लेख – छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी आदर्श!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैभव मोहन पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेच्या व युद्धकौशल्याच्या जोरावर गड, किल्ले, सुभेदाऱया शत्रूच्या ताब्यातून परत मिळवून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली व पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद समाजात निर्माण केली. शिवछत्रपतींची कर्तबगारी, स्वाभिमान, मातृभूमीप्रेम, विधायक दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध उठाव, परस्त्रीबद्दलचा आदर, मराठी अस्मितेचा पुरस्कार, कुशल नेतृत्व या बाबी आणि त्यांचा आदर्श अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झाला आहे. रयतेचा राजा, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर फत्ते केलेल्या अनेक मोहिमा आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर या तेजस्वी ताऱयाचा जन्म झाला व त्याने न भूतो न भविष्यती असा इतिहास घडविला. मर्दमराठी मावळ्यांना मातृभूमी व स्वतःच्या ताबेदारीबाबत जाणीव करून देऊन त्यांना सोबत घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारे शिवाजी महाराज. ज्यांचे नाव मराठी माणसाच्या हृदयात व मनात कायमचे कोरले गेले आहे. त्यांना वंदन केल्याशिवाय आज कोणत्याही क्रांतिकारी कामाची सुरुवात होत नाही.

मराठी माणसाला स्वाभिमानाने व ताठ मानेने आपल्या न्याय व हक्कांसाठी जगायला शिकवणारे शिवाजी महाराज आज देशातच नव्हे, तर जगात आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रत्नपारखी राजा होणे नाही. राजांनी मावळय़ांमधून स्वराज्यासाठी रत्ने घडविली. महाराज इतिहासाचे महानायक होते तर मावळे इतिहासाचे आधारस्तंभ. मोगलांच्या पाशवी साम्राज्याला, सर्वच बाबतीत, मग ते तिन्ही दलांचे सैन्य, शस्त्र्ासाठा याबाबतीत उजवे असणाऱयांना मोजक्या मावळ्यांच्या जोरावर आणि आपल्या गनिमी काव्याच्या बळावर लढा देऊन मातृभूमीचे रक्षण करणारे छत्रपती शिवराय पुन्हा होणे नाही.

अफजलखानाचा वध असो की शाहिस्तेखानाची फजिती, यासारख्या अनेक घटनांतून शिवाजी महाराजांचे कर्तृत्व येणाऱया अनेक पिढय़ांना उद्बोधकच राहील. शिवाजी महाराजांनी त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेच्या व युद्धकौशल्याच्या जोरावर गड, किल्ले, सुभेदाऱया शत्रूच्या ताब्यातून परत मिळवून मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली व पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद समाजात निर्माण केली. शिवछत्रपतींची कर्तबगारी, स्वाभिमान, मातृभूमीप्रेम, विधायक दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध उठाव, परस्त्रीबद्दलचा आदर, मराठी अस्मितेचा पुरस्कार, कुशल नेतृत्व या बाबी आणि त्यांचा आदर्श अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.

इतिहास लिहिणारे अनेक झाले, पण इतिहास घडविणारे फक्त शिवछत्रपतीच. संपूर्ण जगाला स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवाजी राजांचा जुलमी मोगल सत्तेला संपविण्याचा कित्ता अनेकांनी गिरवला. महाराजांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीतून धडे घऊन चीन, व्हिएतनामसारखे असंख्य देश जुलमी दोरखंडातून मुक्त झाले. परंतु दुर्दैवाने आजच्या काळात आपल्या देशातीलच अनेक लोकांना त्यांच्या पराक्रमाबद्दल व शौर्याबद्दल माहिती द्यावी लागते.

शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्त्व जन्माला घालणाऱया जिजाऊंसारख्या मातेला, शहाजीं महाराजांसारख्या पित्याला, त्यांना युद्धकौशल्याचे धडे देणाऱया दादोजी कोंडदेव व त्यांच्यामागे सर्वस्व अर्पण करून उभे ठाकणाऱया बाजीप्रभु, येसाजी, संभाजी कावजी, रामजी पांगेरा, भंडारी, जीवा महाला, रायबा यांसारख्या अनेक मावळ्यांनादेखील या निमित्ताने मानवंदना. शिवरायांसोबत मराठी साम्राज्याचा विस्तार करताना अनेक मावळे धारातीर्थी पडले. सह्याद्रीच्या गडकिल्यांवरील बुरुजांसारखी अभेद्य निष्ठा असलेल्या मावळ्यांनी महाराजांवरील श्रद्धा व स्वराज्यप्रेमापोटी जीवाची पर्वा केली नाही. त्यांचे बलिदान, पराक्रम व स्वराज्यासाठी त्याग आजही सर्वांसाठी स्फूर्तिदायक आहे.

कोणताही राजकीय पक्ष असो, शिवछत्रपतींना वंदन केल्याशिवाय पुढे सरकत नाही. म्हणूनच शिववंदनेसाठी कोणत्याही जात, धर्म, पंथ, पक्षाचा अडसर येत नाही. शासनाच्या वतीने मुंबईतील अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे आज जागतिक पातळीवरचे स्मारक तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे स्मारक उद्या मुंबई, महाराष्ट्रासाठी जागतिक बलस्थान व शक्तीस्थान बनेल अशी आशा करण्यास हरकत नाही. छत्रपतींच्या कार्याची महती आपल्या भावी पिढय़ांना कळण्यासाठी शिवस्मारकांची निर्मिती राज्यातील जिह्याजिह्यात व महानगरपालिकांत झाली पाहिजे. मराठी धर्म व मराठी माणूस जर टिकवायचा असेल तर येणाऱया काळात समाजाला छत्रपती शिवरायांचेच विचार आणि आचार अनुसरावे लागतील. मराठी माणसाने आपापसातील तंटे मिटवून शिवाजी महाराजांच्या आदर्शाने आपल्या न्याय व हक्कांसाठी एकत्र आले पाहिजे.

शिवाजी महाराजांनी आयुष्यभर फक्त माणसे जोडण्याचे काम केले आणि म्हणूनच मराठी पताका सातासमुद्रापार फडकू शकली व भगवी लाट प्रभावी ठरून मोगल व परदेशी सत्तेचा नायनाट झाला. नाहीतर आजदेखील आपण त्याच पारतंत्र्याच्या छायेत असतो. शिवाजी महाराजांनी मराठी माणसावर अतोनात प्रेम केले, परंतु त्यांनी इतर धर्माच्या लोकांनादेखील कधीही दुरावू दिले नाही. महाराजांकडे जिवाला जीव देणारे अनेक मुस्लिम सरदार होते. नूरखान बेग हा पायदलाचा प्रमुख होता तर सिद्दी इब्राहिम हा अंगरक्षक. दौलत खान, इब्राहिम खान, सुलतान खान असे एक ना अनेक मुस्लिम सरदार होते, ज्यांची नावेही आपणास ज्ञात नाहीत. स्वराज्याची लढाई ही सर्वांना सोबत घेऊनच लढली जाऊ शकते ही भावना शिवप्रभूंनी सर्व स्तरांत रुजविली. जातीपातीचे, धर्माधर्माचे व स्पृश्य-अस्पृश्याचे राजकारण करणाऱया लोकांना महाराजांनी समानतेचा एक मोठा आदर्श घालून दिला.

केवळ शिवजयंतीला शिवरायांची आठवण करण्याऐवजी त्यांनी दिलेले धडे, शिकवण व त्यांचे कर्तृत्व याचे अनुकरण झाले पाहिजे. यासाठी ‘शिवचरित्रा’सारखे महाराजांच्या जीवनावरील प्रबोधनात्मक वाचन उपलब्ध आहे. त्याचे ज्ञान आपल्याबरोबरच आपल्या भावी पिढीलादेखील करून देण्याचा संकल्प आपण यानिमित्ताने करूया.