>> नागोराव येवतीकर
वीस-पंचवीस वर्षांनंतर आज गावाकडे जाण्याचा योग आला. लहानपणी ज्या गावात ज्या ठिकाणी खूप दंगा मस्ती, लपंडाव, क्रिकेट असे खेळ खेळायचो त्या जागा आज लुप्त झाल्या होत्या. शाळेचे मैदान बंदिस्त झाले होते. गावातील खुले मैदान म्हणजे शाळेचे मैदान, पण आज शाळा सुरू असेल तरच शाळेत प्रवेश करता येतो. कारण चहूबाजूनी शाळेला बंदिस्त केले होते. शाळा पहिल्यासारखी राहिली नव्हती. दोनच खोल्यांची शाळा आज सात-आठ खोल्यांची झाली होती. सुट्टीच्या दिवशी शांत वाटणारी शाळा इतर दिवशी मुलांच्या आवाजाने गलबलून जायची.
शाळेच्या काही अंतरावर एक मोठे चिंचेचे झाड होते. त्या ठिकाणी एकटय़ाला जाणे तेव्हा खूप भीतीदायक वाटायचे. आम्ही एकटे तिकडे कधीच जायचो नाही. चिंचा पाडायला दोघे-तिघे मिळून जायचो. थोडय़ाफार चिंचा घेऊन गुपचूप शाळेत येऊन बसायचो. आज मात्र त्या चिंचेच्या झाडाचे भय वाटत नाही. कारण ते चिंचेचे झाड गावाचे बसस्थानक बनले आहे. पूर्वी त्या झाडाजवळ चिटपाखरू दिसत नव्हते, पण आज त्या झाडाखाली अनेक रिकामटेकडी माणसे दिवसभर गप्पा मारत असतात. त्याच्या आजूबाजूला काही दुकाने आणि हॉटेले चालू झाली आहेत. बस नाही आली तरी ऑटो थांबलेल्या असतात. गावाच्या पश्चिमेला एक मोठा तलाव आहे. त्यात नेहमी पाणी भरलेले असायचे. गावातील सर्वांचे कपडे धोबी त्या ठिकाणी आणून धुवायचे. संपूर्ण तलाव विविध रंगाने रंगून जायचे. पण आज या तलावात पाणी आहे, मात्र कोणीही त्या ठिकाणी कपडे धुवायला येत नाही. त्यामुळे तलाव विविध रंगी दिसत नाही. लोकं आपापल्या घरी कपडे धुऊन घेत आहेत. धोब्याची कामेदेखील कमी झाली आहेत.
तलावाच्या आजूबाजूला बोराची झाडे होती. त्यातील एका झाडाचे बोर खूपच गोड होते. त्याला खारका बोर असे नाव होते. ते एका मुस्लिम व्यक्तीच्या मालकीचे होते. ती म्हातारी बाई सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या झाडाखाली बसून राहायची. पाच पैशाला एक डबा बोर द्यायची. कधी तरी ती झाडाखाली नसताना आम्ही मुलं चोरून त्या झाडाची बोरं आणायचो. आज त्या जागेवर कोणतेच झाड शिल्लक नाही.
रविवारच्या दिवशी तळय़ात क्रिकेट खेळायला जायचो. दुपारपर्यंत खेळून परत घरी आल्यावर कधी कधी शिव्या मिळायच्या, पण क्रिकेट खेळणे सोडले नाही. आज ते मैदान दिसतच नाही. आजच्या मुलांना खेळायला जागाच नाही. आज मुलं पूर्वीचे कोणतेच खेळ खेळत नाहीत हे पाहून खूप दुःख वाटते. शाळेच्या परिसरात अशी अनेक फळांची झाडं होती तर घराच्या पाठीमागे सीताफळाचे झाड होते. सीताफळाची पिवळी फुले लागल्यापासून त्याची काळजी घेतली जात. दुपारच्या सुट्टीत एकदा घरी जाऊन झाडाखाली उभे राहून सर्व सीताफळ एकदा निरखून पाहिले जायचे. डोळे उघडलेले सीताफळ तोडून घरात एखाद्या मडक्यात ठेवले जायचे. रात्रीच्या जेवणानंतर त्या सीताफळाची सर्वांमध्ये वाटणी करून खाल्ले जायचे. त्याच्याच बाजूला एक चाफ्याचे झाड. ती पिवळी फुले पाहिली की मन मोहून जायचे.
घराच्या बाजूला एक विहीर होती. त्या विहिरीचे पाणी गावातील सर्व लोक पिण्यासाठी घेऊन जात. पावसाळ्याच्या दिवसांत हौदातून पाणी घ्यावे तसं त्या विहिरीतून पाणी घेतलं जायचं. ती विहीरदेखील आज नामशेष झाली आहे. सकाळी सकाळी येणारा तो पोहऱयाचा आवाजदेखील लुप्त झालाय. आज सर्वांच्या घरी सार्वजनिक नळाद्वारे पाणी येत आहे. त्यामुळे पाणी भरण्याचाही कोणाला अनुभव मिळत नाही. कष्टच कमी झाले म्हणून आज लोकांना विविध प्रकारच्या रोगांना बळी पडावे लागत आहे. गावाकडे जाणारा रस्ता मात्र बदलला नाही. पूर्वी जसा खाचखळग्याचा होता तसाच आहे.
गावातले रस्ते सिमेंटचे आणि नाल्याही बांधले गेले. त्यामुळे गावातून दुचाकी कोठेही फिरविता येऊ शकत होती. अगोदर सायकल चालविणे जिकिरीचे होते. गावातल्या अनेक जागा नामशेष झाल्या आहेत, मात्र त्याच्या आठवणी आज ही कायम आहेत.





























































