ठसा – आशालता वाबगावकर

>> प्रशांत गौतम

चतुरस्र अभिनेत्री आशालता यांचा ज्याप्रकारे मृत्यू झाला ते क्लेशदायक आहे. आशालतांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रसन्न, सोज्वळ हसरा चेहरा, कपाळावर ठसठसीत कुंकू असे घरंदाज होते. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील पाळोले हे त्यांचे मूळ गाव. मात्र जन्म, आणि महाविद्यालयीन शिक्षण व पुढची सर्व कारकीर्द मुंबईतच घडली. मूळ गोवेकर असल्याने कोकणीवरही मनापासून प्रेम होते. आशालतांना संगीताची गोडी बालपणापासून होती. त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. आशालतांची रंगभूमीवरची वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली व धी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून सुरू झाली. धी गोवा असोसिएशनने राज्य नाटय़ स्पर्धेंसाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ बसवले. आशालतांना त्यात रेवतीची भूमिका मिळाली. ज्यात त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्यानंतर संगीत शारदा, संगीत मृच्छकटिक, रायगडाला जेव्हा जाग येते, गुंतता हृदय हे, मत्स्यगंधा, तुझे आहे तुजपाशी, छिन्न, महानंदा, गारंबीचा बापू, गुडबाय डॉक्टर, स्वामी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, हे बंध रेशमाचे, विदूषक ही गोष्ट जन्मांतरीची, देखणी बायको दुसऱयाची अशा कितीतरी गाजलेल्या लोकप्रिय नाटकांचा उल्लेख करता येईल. यातील मत्स्यगंधा संगीत नाटकात त्यांनी गायलेली दोन पदं ‘गर्द सभोती रान साजणी’, ‘अर्थ शून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ या आजही नाटय़रसिकांच्या ओठावर असतात. या नाटकामुळे त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. नोकरी सोडून पूर्णवेळ याच क्षेत्रासाठी देण्याचे त्यांनी ठरवले. पाचेक हजार प्रयोग या नाटकाचे झाले. पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱयावरची वरात’ या गाजलेल्या नाटकात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली. पन्नासहून अधिक नाटके, मराठी आणि हिंदीतील दोनशेहून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकार केल्या. सावित्री, उंबरठा, पुढचं पाऊल, नवरी मिळे नवऱयाला, एकापेक्षा एक, माहेरची साडी, आत्मविश्वास, अंकुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, शराबी, कुली, ओ सात दिन, मंगल पांडे, घायल, चलते चलते, तवायफ, आज की आवाज, पसंद अपनी अपनी, दिल एक नादान, तेरी मांग सितारोंसे भर दू, शौकीन असे अनेक चित्रपट व त्यातील आशालतांनी साकारलेल्या अनेक भूमिका रसिक-जाणकारांना आठवतात. यातील महत्त्वाच्या हिंदी चित्रपट म्हणजे ‘अपने पराये’ हा सांगावा लागेल. प्रख्यात दिग्दर्शक बासू चटर्जी यांना आशालतांचा अभिनय आवडत असे. आपल्या ‘अपने पराये’मध्ये त्यांनी आशालतांना पहिल्यांदा भूमिका दिली. त्यामधील आशालतांनी साकारलेली भूमिका फिल्मफेअर पारितोषिकासाठी निवडली गेली. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच मिळालेला हा सन्मान पुढील प्रवासासाठी प्रेरक ठरला. तिथूनच पुढे हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात तीन कोंकणी व एका इंग्रजी चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. ‘अंकुश’ या चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे पुष्पा पागधरे यांनी गायलेले गाणे आशालतांवरच चित्रित झाले आहे. दूरदर्शनवरील महाश्वेता, पाषाणपती, जावई विकत घेणे, कुलवधू यांसारख्या विविध मालिकांतून त्या घराघरांत पोहचल्या. आशालताच्या या बहुआयामी वाटचालीत प्रारंभी धी हिंदू गोवा असोसिएशनचे रामकृष्ण नायक. अभिनेते गोपीनाथ सावकार यांचे सहकार्य लाभले. पदार्पणातच अमोल पालेकर, गिरीश कर्नाड यांच्यासारखे मुरलेले अव्वल दर्जाचे कलावंत भेटले. आशालता या व्यासंगी लेखिकाही होत्या. विविध अनुभवाच्या अनुषंगाने त्यांनी विपुल प्रमाणात ललित लेखनही केले. ‘गर्द सभोवती’ हा त्यांचा ललित लेख संग्रह लोटस पब्लिकेशनने प्रकाशित केला. ज्याला प्रस्तावना अभिनेते सुबोध भावे यांची लाभली आहे. लहानपणी वाचन-लेखनाची आवड असल्याने त्याचा पुढे लेखनासाठी उपयोग झाला. त्यात आशालता म्हणतात- ‘लेखनाचा मी कधी गाजावाजा केला नाही, त्याची गरज वाटली नाही. सदैव कौतुकाची थाप पाठीवर आहे असे समजून उमजून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे मला चांगलेच लिहायला हवे हे मनाशी ठाम ठरवलेय. आशाताईच्या जाण्याने मराठी साहित्य, चित्रपट, रंगभूमी या क्षेत्रात वावरणारे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या