लेख : अमेरिकेच्या व्यापारयुद्धामुळे चीन हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सनतकुमार कोल्हटकर<<

[email protected]

गेल्या 20 वर्षांमध्ये चीनने जगाला विविध वस्तूंचा पुरवठा करणारा देश म्हणून ख्याती मिळविली होती. चीनमधील कंपन्यांनी त्यांची वस्तू उत्पादनाची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढविली होती. त्यासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांवरही चीनने प्रचंड गुंतवणूक केली होती. आता व्यापारयुद्धामुळे अनेक कंपन्यांच्या निर्यात व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. एक गोष्ट मात्र निश्चित की, अमेरिकेने चीनबरोबर सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे चीन हैराण झाला आहे.

चार महिन्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर सुधारित वाढीव आयातकर लावणे सुरू केले होते. सुरुवातीला अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या स्टील आणि ऍल्युमिनिअमवर प्रत्येकी 25 टक्के आणि 10 टक्के आयातकर लावला होता. नंतर टप्प्याटप्प्प्याने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंची यादी आणि त्या सर्व वस्तूंवरील वाढीव आयात करांचे प्रमाण वाढतच गेले. मागील वर्षी अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील व्यापारातील तूट 350 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. अमेरिकेकडून चीनला फक्त 150 अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाते. चीननेही अमेरिकेच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या विविध वस्तूंवरील आयातकर वाढविला. पण चीन 150 अब्ज डॉलर्स आयातीवरच कर लादू शकत होता. पण अमेरिका संपूर्ण 350 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंच्या आयातीवर कर लादून व्यापार युद्धाची कारवाई वाढवू शकत होती. अमेरिकेचे व्यापारमंत्री विल्बर रॉस यांनी अमेरिकेला कारवाईची व्याप्ती वाढविण्यासाठी अजून स्कोप आहे असे सांगितले. ज्या अमेरिकन कंपन्यांनी चीनमध्ये आपली कार्यालये थाटली होती त्या कंपन्या आता आपली कार्यालये चीनमधून बाहेर नेण्यासाठी पर्याय शोधत आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या चीनमधील आस्थापनांमध्ये कामगार कपात सुरूही केलेली आहे. काही कंपन्यांत तर ही कपात 60 ते 70 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

गेल्या 20 वर्षांमध्ये चीनने जगाला विविध वस्तूंचा पुरवठा करणारा देश म्हणून ख्याती मिळविली होती. कमी किमतीत या वस्तूंचा पुरवठा करणारा देश असल्याने चीनमधील कंपन्यांनी त्यांची वस्तू उत्पादनाची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढविली होती. त्यासाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांवरही चीनने प्रचंड गुंतवणूक केली होती. जसजसा चिनी कंपन्यांचा धंदा वाढत गेला त्या प्रमाणात चिनी कामगारांच्या वेतनमानातही खूपच वाढ होत गेली. आता व्यापारयुद्धामुळे अनेक कंपन्यांच्या निर्यात व्यापाराला मोठा धक्का बसला असून वस्तूंच्या उत्पादनाला  खीळ बसल्याचे दिसत आहे. अमेरिकेकडून झालेली व्यापारयुद्धाची घोषणा चीनला अनपेक्षित असावी. त्यामुळे चीनचे अनेक दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्प अजूनही चालू आहेत. चीनमधील अनेक कंपन्यांच्या व्यवसाय वृद्धीचा वेग असाच वर्षानुवर्षे कायम राहील अशी चीनची अपेक्षा असावी. चीनची अर्थव्यवस्था आणि त्यामधील प्रचंड गुंतवणूक ही बहुतांशी निर्यातीभिमुख व्यापाराच्या आधारावर झाली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यामुळे चीनला अमेरिकेने पुकारलेल्या व्यापारयुद्धाचे मोठे धक्के बसत आहेत हे निश्चित. चीनबरोबर व्यापारयुद्ध सुरू करण्याआधी अमेरिकेने चीनच्या अर्थव्यवस्थेचा बारकाईने अभ्यास केला असल्याने प्रत्येक कारवाईचे काय परिणाम असू शकतात याची अमेरिकेला संपूर्ण कल्पना आहे. या कारवाईला जोडूनच अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रामध्ये  ‘भू राजकीय’ आक्रमकताही वाढवल्याचे दिसत आहे. चीनला विविध क्षेत्रात रोखण्याचे अमेरिका पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे जगाला दिसते आहे.

चीनमधून अनेक कंपन्यांनी बाहेर पडून दक्षिण आशियातील देशांमध्ये आपापले कारखाने हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पॅनासॉनिकसारखी जपानी कंपनी आपला व्यवसाय चीनमधून लॅटिन अमेरिकेतील ‘मेक्सिको’ देशामध्ये हलवीत असल्याचे वृत्त होते. चीनमध्ये निर्यातीमधून अमेरिकन डॉलर्सची होणारी आवक मंदावत असल्याचे समोर येत असून चीनसाठी ही विचित्र परिस्थिती असणार आहे. चीन, इराण, रशिया व इतर काही देशांबरोबर आपापल्या स्थानिक चलनात व्यापार वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. येणाऱ्या काळात चीन डॉलर्स उपलब्धतेसाठी त्यांच्याकडे असलेले काही ट्रिलियन डॉलर्सचे अमेरिकन बॉण्ड्स वटवू शकतो.

