काव्यधारा – बारावं-तेरावं शतक व्यापणारी कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीती मेहेंदळे

गणेश कनाटे हे हाडाचे पत्रकार. साहित्यविषयक, समीक्षाविषयक लेखन करतानाच सामाजिक आशय मांडणाऱया कविता हेही त्यांच्या व्यक्त होण्याचं वैशिष्टय़ आहे.

बारावं तेरावं शतक असावं ते…

कर्मठ धर्ममार्तंडांची उग्र छाया दाटलेली

घराघरांवर झाडाझोपडीवर

दडपणासारखी

एकेक कर्म धुवून पुसून पडताळले जात

धर्म धर्म ऊर बडवले जात

साधे जन वंचित उपेक्षित

वेद संहिता कोणास माहीत ?

अशा चित्रात विठ्ठलपंत कुलकर्णी येतात

त्यांचा तो सपत्नीक संन्यास

आणि पुढचा अटळ दुर्गम खडतर प्रवास, कुटुंबाचाच

समाज समाज काय असतो?

संन्याशाच्या झोपडीबाहेर वसलेला असतो

विपरीत घडतं, अघटित होतं.

संन्याशाची मुलं ?

बाई बाई ! कलियुग आलं रे बाबा आलं…

 कष्टलेले शिणलेले नाकारलेले

अंतरात असंख्य चिंधडय़ा उडालेले

दोन देह, त्यांची एक आत्महत्या

देहांत प्रायश्चित्त

एक संन्यासी, एक सहसंन्यासी…

पण गोष्ट इथे संपत नाही

संन्याशाचा वसा मरूनही फिटत नाही

झोपडीत निद्राधीन चार तेजःपुंज ठिपके मागे

तेजाचा चौरसच

त्यात एक ठिपका

अलौकिक कविता जन्मलेली

ओजस्वी नंदादीपच

थकलोय आता, संन्यासाची संसाराची चेष्टा सोसत

वाळीत पडलेल्या या निष्पापांचं प्राक्तन रिकाम्या डोळ्यांनी बघत

देहाला रेलून बसलोय थोडा

आता काही मागणं नाही

मागायला आयुष्यच उरलं नाही

मावळतीचे मंद ऊन म्हणजे

शीतल ज्ञानाचा प्रकाशू

माझ्या देहातून जन्मलेली कविता तेवढी

या प्रकाशस्पर्शात न्हाऊन निघावी, उजळावी

अर्थगर्भ होत कविता दीर्घ होत जावी

जगाकरिता ज्ञानाची ज्योत बनावी

माझा नंदादीप ज्ञानदीप व्हावा…

माझा ज्ञानेश्वर

कवीचा परिचय

गणेश वामन कनाटे यांच्या ‘सॅक्सोफोन  हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ या संग्रहातील ही कविता आहे. कनाटे यांनी प्रदीर्घ काळ इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांतील वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांतून पत्रकारिता केली असून ते काही वृत्तवाहिन्यांचे संपादकही होते.

त्यांनी विविध वर्तमानपत्रांतून स्तंभलेखन केलेले आहे. त्यांनी संपादित केलेले ‘बेकेट नाही म्हणतो म्हणून’ व वर उल्लेख केलेला कवितासंग्रह ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय अनेक साहित्यविषयक नियतकालिकांमधून त्यांचे समीक्षाविषयक लेखही प्रकाशित झालेले आहेत.

सध्या ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्षपदी काम करतात.

मूळ कविता

विठ्ठलपंत कुलकर्णी आणि ज्ञानेश्वर माऊली

एका उद्ध्वस्त वास्तूमध्ये थांबावा एक थकलेला संन्यासी

तसे या देहात थांबता आले पाहिजे मला

आपली कविता घेऊन

 

संन्याशाला नको मोह वास्तूचा

आणि वास्तूला नको आनंद संन्याशाच्या येण्याचा

संन्याशाला येते जाग जशी थकवा ओसरला की

तशीच यावी जाग माझ्या कवितेला

मावळतीच्या किरणांवर चालत यावे शब्द काही

बसावे जरा त्यांनी उद्ध्वस्त भिंतींना टेकून

कवितेला खेटून

कवितेला कळलाच जर शब्दांच्या स्पर्शाचा संकेत

तरच गर्भवती होईल माझी कविता

 

या क्षणाला त्या संन्याशाचे नाव ठेवू आपण

विठ्ठलपंत कुलकर्णी

आणि कवितेलाही एक सुंदर नाव ठेवू

ज्ञानेश्वर माऊली !

काव्यसंग्रह: सॅक्सोफोन  हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे

कवी: गणेश वामन कनाटे