`एआय’, `चॅट जीपीटी’ आणि चित्रपट उद्योग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सनत्कुमार कोल्हटकर

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आणि `‘चॅट जीपीटी’च्या वापराचा चित्रपट उद्योगावर नेमका काय परिणाम होणार आहे याचा पूर्ण अंदाज आला नसला तरी जो काही ‘आवाका’ या तंत्रज्ञानाने गाठला आहे त्याने अभिनेते, संवाद लेखक, कथा व पटकथा लेखक यांच्या पोटात गोळा आला आहे हे निश्चित. ज्याला इंग्लिशमध्ये ‘अननोन टेरिटरी’ (अज्ञात प्रदेश) म्हटले जाते तसे `‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान’ आणि ‘चॅट जीपीटी’ या दोघांचा अमर्यादित आवाका आहे. त्याचा पुरेपूर वापर / उपयोग चित्रपट निर्मात्यांकडून होणार हे उघड आहे.

सिनेमा हिंदी असो की इंग्रजी, तो आवडीने बघणारे लगेच सांगू शकतील की, उत्तम चित्रपटाचा गाभा कोणता तर त्या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद, योग्य पात्रांची निवड वगैरे आणि अर्थातच पात्ररचना. अर्थात हे जगातील सर्वच देशांतील आणि सर्व भाषांमधील चित्रपटांना लागू होणारे तत्त्व आहे. हिंदी चित्रपटांमध्ये एकेकाळी सलीम जावेद यांचे नाव आवर्जून चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिलेले असायचे. सलीम जावेद हे चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहीत असत. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकृष्ट करण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक जेवढा महत्त्वाचा असायचा तेवढाच कथा, पटकथा लिहिणारा असावयाचा. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे हॉलीवूडमधील डिस्ने, ट्वेन्टीएथ सेंचुरी फॉक्स, पॅरामाऊंट आणि इतर तत्सम बड्या कंपन्यांकडून जे चित्रपट बनविले जातात आणि वितरित केले जातात. तेथेही चित्रपटाचा दिग्दर्शक आणि ‘स्क्रिप्ट’ लिहिणारा या दोघांमुळे त्यांनी बनविलेला चित्रपट हा रसिकांना आकृष्ट करतो.

पण हॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटाचे केवळ स्क्रिप्ट लिहिणार्‍या लेखकांना पुरेसे मानधनच दिले जात नाही अशी अनेक वर्षे तक्रार होती आणि अजूनही ती तक्रार कायम आहे. त्यामुळे हे सर्व जण रस्त्यावर उतरले असून त्यांचा अमेरिकेत संप चालू होता. या संपकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी तेथील चित्रपट कलाकार, वेब सीरिज कलाकार हेही रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. ‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ ही या संपकर्‍यांची संघटना असून त्या संघटनेकडून त्यांनी या संपकरी लोकांकडून पूर्वी वेळोवेळी सभासदत्व शुल्क आणि ‘इमर्जन्सी’ फंड जो गोळा केला होता त्यामधूनच थोडी रक्कम या संपकर्‍यांच्या उदरनिर्वाहासाठी देणे या संघटनेला भाग पडत आहे. त्यात `एआय’ (आर्टिफिशल इंटेलिजन्स) अणि `चॅट जीटीपी’मुळे ही मंडळी भयभीत झाले आहे. `चॅट जीपीटी’मार्फत एखादे कथासूत्र आणि त्याला पूरक असणारी माहिती त्याला देण्यात आली की, या सॉफ्टवेअरमार्फत एकदम तयार स्क्रिप्ट थोडक्या काळात हातात येते. अर्थात हे स्क्रिप्ट पूर्णपणे स्वीकारता येण्याजोगे नसले तरी स्क्रिप्ट रायिंटगमधील आराखडा आणि इतर बरीच कामे ‘चॅट जीपीटी’मुळे सुलभ होतात हे सत्य आहे. त्यामुळे बाडच्या बाड स्क्रिप्ट लिहिण्याचे कष्टप्रद काम आता ‘चॅट जीपीटी’मार्फत होणार आहे. त्यामुळे एखादा अनुभवी आणि मुरलेला स्क्रिप्ट लिहिणारा हे सॉफ्टवेअरकडून मिळालेले स्क्रिप्ट तपासून त्यामध्ये रूपरेषा, विषय, भाषाशैली यामध्ये सुधारणा करून वापरू शकतो. येणार्‍या काळात हे काम हळूहळू का होईना, सुलभ आणि सोयिस्कर होत जाणार आहे. त्यामुळे स्क्रिप्ट लिहिणार्‍या अनुभवी लोकांची गरज कमी कमी होत जाणार आहे. गरजेनुसार ‘चॅट जीपीटी’च्या नवनवीन आवृत्त्या येत जातील आणि हे काम जास्तीत जास्त सोपे कसे होईल याकडे लक्ष दिले जाऊ शकते. त्यामुळे स्क्रिप्ट तपासणार्‍यांची गरज यापुढील काळात वाढणार आहे, पण यामुळे आपला रोजगार जाऊ शकतो या कल्पनेने हे संपकरी हैराण झालेले आहेत. या नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाचा आवाका आणि वेग जबरदस्त असून लोकांना हे बदल स्वीकारून भविष्यासाठी सज्ज होणे आवश्यक बनले आहे. जे लोक या तंत्रज्ञानाशी लवकरात लवकर जुळवून घेतील तेच या क्षेत्रात टिकू शकतील ही वस्तुस्थिती आहे. चित्रपट निर्माते त्यांचे पैसे वाचत असतील तर या तंत्रज्ञानाच्या उपयोगाला प्राधान्य देणार हे स्पष्ट आहे.

