
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
कोणालाही स्वतःची अशी ओळख असतेचआणि ती जपण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नही करत असतो. लहान मुलांनाही त्यांची गुणवैशिष्टय़े, आवडीनिवडी याबाबत इतरांशी तुलना होणे, कमी लेखले जात असेल तर त्यांना अपमानास्पद वाटू शकते.
सुहास (नाव बदलले आहे) आता दहावीत होता. साहजिकच त्याच्या घरचे वातावरण दहावीमय झाले होते. टय़ुशन्स, शाळा आणि दर आठवडय़ाच्या परीक्षा या सर्वांमध्ये तो बिझीच (?) असायचा. सुहासला त्याच्या वडिलांसारखा बिझनेस करायचा होता. त्यामुळे त्याचा आतापर्यंत अभ्यास तसा व्यवस्थितच होता.
तो रविवारचा दिवस होता. सुहासचे वडील घरीच होते. आई किचनमध्ये होती. तेवढय़ात तिला सुहासच्या वडिलांच्या किंचाळण्याचा आवाज आला. ती एकदम घाबरली आणि त्यांना ‘काय झालं?’ असं विचारत धावली. आईने समोर सुहासकडे बघितलं आणि तीही किंचाळली. त्याचा धाकटा भाऊही एकदम झाल्या प्रकाराने बावरून गेला होता. सुहासने आपल्या मनगटाला कापून घेतलं होतं. त्याच्या आईवडिलांनी पटकन सुहासला डॉक्टरांकडे नेलं.
‘हा असं काही करेल असं वाटलं नव्हतं हो मॅडम.’ सुहासची आई आता त्याला घेऊन समुपदेशनासाठी आली होती. सुहास केबिनबाहेर बसला होता. त्याची आई त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार समुपदेशनास आली होती.
‘सुहास यापूर्वी असा काही वागला होता का?’ असं विचारताच ती पटकन उत्तरली ‘नाही. कधीच नाही.’ ‘मग त्याच्या वागण्यात काही बदल? ‘हो’ असं म्हणून तिने सुहासबद्दल सांगायला सुरुवात केली.
तिच्या म्हणण्यानुसार सुहास हा लहानपणापासूनच अतिशय साधाभोळा असा मुलगा होता. तो कोणातही पटकन मिसळत नसे. अभ्यासातही त्याची प्रगती समाधानकारक अशी राहिली होती. पण; अभ्यास तो प्रामाणिकपणे करायचा. ‘हल्ली हल्ली तो शांत झालाय. अभ्यासाचं काही टेन्शन आलंय का हेही त्याला मी विचारलं. पण तो नाही असं म्हणाला. त्याचं
खाण्यापिण्यातलं लक्षसुध्दा उडालंय. त्याला भूकच लागत नाही असं तो म्हणत असतो. आजसुद्धा सकाळी साडेसहा वाजता त्याने चहा घेतला आणि आता संध्याकाळचे पाच वाजत आहेत तरी त्याने काहीही खाल्लेलं नाही.’ आई रडतच हे सर्व सांगत होती.
‘ठीक आहे. मी सुहासशी बोलते. आपण यातून मार्ग काढू.’ असं सांगत तिला बाहेर बसण्याची विनंती केली.
आता सुहास आत केबिनमध्ये समोर बसला होता. त्याला काही विचारण्याची गरजच पडली नाही. कारण त्याने स्वतःच सांगायला सुरुवात केली. ‘मला कोणाला तरी भेटायचं होतं. मी आता मनःशांतीच्या शोधात आहे..’ सुहास बोलताना त्याच्या
वयाच्या मानाने बराच परिपक्व वाटला.
‘हात का कापून घेतलास?’
‘मला स्वतःला संपवण्याचे विचार हे गेले वर्षभर येत आहेत. त्या दिवशी मी प्रयत्न केला.’
‘पण का?’
‘मला स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल तिरस्कार वाटायला लागला आहे. मी दिसायला सामान्य आहे. त्यात किरकोळ आणि माझे वडील माझ्या विरुद्ध. ते भरपूर हेल्दी आणि फिट आहेत. दिसायलाही हँडसम.’ सुहास त्याच्या न्यूनगंडतेचे आणि त्याला आलेल्या पराकोटीच्या नैराश्याचे कारण सांगून गेला. त्याची समस्या निश्चितच गंभीर आणि दखल घेण्यापात्र होती.
