लेख – भ्रष्टाचाराचा आजार कसा बरा होणार?

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम ([email protected])

हिंदुस्थानसारख्या जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशातील युवा पिढी भ्रष्टाचाराला बळी पडत आहे. देशात पूर्वीपासूनच बँकिंग घोटाळे, सुशिक्षित बेरोजगारी, गरिबी, निरक्षरता, जातीयवाद, आतंकवाद, नक्षलवाद, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, भेसळखोरी, साठेबाजी, नोकरी व्यवसायाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार, खाण्यापिण्याच्या वस्तूत जीवघेण्या केमिकलचा वापर अशासारख्या गंभीर समस्या आहेत आणि भ्रष्टाचार अशाच समस्या वाढविण्यास मदत करतो.

कोणाच्या हक्काचे, कष्टाचे, कर्तृत्वाचे यश आपल्या पदरात खेचणे; आपल्या पदाचा, सत्तेचा, अधिकाराचा दुरुपयोग करणे हा एकप्रकारचा भ्रष्टाचारच आहे. अशा गुह्याचे परिणाम कित्येकदा सामान्य जनतेला स्वतःचा जीवसुद्धा गमावून भोगावे लागतात. लाचलुचपतीसारख्या गंभीर समस्येमुळे शासनाला दरवर्षी अब्जावधी रुपयांचा तोटा होतो. भ्रष्टाचार समाजातील मुख्य समस्या आहे, जी इतर समस्यांची जन्मदाती आहे. माणसातील स्वार्थीपणा इतका वाढला आहे की, तो स्वतःव्यतिरिक्त कोणाचा विचारच करीत नाही. भ्रष्टाचारामुळे समाजातील श्रीमंत-दरिद्री यांच्यातील अंतर वाढत आहे. गरीब आणखी गरीब व श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. जगात क्वचितच कोणी व्यक्ती अशी असेल जी आपल्या आयुष्यात भ्रष्टाचाराला बळी पडली नसेल. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रूपात या समस्येमुळे त्रस्त आहे.

हिंदुस्थानसारख्या जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशातील युवा पिढी भ्रष्टाचाराला बळी पडत आहे. देशात पूर्वीपासूनच बँकिंग घोटाळे, सुशिक्षित बेरोजगारी, गरिबी, निरक्षरता, जातीयवाद, आतंकवाद, नक्षलवाद, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, भेसळखोरी, साठेबाजी, नोकरी व्यवसायाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार, खाण्यापिण्याच्या वस्तूत जीवघेण्या केमिकलचा वापर अशासारख्या गंभीर समस्या आहेत आणि भ्रष्टाचार अशाच समस्या वाढविण्यास मदत करतो. जोपर्यंत अशा समस्या संपणार नाहीत तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास शक्यच नाही. संपूर्ण जगात भ्रष्टाचार पसरला आहे. कारण लाच घेणे व लाच देणे यात दोघेही बरोबरीचे आरोपी आहेत. शिवाय अन्याय शांतपणे सहन करणारी जनतादेखील तेवढीच दोषी म्हटली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कामात पारदर्शकता आणणे खूप गरजेचे आहे. मागील काही वर्षांत 15 पत्रकारांना मारण्यात आले, जे भ्रष्टाचाराविरुद्ध काम करीत होते. इतर देशांपेक्षा हिंदुस्थानात पत्रकारांवर जास्त हल्ले करण्यात येतात असे कळून आले. महाराष्ट्रातही मागील काही वर्षांत आरटीआय कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांना अन्यायाविरुद्ध बंड पुकारल्यामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला. कॉमनवेल्थ हय़ुमन राईट्स इनिशिएटिव्ह या संस्थेच्या अहवालाप्रमाणे मागच्या काही वर्षांत महाराष्ट्रातील 60 पेक्षा जास्त आरटीआय कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. इतर राज्यांपेक्षा ही आकडेवारी जास्त आहे.

आजकाल समाजात सगळीकडे शिक्षण संस्थांना जणू काही पूरच आला आहे असे जाणवते. तरीही जागतिक स्तरावर हिंदुस्थानची शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती संतोषकारक नाही. महागलेल्या शिक्षण प्रणालीमुळे पालकांवर दबाव दिसून येतो व सातत्याने शिक्षण संस्थांत असलेली स्पर्धा  वाढतच चालली आहे. आजच्या वातावरणात व्यावसायिक व उच्च शिक्षण घेणे सामान्य माणसाला परवडण्यासारखे राहिलेले नाही. लहान मुलांची नर्सरी ते उच्च शिक्षणापर्यंत पालकांकडून मोठे शुल्क आकारण्यात येते. सोबतच महागडय़ा खासगी कोचिंग क्लासेससुद्धा जिकडे-तिकडे मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. शाळा, महाविद्यालयांमधे नोकरभरतीच्या नावाखाली लाखो रुपयांची देवाण-घेवाण होते हे तर आपण नेहमी ऐकतच असतो. मग ज्या शिक्षण विभागात भ्रष्टाचार करून नोकरीवर येतात ते समाजापुढे काय आदर्श ठेवतील?

जर देश भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर देशात प्रामाणिक लोकांचा समाज घडवावा लागेल. चांगल्या विचारशक्तीची माणसे, आई-वडील, गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या द्वारे दिलेल्या शिक्षा संस्कारांमुळेच हे शक्य होईल.

आपल्या डोळ्यादेखत पुष्कळदा भ्रष्टाचारासंबंधी कामे घडत असतात, पण आपण त्या गोष्टी गंभीरपणे घेत नाही. आपणसुद्धा त्याला बळी पडतो. यासंबंधी सर्व नागरिकांमध्ये जागृकता येणे खूप गरजेचे आहे.

कायद्यातील अवघड गोष्टी सोप्या भाषेत दर्शवायला हव्यात, जेणेकरून सामान्य माणसाला स्वतःच्या कर्तव्य व अधिकारांची जाणीव हाईल. भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी सुरुवातीला आपल्याला थोडाफार त्रास होऊ शकतो, पण देशाचा किंवा समाजाचा विचार केला तर लक्षात येईल की, देशापुढे आपला स्वार्थ काहीही नाही. कारण समाज सवर्तोपरी आहे. समाजाचा विकास आपला विकास आहे आणि आपल्याला इतरांचे अधिकार हिरावून घेण्याचा काहीही अधिकार नाही.

शासकीय अधिकारीवर्ग ज्या पदावर कार्यरत असतो त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची असते. त्याने कार्य करताना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये व न्यायसंगत कार्य करायला हवे. शासकीय कामात पारदर्शकता आणायला हवी. त्यामुळे जनतेला शासनाचा कामाची पूर्ण माहिती मिळेल. याकामी प्रसारमाध्यमांनी नेहमी निष्पक्ष व निर्भयपणे काम करायला हवे. लाच घेण्यादेण्याविरोधात कडक कायदा असलाच पाहिजे, तरच भ्रष्ट लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण हेईल. न्यायालयाचे निर्णयदेखील लवकरात लवकर लागायला हवेत. माणुसकी, प्रामाणिकपणा, समाजाच्या प्रति आपले कर्तव्य व काही देणे लागते ही जाणीव प्रत्येकात असायला हवी. ज्या दिवशी माणसांत मी व माझा परिवाराचे हित या ठिकाणी ‘माझा समाज व माझा देश’ अशी भावना निर्माण होईल तेव्हा देश आपोआपच भ्रष्टाचारमुक्त होऊन विकासाकडे वाटचाल करेल.

आपली प्रतिक्रिया द्या