लेख – लॅटिन अमेरिका – नवीन आर्थिक शक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> परनित सचदेव

लॅटिन अमेरिकेत दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील 33 देशांचा समावेश होतो. लॅटिन अमेरिकेकडे जगातील निम्मे लिथियम, 35 टक्के तांबे आणि चांदी तसेच ग्रेफाईट, टिन, निकेल यांचा विपुल साठा आहे. एवढेच नाही तर चिलीमध्ये लिथियमसारखा महत्त्वाचा धातू वाळूच्या बाष्पीभवनातून बाहेर काढला जातो. जगातील एकूण सोयाबीनच्या निर्यातीत लॅटिन अमेरिकेचा वाटा हा 60 टक्के आहे. येत्या दहा वर्षांत या क्षेत्रातून खाद्यपदार्थांची एकूण निर्यात ही 100 अब्ज डॉलर पोहोचू शकते. दुर्लक्षित राहिलेल्या या उद्या उदयास येणाऱ्या आर्थिक शक्तीविषयी…

आजघडीला जगभरात कार्बन उर्त्सर्जन कमी करण्यासाठी भर दिला जात आहे. या कारणांमुळेच खनिजाला मागणी अचानक वाढली आहे. उदाहरणार्थ, साधारण वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना तांब्याची 400 पट अधिक गरज भासते. या शतकाच्या प्रारंभी चीनमध्ये उद्योगधंदे वाढल्यामुळे पोलाद आणि तेलाला प्रचंड मागणी वाढली. मात्र काही वर्षांतच त्यात घट होऊ लागली. दुसरीकडे धातू आणि खनिजाला प्रत्येक देशात मागणी राहणार असून ती अधिक शाश्वत आहे. एस ऍण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने 2022 मध्ये एक अंदाज व्यक्त केला आणि त्यानुसार 2035 पर्यंत जगभरातील तांब्याची मागणी 25 दशलक्ष टनांवरून ती दुप्पट होत 50 दशलक्ष टनांवर पोहोचेल. लॅटिन अमेरिकेच्या बहुतांश देशांना मिळणारा महसूल हा निर्यातीतून मिळतो. त्याचे प्रमाणही तब्बल 80 टक्के आहे.

लॅटिन अमेरिकेकडे जगातील निम्मे लिथियम, 35 टक्के तांबे आणि चांदी तसेच ग्रेफाईट, टिन, निकेल यांचा विपुल साठा आहे. एवढेच नाही तर चिलीमध्ये लिथियमसारखा महत्त्वाचा धातू वाळूच्या बाष्पीभवनातून बाहेर काढला जातो आणि ही प्रक्रिया खूप सोपी आहे. चीन आणि भारतात मात्र उत्खनन करत लिथियम काढणे खूपच किचकट व खर्चिक आहे. ब्राझीलमध्ये चुंबकीय तत्त्व असलेला दुर्मीळ वाळुकामय धातू पृष्ठभागावर सहजपणे सापडतो. ब्राझील आणि चिलीसारख्या देशात स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे. उदा. ब्राझीलमध्ये तयार होणाऱया आणि प्रयोगात वापरल्या जाणाऱया निम्म्या ऊर्जेचे उत्पादन हे पुनर्पक्रिया स्रोतातून केले जाते.

2030 पर्यंत स्वस्तात हायड्रोजन उत्पादन करण्यासाठी चिली सध्या दिवसरात्र मेहनत करत आहे. यातही सोन्याहून पिवळी बाब म्हणजे या भागात तेलाचा मोठा साठा सापडला आहे. एका अंदाजानुसार हा साठा 70 अब्ज बॅरलपेक्षा मोठा मानला जात आहे. 2030 पर्यंत अर्जेटिना, ब्राझील, मेक्सिको हे एकत्र आल्यास ते 11 दशलक्ष बॅरल तेल उत्पादित करू शकतात व (रिस्टेड एनर्जी) याप्रमाणे ते सौदीशी मुकाबला करू शकतील. सध्या सौदीत दररोज 12 दशलक्ष बॅरलचे उत्पादन होते. सौदी अजूनही जगातील दुसरा मोठा तेल उत्पादक आहे (संदर्भ वर्ल्डोमीटर). आता आहाराचा विचार केल्यास 2040 पर्यंत जगातील लोकसंख्या 9.1 अब्ज होऊ शकते (संदर्भ संयुक्त राष्ट्र). या हिशेबाने खाद्यपदार्थांची मागणीदेखील वाढेल. संयुक्त राष्ट्राच्या एका अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या 2080 पर्यंत 10 अब्ज 70 कोटी पोहोचेल. जगातील एकूण सोयाबीनच्या निर्यातीत लॅटिन अमेरिकेचा वाटा हा 60 टक्के आहे. याशिवाय ते कुक्कुट, साखर, कॉफीसह अनेक गोष्टींची निर्यात करतात. यामागचे कारण म्हणजे चीन आणि भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या आहे व त्यामुळे शेतीसाठी मोठा भूभाग उपलब्ध आहे. म्हणून येत्या दहा वर्षांत या क्षेत्रातून खाद्यपदार्थांची एकूण निर्यात ही 100 अब्ज डॉलर पोहोचू शकते.