सुहासचे वडील हे स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या करत होते. व्यवसायाच्या निमित्ताने ते फिरतीवरही असायचे. त्यांनी स्वतःला बऱयापैकी ‘Maintain’ ठेवलं होतं. तशीच अपेक्षा ते सुहासबाबतीत करत होते. सुहास हा अंगकाठीच्या बाबतीत लहानपणापासून किरकोळ होता. त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखं त्याचं खाणंपिणं नसायचं. हेच त्याच्या वडिलांना खटकायचं. त्यावरून ते सतत त्याच्यावर चिडायचे. त्याच्या वर्गातल्या, त्यांच्या सोसायटीतील तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या मुलांबरोबर त्याची तुलना करत राहायचे. त्याच्या खाण्यापिण्यावर, चालण्या-बोलण्यावर त्यांचं नको तितकं लक्ष असायचं.
या सगळ्यामुळे मुळातच बुजरा असलेला सुहास अधिकाधिक कोषात जात होता. गंभीर होत होता.
आपल्या मनातली खळबळ त्याने ओठांच्या आत दडवून टाकली. वरवर शांत दिसणारा सुहास आतल्या आत निराशेच्या, न्यूनगंडाच्या गर्तेत जात होता. इतरांशी तुलना नको म्हणून त्याने त्याच्या सगळ्या मित्रांशी संपर्क तोडला. घरीही तो आईखेरीज कोणाशीही बोलत नसे. सारखं खाण्यापिण्यावर ऐकून घेऊन त्याची त्यावरची वासनाही उडाली होती. रात्रीची शांत झोप तर कुठच्या कुठे गायब झाली होती. एवढा त्रास तो सहन एवढय़ासाठीच करत होता, कारण त्यावरूनही त्याची तुलना इतरांशी केली गेली असती. त्याचं वडिलांना टाळणं, आयुष्याबद्दल गंभीर विचार करणं, स्वतःच्या वस्तू (सायकल) धाकटय़ा भावाला देणं ही सर्व नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांची लक्षणं त्याने हाताचं मनगट कापल्यावर त्याच्या घरच्यांना लक्षात आली.
कोणालाही स्वतःची अशी ओळख असतेच. स्वतःची अशी काही गुणवैशिष्टय़ेही असतात आणि ती जपण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नही करत असतो. लहान मुलंही त्याला अपवाद नाहीत. पण आपल्या पालकांकडून त्यांच्या गुणवैशिष्टय़ांवर अथवा आवडीनिवडीवर जर सतत इतरांशी तुलना आणि त्यावरून कमी लेखले जात असेल तर त्यांना अपमानास्पद वाटू शकते.
पालक-मुलांचे नाते हे मैत्रीचे आणि मोकळेपणाचे असावे ह्याचा अर्थ हाच की मूल हे घरच्या मोकळ्या वातावरणातच शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा निकोप वाढू शकते. त्याला एक प्रकारचा विश्वास मिळतो की, आपण आपल्या घरात आपल्या गुणदोषांसकट सगळ्यांना आवडतो. जर कुठल्या घरी याच्याविरुद्ध वातावरण असेल तर मुलांच्या भावनात्मक (नैराश्य, राग, भीती, चिंता), वर्तनात्मक (आक्रस्ताळेपणा, अबोला, एकटे राहणे), वैचारिक (अतिविचार) आणि शारीरिक (किरकोळ तक्रारी) समस्या सुरू होऊ शकतात.
सुहासच्या बाबतीत थोडय़ाफार फरकाने या सर्व समस्या होत्या आणि त्यांनी टोक गाठले होते. त्याचीच परिणती आत्महत्येच्या प्रयत्नाने झाली. त्याचा जीवनातला रस संपला होता. सुरुवातीच्या सेशन्समध्ये त्याच्यावर औषधोपचार सुरू करावे लागले. त्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागली. त्याचबरोबर त्याच्या पालकांचेही समुपदेशन सुरू करण्यात आले.
आज सुहास आणि त्याचे आईवडील हे तिघेही समुपदेशन घेत आहेत. याचा चांगला परिणाम निश्चित होईलच ही खात्री आहे. पण, सुहासच्या उदाहरणाने एकच नमूद करावेसे वाटते की आपल्या मुलांची दुसऱयाशी तुलना करायचीच झाली तरी ती सकारात्मक दृष्टिकोनातूनही करता येऊ शकते. यालाच ‘आदर्श उदाहरण’ देणे (Role Models) असे म्हटले जाते. अशा पद्धतीचे सांगणे मुलांना लगेच समजते आणि त्यांच्यावर शक्यतो नकारात्मक परिणाम होत नाही. एका सकारात्मक विचारातूनच ती स्वतःमध्ये बदल घडवू लागतात. मात्र एक खरं की या जगात कोणीही परिपूर्ण (Perfect) नाही आणि होऊही नये. नाहीतर स्व-विकासाला चालनाच मिळणार नाही.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]





























































