‘आगळा’ कैलासपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सरिता विनय भावे

जगभर ख्याती असलेला, आपल्या ‘पुद्दूचेरी’ या केंद्रशासित प्रदेशाचे ‘राज्यफूल’ असलेला, फांद्यांच्या विस्तीर्ण जटांचा गुंताडा आणि हिरवीगार पाने-लालगुलाबी फुले-तपकिरी फळे असे रंगीबेरंगी ‘अलंकार’ एकाच वेळी अंगावर मिरवणारा हा आगळावेगळा वृक्ष तपस्वीही भासतो; समाधानी-कुटुंबवत्सल गृहस्थासारखाही वाटतो. नकळतच त्याच्या अनोख्या रूपापुढे आपण भक्तिभावाने नतमस्तक होतो!

वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी अनेक महत्त्वाच्या वृक्षांना धार्मिक अधिष्ठान दिले आहे. पण कुठल्याही धार्मिक गोष्टीशी निगडित नसूनही मूळचा मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील असूनही हिंदू आणि बौद्ध धर्मात महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेला वृक्ष म्हणजे ‘कैलासपती’ होय. वैशिष्टय़पूर्ण फुले आणि मोठय़ा तोफगोळ्यासारख्या फळांमुळे निराळाच दिसणारा हा दुर्मिळ वृक्ष स्वार्थी मानवाकडून अवास्तव ओरबाडला जाऊ नये म्हणून अशी चतुर व्यवस्था करणाऱया आपल्या पूर्वजांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.

शोभिवंत फुले येणारे हे झाड बरेच उंच वाढते. हिरवीकंच पाने फांदीच्या टोकाला गुच्छाने येतात. फुले तर थेट खोडालाच लागलेली असतात. याबाबतीत हे झाड इतरांपेक्षा खूपच वेगळे असल्याने अगदी उठून दिसते. भल्या पहाटे किंवा भर रात्री, एकाच वेळी अक्षरशः हजारो सुगंधी फुले बहरून आली असताना, दुरूनही ओळखू यावा असा धुंद परिमळ जाणवतो. फुलांत मधुरस नसला तरी भुंगे, मधमाश्या सुवासामुळे आकर्षित होऊन कायम या फुलांभोवती घोंघावत असतात. लाल-गुलाबी रंगाची झाक असलेल्या, टोकाला पिवळ्या असलेल्या सहा मेणचट पाकळ्यांनी फूल बनते. फुलाचा आतील आकार आडव्या इंग्रजी ‘ळ’ अक्षरासारखा वाटतो. अगदी मध्यभागी शिवलिंगाच्या आकारासारखा फलनक्षम पुंकेसरांचा गुच्छ असतो. अफलनक्षम पुंकेसरांचा नागाच्या फण्यासारखा गुच्छ मधल्या शिवलिंगाच्या गुच्छावर झुकलेला असतो. आपल्या अळ्यांना भरवण्यासाठी अफलनक्षम पुंकेसर गोळा करत असताना भुंग्यांच्या अंगावर फलनक्षम पुंकेसरातील परागकण पडतात. दुसऱया फुलावर जाऊन बसल्यावर त्यांच्या अंगावरचे हे फलनक्षम परागकण या दुसऱया फुलातील स्त्राrकेसरावर पडून परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होते.

फुले महादेवाला अर्पण केली जात असल्याने महादेवाच्या देवालयांच्या आसपास आणि स्त्राrकेसराच्या गोलाकाराचे बुद्धस्तूपाशी साम्य असल्यामुळे बुद्धविहारांनजीक या झाडाची लागवड केली जाते. वर वर्णिलेल्या दोन प्रकारच्या पुंकेसरांच्या विशिष्ट रचनेमुळे या झाडाला ‘नागचाफा’ही म्हणतात. नागलिंग, तोपगोला (हिंदी), नागलिंग फूल (बंगाली), नागलिंग पुष्प (कानडी), नागलिंगम (तामीळ), नागमल्ली (तेलुगू), नागदंती (मल्याळम), नागकेसर (ओरिया) अशी इतर भाषांत याची नावे आहेत. ‘कैलासपती’ असे धीरगंभीर नाव धारण करणाऱया या वृक्षाला वनस्पतीशास्त्रातही Couroupita guianensis असे क्लिष्ट नाव मिळाले आहे. अर्थात महादेवाशी निगडित असलेल्या वृक्षाला नावच काय, नाजूकसाजूक असे काहीच शोभून दिसणार नाही म्हणा!

झाडावर एकाच वेळी 150 फळे लगडलेली असू शकतात. फळे तपकिरी, जड, गोलाकार असून त्यांच्या दणकट, लाकडी कवचामुळे आणि खाली पडताना होणाऱया जबरदस्त आवाजामुळे या झाडाला इंग्रजीत ‘कॅननबॉल (तोफगोळा) ट्री’ असेही म्हणतात. (कपाळमोक्ष टाळण्यासाठी झाडाजवळून जपून जाणे जास्त श्रेयस्कर). फळ परिपक्व व्हायला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागतो. फळ खाली पडल्यावर फुटून किंवा डुक्कर, कोंबडी या प्राण्यांकडून फोडले जाऊन आतील दुर्गंधयुक्त गर आणि बिया (साधारणतः 500) बाहेर पडतात. जितकी सुगंधी फुले तितकीच अतिदुर्गंध फळे असे निराळेच वैशिष्टय़ असणारे हे झाड त्वचारोग, हिवताप, सर्दी-खोकला, कृमी, पोटदुखी, दातदुखी, जखमा अशा विविध विकारांवरही उपयुक्त आहे.

जगभर ख्याती असलेला, आपल्या ‘पुद्दूचेरी’ या केंद्रशासित प्रदेशाचे ‘राज्यफूल’ असलेला, फांद्यांच्या विस्तीर्ण जटांचा गुंताडा आणि हिरवीगार पाने-लालगुलाबी फुले-तपकिरी फळे असे रंगीबेरंगी ‘अलंकार’ एकाच वेळी अंगावर मिरवणारा हा आगळावेगळा वृक्ष तपस्वीही भासतो; समाधानी-कुटुंबवत्सल गृहस्थासारखाही वाटतो. नकळतच त्याच्या अनोख्या रूपापुढे आपण भक्तिभावाने नतमस्तक होतो!

– [email protected]