
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
संत एकनाथ. भक्ती आणि प्रपंचाचे अचूक ज्ञान आपल्या बहुरुढांतून वारकऱ्यांपर्यंत पोहोचविले. एकनाथषष्ठी सोहळा म्हणजे एकनाथांच्या ज्ञानाचाच वसा असतो.
एकनाथ षष्टीला पैठण येथे भारूड, कीर्तन, दिंडय़ा, पालख्या असा अपूर्व सोहळा आयोजित होत असतो. असाच महोत्सव संभाजीनगर येथे आयोजित होत आहे.समस्त वैष्णव एकनाथ महाराजांच्या पैठणमध्ये गोळा होतात.. गोदावरीच्या तीरी अखंड हरिनामाचा जागर सुरू राहणार.
संतकृपा झाली । इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।
अशी ही भागवत संप्रदायाची परंपरा. या परंपरेचे नाथबाबा प्रत्यक्ष आधारस्तंभ. संत एकनाथांचे एकनाथी भागवत जसे प्रसिद्ध तसेच त्यांची भारूडेही प्रसिद्ध. ही भारूडे म्हणजे पारमार्थिकृत लोकसाहित्य. संत एकनाथांची भारूडे म्हणजेच रूपकाश्रयी अभंगांमधून जनसामान्यांच्या डोळ्यांत बोधाचे अंजन घातले. ही भारूडे म्हणजे महाराष्ट्रातील भक्तीसंप्रदाय आणि लोकदैवत संप्रदाय यांचा भीमा-भामा संगम. गोदावरीच्या तीरावर नाथषष्टीच्या निमित्ताने भागवत भक्तीचा अपूर्व सोहळा रंगणार आहे. तसाच सोहळा संभाजीनगरात रंगणार आहे. नवविधा भक्तीतील कीर्तनभक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती मानली जाते. संत नारद आणि संत नामदेव हे या कीर्तन भक्तीचे आद्यजनक समजले जातात. कीर्तनभक्ती एवढी श्रेष्ठ की ‘कीर्तनाची गोडी देव निवडी आपण’ असे म्हटले गेले आहे. ‘कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप’ असे संतांनी म्हटले आहे. अंग हरिरूप करण्याचे सामर्थ्य ज्या कीर्तनात आहे तो कीर्तन सप्ताह नाथषष्टीच्या निमित्ताने होत आहे.
कीर्तनाची आवडी देवा।
वैकुंठाहूनि घाली धांवा।।
नवल वैकुंठीच नसे।
तो कीर्तनी नाचतसे।।
भाळयाभोळ्या साठी।
धावे त्याच्या पाठोपाठी।।
असा कीर्तन महिमा संत एकनाथांनी सांगितला आहे.
भागवत संप्रदायाची परंपरा संत निवृत्तीनाथांपासून संत निळोबारायांपर्यत आहे. या सर्व संतांनी भारूडांची रचना केली आहे. त्यात संत एकनाथांची भारूडे ही अधिक लोकप्रिय झाली आहेत. त्याचे कारण ती संख्येने अधिक आहेत एवढेच नव्हे तर संत एकनाथांनी त्या काळातील लोकजीवनाची, लोकधारणांची आणि लोकसंस्कृतीची नाडी बरोबर ओळखलेली होती. त्यामुळे त्यांची भारूडे सर्वसमावेशक झाली. सर्व पंथ, सर्व उपपंथ, संप्रदाय, उपसंप्रदाय, बोली, भटके विमुक्त तसेच लोकपुरोहितांच्या जाती जमाती यांचा अचूक अभ्यास नाथबाबांचा होता. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ यांच्या रेशीम धाग्यांनी भगवद्भक्तीचा गोफ त्यांनी विणला.
