श्रमयोगी!

186

>> शुभांगी बागडे

राजाराम आनंदराव भापकर अर्थात भापकर गुरुजी, वय वर्षे 84, आपल्या गावातील लोकांच्या सोयीसाठी डोंगर फोडून रस्ते बांधणारा हा श्रमयोगी. गेल्या चाळीस वर्षांपासून आजही तितकेच कार्यरत असणाऱ्या गुरुजींच्या या श्रमदानाविषयी…

गुंडेगाव हे नगर व श्रीगोंदा तालुक्यांच्या हद्दीवरील छोटंसं गाव. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं. अनुपम निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेलं, पण तितकंच दुर्गम. येथून श्रीगोंदा तालुक्यात जायचे तर मधला डोंगर ओलांडायला 40 किलोमीटरचा वळसा घालावा लागत असे. सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा केला तरी सरकार या कामाकडे दुर्लक्ष करीत होते. सामाजिक जाण असणाऱ्या भापकर गुरुजींनी गुंडेगाव ते कोळगावदरम्यान डोंगरावरील घाटरस्ता हवा या मागणीसाठी सरकारदरबारी अर्ज, विनंत्या करायला सुरुवात केली, पण पदरी हताश करणारा अनुभवच पडला. मात्र तोच गुरुजींना प्रेरणा देऊन गेला. ग्रामस्थांचा त्रास दूर करण्यासाठी सरकारच्या मदतीशिवाय हा घाटरस्ता स्वावलंबनाने पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला. ते साल होतं 1957! सुरुवातीला गावकऱ्यांनीही जोर धरला, पण गरिबीमुळे याच कामाला वाहून घेणं त्यांना शक्य नव्हतं. मग गुरुजींनी मजूर लावले. आपल्या पगारातील अर्धी रक्कम ते मजुरीपोटी देत. त्या वेळी त्यांचा पगार होता 60 रुपये. उरलेल्या 30 रुपयांत आपल्या चार मुलांच्या पालनपोषणाचा खर्च ते निभावत. निम्मा पगार देण्याचा हा नेम भापकर गुरुजींनी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 40 वर्षे पाळला. शिक्षक असलेल्या राजाराम भापकर गुरुजींनी पुढे येऊन श्रमदानातून व स्वखर्चाने मजूर लावून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून हा रस्ता पूर्ण केला. आता या रस्त्यावरून एसटी व इतर वाहने धावू लागली आहेत. धट्टीकट्टी अंगकाठी, ढगळ पांढरा शर्ट व पायजमा, डोक्यावर गांधी टोपी, हातात काठी आणि उन्हाने रापलेला चेहरा. एकटय़ाच्या हिमतीवर सलग 40 वर्षे श्रमदान करून गुरुजींनी गावाच्या विकासाचा मार्ग खुला केला. गुंडेगाव-कोळगाव हा 7 किलोमीटरचा घाटरस्ता बांधून पूर्ण झाला. या रस्त्याबरोबरच गुंडेगाव ते कोथूळ हा दुसरा घाटरस्ताही त्यांनी प्रचंड खडक फोडून बनवला. गुंडेगावचं ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात जाण्यासाठीचा रस्ता बनवताना गुरुजींनी गाढवांच्या मदतीने सोपी पायवाट शोधली आणि नकाशा तयार केला. असे 26 कि.मी. लांबीचे एकूण सात रस्ते त्यांनी सरकारकडून कोणतीही मदत न घेता श्रमदानातून तयार केले आहेत. याबरोबरच गावातील सुढळेश्वर मंदिराचा 60 बाय 40 फुटांचा आर.सी.सी. सभामंडप त्यांनी स्वखर्चाने, स्वहस्ते बांधला आहे. ‘डोंगर फोडणारे गुरुजी’, ‘रस्तेवाले गुरुजी’ अशा अनेक नावांनी त्यांना आता ओळखले जाते. डोंगर फोडायला सुरुवात केली तेव्हा गावातील अनेकांनी ‘वेडा मास्तर’ म्हणून त्यांना हिणवायला सुरुवात केली होती. आज मात्र गावकऱ्यांनी त्यांच्या घरासमोर ‘समाजसेवक भापकर गुरुजी’ असा फलक लावला आहे.
स्वखर्चाने व स्वकष्टाने केलेल्या रस्तेकामाची दाद म्हणून गुंडेगाव (ता. नगर) ते कोळगाव (ता. श्रीगोंदे) या 10 किलोमीटर डोंगरातील रस्त्याला ‘राजाराम भापकर गुरुजी यांचा राजमार्ग’ असे नाक देण्यात आले आहे. सर्वस्व पणाला लावून आपल्या गावी गुंडेगावात त्यांनी जे 26 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले, त्यातील 11 डोंगरघाट! एखाद्या निष्णात इंजिनीअरलाही लाजवील असे भापकर गुरुजींचे काम आहे. मात्र यातलं कोणतंही शिक्षण त्यांनी घेतलं नाही. 1957 ते 1991 पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या भापकर गुरुजींचं आयुष्य खडतर गेलं. शिकत असताना त्यांची गांधीजींच्या, विनोबा भावेंच्या विचारांशी ओळख झाली. आपण त्या त्यागाची परंपरा जपली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. समाजाचीं सेवा करण्याचं बीज त्याच वेळी रुजलं होतं. याच विचारातून त्यांनी विवाह करतानाही कुटुंबासमोर अट ठेकून जाणीवपूर्वक अपंग मुलीशी विवाह केला. भापकर गुरुजी एवढ्यावरच थांबले नाहीत. जंगलतोड, पशुहत्या, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, जलसंधारण अशा विषयाबाबत ते आग्रही भूमिका घेत चळवळ सुरू ठेवतात, मार्गदर्शन करतात. गावासाठी नवनवीन योजना राबवतात. रस्ते बांधणाऱ्या गुरुजींचा सायकल, मोटरसायकल, गाडी अशा वाहनदुरुस्तीतही हातखंडा आहे. नव्हे, तो त्यांचा छंद आहे. भापकर गुरुजी आज 84व्या वर्षीही टिकाव, फावडं घेऊन श्रमदान करतात. दिवसभरात कितातरी अंतर चालतात. स्वतःसाठी काहीतरी करावं हे त्यांच्या ध्यानीमनी नसतंच. आपलं निवृत्तीवेतनही ते गावाच्या कल्याणाकरिता वापरतात. यामुळेच कदाचित मिळालेल्या पुरस्कारांची रक्कमही यांनी स्वतःसाठी वापरली नाही. गावासाठी अजून खूप काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे. ‘मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं…’ हे भापकर गुरुजींचं ब्रीदवाक्य. 84 व्या वर्षीही असा अफाट उत्साह जपणाऱ्या भापकर गुरुजींच्या लोककल्याणाचा हा झरा असाच वाहता राहावा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या