कारण हे लुप्त केल्या जाणाऱया मोकळ्या जागा हे होय. त्या जागी टोलेजंग इमारती बांधणे हा जणू तेथील अनैसर्गिक नियमच बनू पाहत आहे. त्यामुळे तेथील घनतेला मर्यादा राहिलेल्या नाहीत किंवा त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे हे निदान मुंबईवरून तरी आज स्पष्ट दिसते.

आज मॉस्को, सिंगापूर, सिडनीसारख्या विकसित शहरांचा जवळपास पन्नास टक्के भाग हा ‘पब्लिक ग्रीन स्पेसेस’नी व्यापला आहे. मानव विकास, पर्यावरण संतुलन, हवामान बदल, स्वच्छता इत्यादींच्या दृष्टीने केलेल्या या उपाययोजना आहेत आणि म्हणूनच जीवन गुणवत्तेच्या स्तरावरदेखील ही शहरं शिखराच्या दिशेने वाटचाल करत आहेत, पण आपल्या इथे मात्र असलेल्या मोकळ्या हरित क्षेत्रांवरच विकासाच्या नावाखाली अतिक्रमण होताना पाहायला मिळणे दुर्दैवी आहे. मोकळ्या परिसरात, मोकळ्या हवेत, मनमोकळेपणाने फिरायला मिळणे हा नागरिकांचा हक्क म्हणून सरकार – प्रशासनाने बघणे अनिवार्य आहे आणि त्याच दृष्टीने असे परिसर राखणे, वाढविणे, समृद्ध करणारे कणखर धोरण आखल्यास बरेच काही सुंदर, समाधानी, निरोगी होईल.