लेख : शाश्वत विकास आणि लोककल्याणकारी हिंदुत्व

27

>>रमेश शिंदे

समाजाचा केवळ भौतिक विकास करून भागत नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक विकासही व्हावा लागतो. त्यासाठी जनतेला धर्मशिक्षण मिळणे आणि नागरिकांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने हिंदूंना असे धर्मशिक्षण मिळण्याची सध्याच्या व्यवस्थेत सोय नाही. पूर्वीच्या काळी हिंदुस्थान वैभवाच्या शिखरावर होता. हा तो काळ होता जेव्हा सनातन वैदिक हिंदू धर्माला समाजासह राजशकटामध्येही प्रतिष्ठा होती शाश्वत विकासासाठी लोककल्याणकारी हिंदुत्व जोपासणे आवश्यक आहे. 27 मे ते 8 जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे सुरू असलेल्या अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने हा लेख

हिंदुत्व’ आणि ‘विकास’ ही सूत्रे परस्परविरोधी असल्याचे एक अयोग्य चित्र हिंदुत्व विरोधकांकडून रंगवले जाते. ‘हिंदुत्व म्हणजे प्रतिगामीपणा आणि हिंदुत्वाचा त्याग म्हणजे पुरोगामीपणा’ असे एक आभासी वातावरण आज निर्माण करण्यात आले आहे. या आभासी जाळ्यामध्ये भले भले फसले. वास्तविक हिंदुत्वाचाच अंगीकार करणे आवश्यक आहे’ हे सूत्र लक्षात घ्यायला हवे. पूर्वीच्या काळी हिंदुस्थान वैभवाच्या शिखरावर होता. हा तो काळ होता जेव्हा सनातन वैदिक हिंदू धर्माला समाजासह राजशकटामध्येही प्रतिष्ठा होती.

भौतिक विकासामध्ये भ्रष्टाचार हा महत्त्वाचा अडथळा आहे. भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शकता यांच्या कितीही गप्पा ठोकल्या तरी आजही हिंदुस्थानमध्ये भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात होतो हे वास्तव आहे. नोटाबंदीनंतर ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ने केलेल्या एका सर्वेक्षणात 45 टक्के लोकांनी लाच दिल्याचे म्हटले होते. नगरपालिका, पोलीस, करसंकलन विभाग, विद्युत विभाग, मालमत्ता नोंदणी कार्यालय आदी ठिकाणी भ्रष्टाचाराची 84 टक्के प्रकरणे घडली असे या सर्वेक्षणात आढळून आले होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कितीही कायदे केले तरी भ्रष्टाचारामध्ये लक्षणीय घट झाली आहे असे नाही. आर्य चाणक्य यांनी म्हटले होते की, ‘‘जसे मासा पाणी कधी पितो, ते कळत नाही, त्याप्रमाणे शासकीय अधिकारी कधी भ्रष्टाचार करतो, ते कळत नाही.’’ अर्थात आर्य चाणक्य केवळ निरीक्षण नोंदवून थांबले नाहीत, तर त्यांनी भ्रष्टाचार आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणि शिक्षाही सांगितल्या आहेत. त्या आज कार्यवाहीत आणण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवली असती, तर आज भ्रष्टाचाराचा भस्मासुर उभा राहिला नसता. समाज सत्त्वगुणी असेल तर केवळ आर्थिक नाही, तर नैतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी पातळींवर होणाऱ्या भ्रष्ट आचाराला खऱ्या अर्थाने लगाम घातला जाऊ शकतो; पण नैतिकता आणि संस्कार यांचीच पुंजी अपुरी असेल, तर कायद्यातून पळवाटा निघतातच! कोणत्याही प्रकारचे कायदे व्यक्तीची मानसिकता पालटू शकत नाहीत. व्यक्तीचे आचार आणि विचार यांमध्ये सकारात्मक परिवर्तन करायचे असेल तर साधनेविना पर्याय नाही हेच यातून अधोरेखित होते.

