अणुऊर्जेचे पितामह

68

>> शैलेश माळोदे

डॉ. अनिल काकोडकर. प्रलंयकारी अणुऊर्जेचा सुंदर जगण्यासाठी वापर सांगणारे शास्त्रज्ञ…

आण्विक भौतिकशास्त्र्ा हा शब्द नुसता उच्चारला तरी डोळय़ांपुढे दुसऱया महायुद्धाचे, मॅनहटन प्रोजेक्टचे आणि हिरोशिमा-नागासाकीवर टाकण्यात आलेल्या प्रलंयकारी अणुबॉम्बचे चित्र डोळय़ांपुढे येते. त्याचबरोबर आण्विक दुर्घटनांचेही चित्र डोळय़ांपुढे येते. 2011 सालची जपानमधील फुकुशिमाची दुर्घटना तशी अगदी अलीकडची; परंतु वैज्ञानिकाच्या पुढे मात्र याहून वेगळय़ा गोष्टींची आव्हाने असतात. हिंदुस्थानबाबत विचार करायचा झाल्यास आठवण होते ती डॉ. होमी भाभा आणि त्यांनी उभारलेल्या विविध मोठमोठय़ा इन्स्टॉलेशन्स आणि तयार केलेले शास्त्र्ाज्ञ-नेते यामध्ये अत्यंत कार्यकुशल म्हणून कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात असलेले ठाणेकर, पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर. त्यांच्याशी सर्वप्रथम भेट झाली तेव्हा ते नुकतेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक बनले होते. त्यानंतर लवकरच पोखरण-2 अणुचाचणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संधी लाभली. त्यानंतर वारंवार भेटी होऊ लागल्या.

आतादेखील जेव्हा जेव्हा त्यांच्याशी भेट होते तेव्हा तेव्हा मितभाषी असलेल्या डॉ. काकोडकरांशी चर्चा मात्र रंगतेच. कारण आताही त्यांचा आण्विक व्यासंग सुरू आहेच. उलट त्यात अनेक नवे विषय आणि त्यांचे नवे आयाम सामील झालेत. मी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आण्विक आस्थापनांमध्ये व्यक्तीत करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. अणुऊर्जेचा वापर विकासासाठी करायलाच हवा. ऊर्जा स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अणुऊर्जा हा एक महत्त्वाचा घटक आहे; परंतु आता आपल्याला जरा वेगळय़ा पद्धतीच्या संकल्पनांची गरज आहे. ‘सिलेज’ (सिटी व्हिलेज) ही संकल्पना शहरांमधील सुविधा आणि राहणी गावागांवातून उपलब्ध करून देण्याविषयीची असून त्यावर सध्या आपण भर द्यायला हवा. अनेक ठिकाणी यासंदर्भातील काम सुरू आहे. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.

आज वयाची 75 वर्षे उलटून गेल्यावरदेखील ते तितक्याच उत्साहात असतात. तरुणांशी भेटायला, त्यांच्याशी बोलून त्यांच्या शंका दूर करत त्यांना इन्स्पायर करायला ते नेहमी तयार असतात. कुडाळला डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या 52 व्या अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनात त्याचा अनुभव आला. स्वतःविषयी फारसे बोलण्यास ते नाखूष असले तरी त्यांच्या आईवरील त्यांचे प्रेम मात्र शब्दाविनाही व्यक्त होत राहाते. 11 नोव्हेंबर 1943 रोजी बडवानी येथे जन्मलेल्या डॉ. अनिल काकोडकर यांचे शिक्षण प्रामुख्याने मुंबईत झाले. रूपारेल कॉलेज, व्ही.जे.टी.आय. आणि नॉटिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी अनुक्रमे उच्च, माध्यमिक, अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल) आणि पदव्युत्तर (मेकॅनिकल) आपले शिक्षण पूर्ण केले. ‘‘मी 1964 साली भाभा अणुसंशोधन केंद्रात रिऍक्टर अभियांत्रिकी विभागात रूजू झालो. तत्पूर्वी 1963 साली पदवी मिळाल्यावर माझी निवड अणुऊर्जा विभागाच्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून झाली.’’ अनिल काकोडकर 1974 आणि 1998 या दोन्ही शांततामय अणुचाचणीच्या ‘कोअरग्रुप’मध्ये सहभागी होते. त्यांनी हिंदुस्थानच्या ‘दाब’ आधारित जड पाणी अणुभट्टी तंत्रज्ञान विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. 1996 साली ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि 2000 साली अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि हिंदुस्थान सरकारने त्या विभागाचे सचिवपदी विराजमान झाले.

अणुऊर्जेसाठी इंधन म्हणून किरणोत्सारी थोरिअमचा वापर करून देशाला ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण बनवता येईल. त्यासाठी देशात असलेल्या राष्ट्रीय थोरिअम साधनांचा वापर करता येईल. थोरिअम – युरेनियम 233 चा प्राथमिक ऊर्जा स्रोत म्हणून आणि प्लुटोनिअमचा चालक इंधन म्हणून वापर करत प्रगत जडपाणी आधारित अणुभट्टी तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. ही एक विरोध स्वरूपाची अणुभट्टी प्रणाली असून हे अत्यंत सोपे आणि सुरक्षित तंत्रज्ञान असून त्याद्वारे थोरिअमपासून 75 टक्के वीज तयार करता येईल, असे काकोडकर आग्रहाने प्रतिपादीत करतात. गणितामध्ये आवड असलेले डॉ. अनिल काकोडकर भौतिकशास्त्र्ा, तेही आण्विककडे वळले ते बी.ए.आर.सी.मध्ये आल्यावर फ्यूजन तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे शोध न लागल्यामुळे अणुऊर्जेचे क्षेत्र खूपच चलती असून मागे पडल्यासारखे वाटते. याबाबत विचारले असता त्यांनी यासाठी राष्ट्रीय ऊर्जा गरज आणि पर्याय याला जबाबदार धरलेय. ते म्हणाले, ‘‘ब्रिटनने नॉर्थ सी पेट्रोलियम शोधानंतर अणुऊर्जेकडे थोडेसे दुर्लक्ष केले होते. परंतु तेथील जनमत पुन्हा एकदा ऊर्जेचा विचार करता त्याकडे सरकलंय. जर्मनीने 2022 पर्यंत सर्व अणुभट्टय़ा बंद करायचा निर्णय घेतलाय; परंतु फुकुशिमा अपघात होऊनही जपानने मात्र तसा निणय पूर्णपणे घेतलेला नाही. शेवटी मार्केट अणुऊर्जेचे स्थान काय असेल ते ठरवते.’’

250 पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित झालेले डॉ. अनिल काकोडकर 1998 साली पद्मश्री, 1999 साली पद्मभूषण आणि 2001 साली पद्मविभूषणप्राप्त वैज्ञानिक असून महाराष्ट्र भूषण पुरस्काराचेही 2012 चे मानकरी आहेत. मूळचे गोव्याचे असलेले काकोडकर सध्या राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष आहेत. ‘फ्यूजन’ तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा प्राप्तीचे स्वप्न अद्यापही खूप दूर असल्याचे वास्तव आपण स्वीकारायला हवे, असे सांगताना ते थोरिअमद्वारे अणुवीज प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात. खरोखरच देशाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ऊर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे याबाबत वास्तववादी विचार करणे भाग आहे. त्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करण्यावर भर द्यायला हवा. तेव्हाच होमी भाभांच्या द्रष्टेपणाचे आकलन आपल्याला होईल, असे डॉ. अनिल काकोडकर आग्रहाने प्रतिपादन करतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या