‘शलाका’चे कचरा निर्मूलन; शून्य खर्च, देखभाल

56

>> विकास काटदरे

शहरांमध्ये अलीकडे वाढत्या काँक्रीटीकरणामुळे वृक्षसंपदा कमी झाली आहे. त्यातच सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साठलेले दिसतात. त्यांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा डेपो हलवण्याच्या मागणीसाठी आंदोलने उभी राहत आहेत. कचरा डंपिंगमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र कचरा निर्मूलनासंदर्भात सध्या जागृती होत असली तरी त्यासाठी नागरिकामंध्ये मोठय़ा प्रमाणात जागृतीची गरज आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका ओला व सुका कचऱयाचे वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण डोंबिवलीत काही जागृत नागरिकही ‘खारीचा वाटा’ म्हणून आपल्या निवासी संकुलात कचरा निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत. डोंबिवलीच्या मानपाडा रस्त्यावरील आनंद नगर परिसरातील ‘शलाका’ गृहसंकुलात गेली चार वर्षे संकुलातील ओला कचऱयापासून खत तयार करण्यात येते. सोसायटीच्या आवारातच झाडे लावण्यात आली आहेत. त्यासाठी ते उपयुक्त ठरते. आज हा प्रयत्न परिसरातील इतर गृहसंकुलांना अनुकरणीय ठरत आहे. या गृहसंकुलातील रहिवासी वर्षा, त्यांचे पती विजय व मुलगा रोहित शिखरे हे कुटुंबीय गेली चार वर्षे संकुलाच्या आवारात ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करत आहेत व त्याआधारे सोसायटीच्या आवारात सुंदर फुले, फळझाडे दिसत आहेत. त्यांच्या या उपक्रमात ‘शलाका’ सोसायटीचे सचिव सुबोध शिंदे व सर्व पदाधिकारी, रहिवासी उत्स्फूर्त सहभागी झाले आहेत.

ज्यांनी हा प्रकल्प सुरू केला त्या वर्षा शिखरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘कचरा ही आज मोठी समस्या झाली आहे. मला लहानपणापासून झाडांची आवड आहे. ओल्या कचऱयापासून गांडूळ खत तयार होते हे वाचून माहीत होते. आपण पण प्रयत्न करावा असा विचार आला. त्याला घरातील सर्वानी पाठिंबा दिला नाही, तर खूप मदतपण केली. आपण पण ओल्या कचऱयापासून गांडूळ खत तयार करायचे व घरातील झाडांना ते टाकायचे असे ठरले म्हणून सोसायटीच्या आवारात लहान ट्रेमध्ये आम्ही तो प्रयोग सुरू केला. त्याला यश आले म्हणून आम्ही एक जाळीदार पिंजरा तयार केला. कारण भटकी कुत्री, उंदीर यांच्यापासून संरक्षण व्हावे हा उद्देश होता. आमचा उपक्रम सोसायटीतील सर्व रहिवाशांना आवडला. त्यांनीही आपला ओला कचरा आणून त्या पिंजऱयात टाकण्यास सुरुवात केली. यामुळे सोसायटीतील झाडे चांगली वाढू लागली. आज आमच्या सोसायटीच्या आवारात तुळस, अडुळसा, मेंदी, कोरफड, गुलाब, मोगरा, कढीपत्ता अशी विविध प्रकारची झाडे चांगली झाली आहेत. पुढे या उपक्रमात परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व इतर निवासी संकुलातील नागरिक सहभागी झाले. परिणामी परिसरात स्चच्छता निर्माण झाली. आता आम्हाला इतर सोसायटय़ांचे आमंत्रण येऊ लागले आहे.

खत तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो असे विचारले असता त्या म्हणाल्या, वर्षातून दोन वेळा पिंजरा उघडतो. साधारणपणे रोज दोन किलो ओला कचरा मिळतो. मात्र सध्या आंबा, फणस यांचे दिवस असल्याने ओला कचरा वाढून दुप्पट झाला आहे. ओल्या कचऱयापासून खत निर्माण करण्यासाठी विशेष म्हणजे शून्य खर्च येतो व देखभालपण शून्य असल्याने आपली नोकरी सांभाळून हे करणे सहज शक्य आहे. सध्या सुमारे 20 25 निवासी संकुले हा उपक्रम राबविण्यास तयार असून त्यांनाही जसे जमेल तसे मार्गदर्शन करण्याचा मानस वर्षा यांनी व्यक्त केला, मात्र अजून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधित अधिकाऱयाशी संपर्क केला नाही. लवकरच तोही संपर्क करू असेही त्या म्हणाल्या.

आज कचरा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पण ओल्या कचऱयापासून खत, बायोगॅस तयार होत आहे. यामुळे निवासी संकुलातील रहिवाशांनी जर आपल्या भागात स्वतःच कचरा विघटन आणि त्यापासून खतनिर्मिती सुरू केली तर कचरा ही समस्या राहणार नाही. डोंबिवलीतील ‘शलाका’ सोसायटीने सुरू केलेला कचरा निर्मूलनाचा उपकम अनुकरणीय आहे. त्याचे अनुकरण इतरांनी केले तर प्रत्येक शहर स्वच्छ व हिरवे दिसल्याशिवाय राहणार नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या