निवडणुकीच्या वेळी देशात सत्तापरिवर्तनाच्या चर्चा होतात. क्वचितप्रसंगी व्यवस्था परिवर्तनाविषयीही चर्चा होते. मात्र व्यक्ती परिवर्तनाविषयी तितकासा विचार होत नाही आणि त्यामुळेच अपेक्षित फलनिष्पत्ती पदरी पडत नाही. दोन वर्षांपूर्वी मुंबई-गोवा मार्गावर ‘तेजस’ ही जलदगती अत्याधुनिक रेल्वे चालू करण्यात आली. मात्र या रेल्वेच्या पहिल्याच खेपेमध्ये प्रवाशांनी गाडीतील 12 मायक्रोफोन चोरून नेले, तर रेल्वेतील काही ‘टच स्क्रीन्स’ना हानी पोहोचवली. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा उंचवावा म्हणून ‘नॅक’ मूल्यांकन व्यवस्था लागू करण्यात आली; पण आजही महाविद्यालयांकडून ‘कागदोपत्री’ खेळ करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो ही वस्तुस्थिती आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढावे म्हणून खरेखुरे प्रयत्न करण्यापेक्षा काही वर्षांपूर्वी ‘इयत्ता आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करायचे’ असा निर्णय घेतला गेला होता तो याच पठडीतील होता. सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून न्यायालयीन व्यवस्था आज कार्यरत आहे. मात्र प्रलंबित खटले, न्यायालयीन प्रक्रिया यांची स्थिती पाहिली तर आज सर्वसामान्यांना ‘न्याय मिळतो की केवळ निकाल?’ असा प्रश्न पडतो. गावे-शहरे यांचा शिस्तबद्ध विकास करण्याच्या नावानेही बोंबच आहे. तात्पर्य, जोवर विकासाचा केंद्रबिंदू असणारी व्यक्ती कर्तव्यनिष्ठ आणि सुसंस्कारित असत नाही, तोपर्यंत केला जाणारा विकास हा एका अर्थाने भकासच म्हणावा लागेल. विकसित साधनांचा उपयोग का आणि कसा करायचा याचा योग्य निर्णय घेण्यासाठी व्यक्तीची बुद्धी सात्त्विकच लागते. विकसित आणि आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने आज मनुष्याचा वेळ वाचत आहे; पण त्या वाचलेल्या वेळेमध्ये काय करायचे याचा निर्णय ज्याचा त्यालाच घ्यायचा असतो आणि व्यक्ती सुसंस्कारित असेल तरच वाचलेल्या वेळेचा सदुपयोग होऊ शकतो.

समाजाचा केवळ भौतिक विकास करून भागत नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक विकासही व्हावा लागतो. त्यासाठी जनतेला धर्मशिक्षण मिळणे आणि नागरिकांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने हिंदूंना असे धर्मशिक्षण मिळण्याची सध्याच्या व्यवस्थेत सोय नाही. शाळांमधून ‘भगवद्गीता’ शिकवायची म्हटले तरी लगेच देशातील पुरोगाम्यांची टोळी ‘भगवेकरणा’ची आरोळी देत थयथयाट करते. मात्र त्याला आता भीक न घालता सनातन धर्मावर निष्ठा असणाऱयांनी मिळेल त्या माध्यमातून धर्माचा प्रसार, प्रचार आणि रक्षण करण्याचे दायित्व निभवायला हवे.

नेमक्या याच उदात्त नि लोककल्याणकारी कारणास्तव गेली सात वर्षे गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमध्ये हिंदू संघटनांच्या जोडीला साधना, धर्माचरण, धर्मशिक्षण, प्राचीन हिंदुस्थानी परंपरांचे पुनरुज्जीवन याविषयी विचार मंथन होत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये सहभागी होत आहेत. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या भावनेने अधिवेशनामध्ये सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठही अधिवेशनानंतर आपापल्या भागात गेल्यावर सनातन धर्माचा प्रसार करतात. स्वातंत्र्योत्तर काळात कुठल्याच राजकीय पक्षाने सनातन धर्मातील वैभवशाली परंपरेच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न केला नाही. शाश्वत विकासासाठी हिंदू राष्ट्रच आवश्यक आहे, हे जेव्हा शासनकर्त्यांना लक्षात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने ती या अधिवेशनांची फलश्रुती असेल.

(लेखक हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवत्ते आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या