चीनमधील अमेरिकन कंपन्यांनी आपापली कार्यालये अमेरिकेत हलवावीत हीच डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. परंतु ती इच्छा पूर्णपणे फलद्रुप होताना दिसत नाही. आत्तापर्यंत 250 अब्ज डॉलर्सची चीनमधून अमेरिकेत होणारी वस्तूंची आयात महाग झाली आहे. या वस्तूंमध्ये लेदर बेल्ट, दुचाकी वाहने, रेफ्रिजरेटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक मशिनरी, फॅशन इंडस्ट्री व अनेक तत्सम वस्तू आहेत. अनेक कंपन्या आपले चीनमधील कारखाने अमेरिकेत न हलविता आशियातील कोरिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, थायलंड, कंबोडिया, मलेशिया या देशात हलवत आहेत. अर्थात या देशांमध्ये उद्योग हलविले तरी तेथे कारखाने उभे करून त्या उद्योगासाठी लागणारा अपेक्षित कामगारवर्ग शोधून आणि मग तेथे जम बसेपर्यंत सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो. या देशांमध्ये चीनपेक्षा ‘लेबर कॉस्ट’ खूपच कमी असल्याने या कारखान्यांच्या हलविण्याच्या उद्योगात अनेक ‘लॉजिस्टिक्स’ कंपन्या सध्या व्यस्त आहेत. या लॉजिस्टिक्स कंपन्यांना जेथे पूर्वी महिन्यात एखादी ‘एन्क्वायरी’ मिळत असे तेथे सध्या महिन्याला सुमारे 30 ‘एनक्वायरी’ येतात असेही सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यावरून चीनमधून बाहेर जाण्यास उत्सुक असणाऱ्या कंपन्यांच्या संख्येचा अंदाज येतो. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या चीनमधील दोन वेगवेगळ्या कार्यालयांमार्फत अशा स्थलांतरासाठी उत्सुक असणाऱ्या विविध कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असता सुमारे एक तृतीयांश कंपन्या चीनबाहेर जाण्यास उत्सुक असल्याचे समोर आले. फक्त 6 टक्के कंपन्या आपापले उद्योग अमेरिकेत नेऊ इच्छितात असेही दिसून आले. कदाचित यापुढील काळात ही संख्या वाढू शकते.

अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाचा भडका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधिकाधिक तीव्र स्वरूप धारण करत असल्याचे  नुकत्याच ऑक्टोबरमध्ये पापुआ गुनिया या बेटावर झालेल्या ‘ऍपेक’च्या बैठकीत दिसून आले होते. शी जिनपिंग यांनी व्यापारी संरक्षणवाद आणि एकतर्फी निर्णयाचा उल्लेख करून त्यावर टीका केली. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यांनीही चीन जोपर्यंत अमेरिकेच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिका व्यापारयुद्धाची तीव्रता वाढवत नेईल असा इशारा दिला. या दोन्ही नेत्यांमधील या वादावादीमुळे व्यापारयुद्धाचे संकट गहिरे होत जाईल असे दिसत आहे. माईक पेन्स यांनी चीनकडून जगभरात वापरण्यात येणाऱ्या ‘कोऱ्या धनादेशाच्या’ धोरणावर टीका केली.

15 नोव्हेंबरला सिंगापूरमध्ये ‘आसियान’ या आग्नेय आशियायी देशांच्या संघटनेची बैठक पार पडली. भौगोलिकदृष्टय़ा या संघटनेतील देश हे चीनला जवळचे आहेत. त्यामुळे चीन आणि अमेरिका या दोन्हीही देशांतील तणावामुळे भविष्यात ‘आसियान’मधील देशांना या दोन्हीही महासत्तांमधील एकाची निवड करावी लागेल की काय, असे मत सिंगापूरचे पंतप्रधान ली सीएन लुंग यांनी व्यक्त केले. चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्ध सध्या शिगेला पोहोचले असताना आणि त्याच वेळी दक्षिण चीन समुद्रधुनीच्या नियंत्रणावरून दोन्हीही देशांत तणाव निर्माण होण्याची लक्षणे असल्याने आसियानचे सदस्य देश चिंतित दिसत आहेत असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

एक गोष्ट मात्र निश्चित की, अमेरिकेने चीनबरोबर सुरू केलेल्या  या व्यापारयुद्धामुळे चीन हा पुरेपूर हैराण झाला आहे. या व्यापारयुद्धाची परिणती कशात होते याकडे जगाचे लक्ष लागले आहे.