`चॅट जीपीटी’ तंत्रज्ञान हे काही कामे फटाफट स्वयंचलित करून विविध व्यवसाय आणि करीअर यांच्यामध्ये याआधी कधीही न झालेला बदल घडवून आणीत आहे. काही सर्जनशील (क्रिएटिव्ह) व्यवसाय बदलत आहेत आणि काही नवीन व्यवसायही जन्माला येणार आहेत. जनरेटिव्ह `एआय’मध्ये (कृत्रिम बुद्धिमत्ता) लोगो लेआऊट्स आणि इतर व्हिज्युअल घटकांचे डिझाइन स्वयंचलित करण्याची क्षमता आहे. जनरेटिव्ह एआयचा लेखन आणि साहित्यनिर्मिती उद्योगांवरही परिणाम झाला आहे. `चॅट जीपीटी’, विशेषत: लेख, कथा आणि इतर लिखित सामग्री तयार करण्यासाठी वापरले जात आहे. `ओपन एआय’सारख्या कंपन्यांनी असे मॉडेल विकसित केले आहे, ज्यामुळे बातम्या, लेख आणि एवढेच काय, या तंत्रज्ञानामुळे लेखनसाहित्य तयार करणे सोपे झाले आहे. अर्थात यामुळे एकूणच लिखाणाच्या गुणवत्तेवर होणार्‍या परिणामाबद्दलही चिंता निर्माण झाली आहे, पण त्यावरही पुढील काळात उपाय सापडू शकतात ही वस्तुस्थिती आहे.

‘चॅट जीपीटी’चा वापर करून एखाद्या प्रसंगासाठी गीताचे शब्द सुचविण्यास ‘चॅट जीपीटी’ला सांगितले तर वेबवरील उपलब्ध शब्द संचयातून कच्चा माल ‘चॅट जीपीटी’ देऊ शकेल. मग त्या शब्दभांडारातून घासूनपुसून कदाचित एखादे गीत बनूनही जाऊ शकते. त्या गीताला यमकात बसवायचे असेल तर गीतकार त्या गीतामध्ये थोडेफार बदल करून त्याला नवीन रूपडे देऊ शकतो. `चॅट जीपीटी’ला वाद्यांची माहिती देऊन या गीतासाठी एखादा र्‍िहदम सुचविण्यास सांगितला तर तोही मोडक्यातोडक्या ‘नोटेशन’मध्ये मिळू शकेल. हे सर्व ‘जर…तर’ यामध्ये बसणारे नाही, तर ‘चॅट जीपीटी’चा अमर्यादित आवाका कळावा म्हणून मांडलेले आहे. एखाद्या पटकथेचा जसा ‘उत्तरार्ध’ लिहिला जातो तसे ‘चॅट जीपीटी’च्या सहाय्याने ‘पूर्वार्ध’ ही मिळू शकतो. अर्थात तो कितपत समर्पक असेल याबाबत शंका असली तरी याचा आवाका कळू शकतो.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आणि `चॅट जीपीटी’च्या वापराचा चित्रपट उद्योगावर नेमका काय परिणाम होणार आहे याचा पूर्ण अंदाज आला नसला तरी जो काही ‘आवाका’ या तंत्रज्ञानाने गाठला आहे त्याने अभिनेते, संवाद लेखक, कथा व पटकथा लेखक यांच्या पोटात गोळा आला आहे हे निश्चित. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची झेप एवढी मोठी आहे की, ज्या प्रसिद्ध अभिनेत्याचे यापूर्वीच निधन झाले आहे, त्यांची उपलब्ध असणारी छायाचित्रे, मुद्रित केला गेलेला आवाज, वेगवेगळ्या संवादफेकीमध्ये वापरला गेलेला आवाज यांचा मेळ घालून त्या अभिनेत्याकडून छोटी भूमिकाही एखाद्या नवीन चित्रपटातून पार पडताना दिसेल. तसेच एखाद्या अभिनेत्याला एक किंवा दोन दिवसांचे मानधन देऊन विविध कपड्यांतील त्याची छायाचित्रे आणि विविध आवाजातील संवाद मुद्रित करून त्याचा उर्वरित चित्रपटात वापर केला जाण्याची भीती या अभिनेत्यांना वाटते आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांशी करार करताना ‘कृत्रिम बुद्धिमते’च्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर उर्वरित चित्रपट निर्मिती होणार असेल तर त्याबद्दल करारामध्ये उल्लेख करावा लागेल अशी मागणी केली जाऊ शकते. ज्याला इंग्लिशमध्ये ‘अननोन टेरिटरी’ (अज्ञात प्रदेश ) म्हटले जाते तसे `कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान’ आणि ‘चॅट जीपीटी’ या दोघांचा अमर्यादित आवाका आहे. त्याचा पुरेपूर वापर / उपयोग चित्रपट निर्मात्यांकडून होणार हे उघड आहे आणि ते पैसे वाचविण्यासाठी किरकोळ मानधनावर या कथा, पटकथा, संवाद लेखक आणि अभिनेत्यांची बोळवण करणार अशीच या सर्वांना भीती वाटते आहे. यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाबरोबर जुळवून घेण्याशिवाय या सर्वांना पर्याय राहणार नाही हे उत्तरोत्तर स्पष्ट होत जाईल.