वारकरी संप्रदायात कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले जाते. या कीर्तन सप्ताहात शेवटचा दिवस ‘काल्याचे कीर्तन’ म्हणून ओळखला जातो. काल्याच्या कीर्तनानंतर लळीत सादर करण्याची परंपरा आहे. लळीत आणि भारुडे यांचा प्रकृतिधर्म एकच आहे. लळितातही रूपकाश्रयी अभंगांचे सोंगरूपाने सादरीकरण होते. भारुडातही असेच सादरीकरण होते. ‘अभिनित भारुडे’ म्हणजेच ‘लळीत’ होय. भारूड हा सादरीकरणाचा स्वतंत्र प्रकार एकनाथोत्तर काळात उदयास आला. तोपर्यंत भारूडे केवळ गानप्रकार होती. सादरीकरणाचे स्वरूप त्यांना प्राप्त झालेले नव्हते. भारूड हा केवळ गेय प्रकार नसून त्यात संपादणी असते, संवाद असतात. संपादणी म्हणजे कीर्तनासारखेच निरूपण. गायन, निरूपण आणि संवादाचे व्यक्तिगत कौशल्य भारूडात अभिप्रेत असे. एखादी व्यक्ती जरी भारूड सादर करीत असली तरी नामगजरासह भारूडात समूह सहभाग अपेक्षित असतो. भारूडात प्रामुख्याने आध्यात्मिक उद्बोधन आणि नीतिमूल्यांचे शिक्षण दिले जाते.
हिंदुस्थानी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून भारूडे रचलेली आढळतात. भारूडांमध्ये प्रतीकात्मकता ठायीठायी आढळते. कारण भारूडे म्हणजे रूपकाश्रयी अभंग. अनेक भारूडांमध्ये वक्रोक्ती आढळते. गेयता हा भारूडांचा प्राण आहे. भारूडांची ध्रुवपदे ताल-ठेक्यांनी युक्त असतात. अनेक भारूडांची रचना ही लोकगीतांसारखी असते. हिंदी भारूडे ही अनेक मराठी संतांनीच रचलेली आढळतात.
संत एकनाथांच्या भारूडात अभय पत्र, जाब चिठ्ठी, गारूड महालक्ष्मी दार उघड, महालक्ष्मी दार लाव, सटवाई, नानक, शकुन, डोंबारी, गारूड, जोहार, हुतुतू, जंगम, जोगवा, कोल्हाटीण, फकीर, कबीर, वासुदेव, गोंधळ अशी अनेक भारूडे आहेत. ही भारूडे सोंगी भारूड आणि भजनी भारूड म्हणून सादर केली जातात. नाथांच्या घरात भारूड सादरीकरणाची गोसावींची पंरपरा आहे. पैठणमध्ये प्रभाकर देशमुख यांनी नाथांची भारूडे अधिक लोकप्रिय केली. चंदाबाई तिवाडी, निरंजन भाकरे, हमीद सय्यद, योगेश चिकटगावकर, दिवंगत राजूबाबा शेख असे अनेक भारूडकार लोकप्रिय आहेत. बीड जिह्यातील दरडवाडी येथे राष्ट्रीय नाटयविद्यालयाचे माजी संचालक व प्रख्यात नाटय़दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे भारूड महोत्सव आयोजित करीत असतात. नाथ षष्टीच्या सोहळ्यात भारूडेही सादर होणार आहेत. सांगली जिह्यातील खुजगाव येथे सोंगी रामायणाची परंपरा असून या सोंगी रामायणाचा आधार संत एकनाथांचे रामायण हाच आहे.
एकनाथषष्टीचा हा सोहळा महाराष्ट्रातील समस्त विठ्ठलप्रेमींसाठी आनंद सोहळा ठरत आहे. पैठणला संतपीठाचीही पार्श्वभूमी आहे. हे संतपीठ आणि हे पैठण म्हणजे संत संप्रदाय आणि लोकदैवत संप्रदाय यांचे माहेरघर ठरले आहे. नाथषष्टीचे हे गोल रिंगण औरंगपुरा येथेही आयोजित होत असल्याने नाथांच्या मराठवाडय़ाला भक्तीचे कोंदण जडविले जाणार आहे.
























































