लेख – डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक झुंझार नेतृत्व

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा आणखी एक पैलू म्हणजे झुंजार वृत्ती व सैन्यावरचे त्यांचे अतीव प्रेम. ते स्वतः काही काळ बडोदे संस्थानाच्या लष्करात सेनाधिकारी होते. लेफ्टनंट या पदापर्यंत पोहोचल्यावर आपल्या समाजाच्या उद्धाराकरिता सयाजीराव महाराजांना विनंती करून ते सैन्यातून निवृत्त झाले. सैन्याच्या विकास व व्याप्तीबद्दल बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. सैन्यकपात, सैन्य खर्चात हात आखडता घेणे योग्य नाही, सरकारने फाफटपसारा कमी करून सैन्यवृद्धीचा ध्यास घ्यावा, असे त्यांना  सतत वाटे.

जन्म कोठे मिळावा हे मानवाच्या हातात असते तर सारा  इतिहासच बदलून गेला असता. इतिहासाच्या घडणावळीत मनुष्यमात्राच्या शक्ती, बुद्धी आणि कर्तृत्वाचा सिंहाचा वाटा असतो. जो वीरपुरुष प्रतिकूल परिस्थितीत हाल-अपेष्टा, प्रसंगी हेटाळणी सहन करीत प्रवाहपतीत न होता प्रवाहाला वळण देतो तो खरा झुंजार योद्धा. प्राक्तनाची जननी नियती. या जननीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म जाणीवपूर्वक महू या लष्करी छावणीत घडवून आणला असावा. तो जणू संकेत होता, ‘मुला, तुला आयुष्यभर लढायचे आहे.’ सैनिकी बाणा हा त्यांचा वारसा पितृ व मातृ घराण्याची देणगी होती. सुभेदार रामाजी संकपाळ एक शिस्तबद्ध योद्धा हे पिताश्री. कबीरपंथी. त्याच संस्कारातून बाबासाहेबांची आयुष्याकडे पाहण्याची वृत्ती ही बोधिसत्व बनून गेली.

दलितोद्धाराचे कार्य अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ थोरांनी केले, पण ते सवर्ण होते. बाबासाहेब स्वतः मात्र या समाजरचनेचे जन्मामुळे ‘बळी’ ठरले होते. He was victim of society. परंतु समाजाप्रती असूया, दुराग्रह न धरता हिंदुस्थानची अखंड सेवा प्रामाणिकपणे करीत या मातीतल्या बोधिसत्वाची कास धरली. त्यांनी परकीय तत्त्वाची प्रलोभने झुगारली. 1935 साली येवले येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून भारतरत्न बाबासाहेब जेव्हा म्हणाले होते, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.’ हा एक पूर्वापार अन्यायाचा चित्कार होता. तेव्हा त्या काळी अनेक थोर नेत्यांनी गांधी, सावरकर, हेडगेवार यांनी त्यांचे मतपरिवर्तन करायचे प्रयत्न केले. त्याचा मान राखत त्यांनी प्रज्ञा, करुणा, श्रद्धा मानणारा बुद्ध धर्मच, या मातीतला धर्म स्वीकारून ‘हिंदुस्थान’वर मेहरनजर केली. म्हणूनच मला भारतरत्न बाबासाहेब हे सच्चे, जहाल देशभक्त भावतात.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा आणखी एक पैलू म्हणजे झुंजार वृत्ती व सैन्यावरचे त्यांचे अतीव प्रेम. ते स्वतः काही काळ बडोदे संस्थानाच्या लष्करात सेनाधिकारी होते. लेफ्टनंट या पदापर्यंत पोहोचल्यावर आपल्या समाजाच्या उद्धाराकरिता सयाजीराव महाराजांना विनंती करून ते सैन्यातून निवृत्त झाले. हा इतिहास आहे. लढाऊ शिस्तबद्ध आयुष्याचा पाया जो महूच्या लष्करी शिक्षण छावणीत बालपणी सुरू झाला. त्याला परिपक्वता मिळाली ती ‘गायकवाड लष्करा’त. कोलंबिया, लंडन युनिव्हर्सिटीमधून उच्च पदव्या मिळवून बाबासाहेब बॅरिस्टर झाले, पण त्यांनी वकीलपत्र स्वीकारले ते ‘दलितोद्धारा’चे.

समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पहिले महायुद्ध संपताच डबघाईमुळे ब्रिटिशांनी ‘महार रेजिमेंट’ बरखास्त केली. दलितांचे एक उत्पन्नाचे दालन बंद होऊन दलित समाजात बेकारी बोकाळली. या महार जवानांनी जी.आर. बॉम्बे नेटिव्ह इन्फण्ट्री व कॅण्टलरी (पायदळ/घोडदळ)मध्ये ब्रिटिश राज शर्थीने लढून इंग्रजांना विजय मिळवून दिला होता. त्यामुळे बाबासाहेब क्रूद्ध झाले. त्यांनी व्हाइसरॉय लिनलीगोथ यांच्याशी पत्रव्यवहार केला, चर्चा केली. ‘महार रेजिमेंट’ पुन्हा सुरू व्हावी म्हणून लंडन गाठून राणी व्हिक्टोरियास साकडे घातले. त्याच वेळी सैनिकांची निकड भासू लागली. बाबासाहेबांच्या प्रयत्नाला यश आले. ब्रिटिशांनी बाबासाहेबांना प्रश्न केला, ‘महार म्हणून हिणवले तर आपण नाराज होता. मग रेजिमेंटचे नाव महार ठेवण्यावर तुमचा जोर का?’ तेव्हा व्हाइसरॉय लिनलिगोथला जे उत्तर बाबासाहेबांनी दिले ते फार महत्त्वाचे. ते म्हणाले, ‘आम्ही मायनाक भंडाऱयाची औलाद आहोत. शूद्र हे मूळचे क्षत्रिय आहेत. शिवकालीन पेशवाईत आमच्या शिलेदारांनी पराक्रम गाजवला आहे. तुम्हाला 1818 साली विजय मिळवून दिला तो जी.आर. नेटिव्ह बॉम्बे महार रेजिमेंटने, हे विसरू नका.’ महार रेजिमेंट हेच नाव ठेवण्यात आले. आजसुद्धा ही ‘महार रेजिमेंट’ हिंदुस्थानी सैन्याचा गौरव आहे.

महार रेजिमेंटचे पुनरुज्जीवन झाले तेव्हा बाबासाहेबांनी सर्व तरुणांना भरती होण्याचे आवाहन करताच त्यांच्यावर ‘संभावीत’ नेत्यांनी टीका केली, पण बाबासाहेब डगमगले नाहीत. बाबासाहेबांच्या या विचारामागे निश्चित उद्देश होता. हिंदुस्थान स्वतंत्र झाला की, शिस्तबद्ध सैन्याची खडी तालिम तयार करावी. सावरकरांचाही हाच विचार होता. वीर सावरकरांना ‘रंगरूटवीर’ संबोधण्यात आले. हे लिहिण्याचे प्रयोजन हेच की हे दोन प्रखर राष्ट्रभक्त देशाचाच विचार करीत होते.

त्याकाळी ब्रिटिश सैन्यात (Royal Indian Army) मुस्लिमांची संख्या प्रचंड होती. ते प्रमाण स्वातंत्र्योत्तर काळात तसेच राहिले असते तर परिस्थिती भयानक झाली असती. बाबासाहेबांना वाटत होते, हिंदुस्थानी सैन्यात सर्वसमावेशकता येऊन दलितांना रोजगार मिळावा. सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेना ‘युद्धबंद्यां’मधून बनवायचे ठरवून प्रयत्न सुरू करताच वीर सावरकर व बाबासाहेबांनी सर्व बंदी हिंदुस्थानेंना आझाद हिंद सेनेला (Indian National Army) मदत करण्याचा आदेश दिला. 1857 नंतर इंग्रजांनी ब्राह्मण, जाट, रामोशी, भिल्ल या जातींना ‘उपद्रवी’ म्हणून सैन्यात मजाव केला. तसेच सैन्यात जाणाऱया हिंदुस्थानी वीरांची स्थिती ‘न घाट का, न घर का’ होत असे. कारण ‘एतद्देशीय’ त्यांना देशद्रोही म्हणून हिणवत; तर गोरा साहिब ‘काला आदमी’ म्हणून हिवणत.

1946 च्या सुमारास मुंबईत ब्रिटिश हिंदुस्थानी नौसेनेत (Roayal Indian Navy) बंडाळी होताच तिला नैतिक पाठिंबा दिला तो बाबासाहेब, तात्याराव  सावरकर व नेताजी सुभाष यांनी. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष अब्दुल कलाम आझाद यांना समर्थन देऊ नये म्हणून अडवण्यात आले. नाविकांच्या या बंडाला हिंदू महासभा, फॉरवर्ड ब्लॉक, बहिष्कृत समाज यांनी समर्थनार्थ प्रभात फेऱया काढल्या हा इतिहास आहे. बाबासाहेबांनी सैन्यात स्थानिक हिंदूंनी भरती होण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे तत्कालीन मुस्लिम समाजानेही साथ दिली. कराचीमधील नाविकांनी बंडात सहभागी होऊन भविष्यातील उठावाची चुणूक दाखवल्यामुळे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांना हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लार्डस्मध्ये हिंदुस्थानी स्वातंत्र्याची घोषणा करावी लागली. सैन्याच्या विकास व व्याप्तीबद्दल बाबासाहेब  आंबेडकर आग्रही होते. सैन्यकपात, सैन्य खर्चात हात आखडता घेणे योग्य नाही, सरकारने फाफटपसारा कमी करून सैन्यवृद्धीचा ध्यास घ्यावा, असे त्यांना सतत वाटे.

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या