हे क्षेत्र युरोपियन संघाप्रमाणेच अद्याप व्यापार क्षेत्र झालेले नाही. अशा वेळी लॅटिन अमेरिकेत तेल उत्पादक संघटना ‘ओपेक’प्रमाणे एक प्रादेशिक कमोडिटी ब्लॉक तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या नाहीत आणि तशी शक्यताही दिसत नाही. लॅटिन अमेरिकी देशात प्रचंड भ्रष्टाचार असून कमी ध्येयाच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणुकीला खूपच कमी वाव राहिला आहे. ब्रिटिश वर्तमानत्र ‘द इकॉनॉमिस्ट’नुसार चिलीने गेल्या काही दिवसांत तांबे खाण कंपन्यांवरचा कर हा तब्बल 47 टक्के वाढविला आहे. अर्थात तो जगातील सर्वाधिक आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्रादोर यांनी देशातील लिथियम साठय़ाचे राष्ट्रीयीकरण केले. असे निर्णय गुंतवणूकदारांना हमी देत नाहीत. जगातील तांब्याची जादा मागणी पूर्ण करण्यासाठी 2040 पर्यंत 575 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची गरज भासेल (वुड मॅकेन्झी, कॉपर आऊटलूक अहवाल). अन्य धातूंत आणि शेतीतदेखील अशा प्रकारची गुंतवणुकीची आवश्यकता भासणार आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी पश्चिम देशांतील कंपन्यांना लॅटिन अमेरिकेत आणावे लागेल. त्यामुळे नफा त्यांच्याच पदरात पडणे स्वाभाविक आहे.

इस्रायलच्या स्टीकहोल्डर फूड्ससारख्या कंपन्या लाइव्ह-3 डी प्रिंडेंट मांसांचे उत्पादन करतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान शेतीच्या माध्यमातून होणारे उत्पादन हे लॅटिन अमेरिकेच्या खाद्यनिर्यातीसाठी धोकादायक राहू शकते. कारण लॅटिन अमेरिका आपल्या जीडीपीचा केवळ 0.6 टक्केच खर्च संशोधन आणि विकासावर करते. यात आणखी एक जोखमीची बाब म्हणजे या क्षेत्रात अचानक परकीय गुंतवणूकही वाढू शकते. परिणामी चालू खाते गरजेपेक्षा अधिक सरप्लस होऊ शकते. अन्नपदार्थांची निर्यात करणेदेखील प्रसंगी महागडे ठरू शकते. या गोष्टीची शक्यता पाहता या क्षेत्रात दबदबा असलेल्या काही देशांत केंद्रीय बँकांसारखी स्वतंत्रपणे देखरेख करणारी व्यवस्था आहे. कारण एकदा निर्यातीने वेग धरला तर हे संपूर्ण क्षेत्र आर्थिक विवेकाच्या पातळीवर चुकीच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसू शकते.

मँकेन्झीच्या एका ताज्या अहवालात म्हटले की, लॅटिन अमेरिकी देशांत 80 टक्के स्टार्टअप युनिकॉर्नचे लक्ष हे फिनेटक आणि ई-कॉमर्सवर केंद्रित आहे. तरीही या क्षेत्रात आठपट अधिक बौद्धिक संपत्ती (कुशल मनुष्यबळ) आयात होते. अशा वेळी आर्टिफिशल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाने गगनभरारी घेतली तर लॅटिन अमेरिका सहजपणे अन्य क्षेत्रांच्या तुलनेत मागे पडेल. अर्थात लॅटिन अमेरिकेच्या साम्राज्यातील लक्ष्मी या संपूर्ण भागावर प्रसन्न आहे, परंतु लॅटिन अमेरिकेतील 33 देश यशस्वी ठरतील का? या संधीचा लाभ कसे उचलतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत.)