हम ना तुम्हे  भुलाएंगे – सच्चा सुरांना सलाम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अभिजित भट्टाचार्य

लता मंगेशकर केवळ भारतरत्न नाहीत, तर त्या विश्वरत्न आहेत. हवा, नदी यांच्याप्रमाणेच लतादीदींचा आवाज सच्चा आहे. गाणारे खूपजण आहेत, पण लता मंगेशकर या एकमेवाद्वितीय आहेत. त्याकाळी रेडिओ होता, जो आज नाहीये. कॅसेट, रेकॉर्डस्, सीडी यांच्याबाबतीतदेखील असेच आहे, पण दीदींचा आवाज चिरकाल आहे… अमर आहे.

मला आजही पहिल्या भेटीचा तो दिवस आठवतोय. मुंबईत मी अगदी नवीन होतो. जेमतेम एक-दीड आठवडा झाला होता. त्यावेळी कानपूरच्या एका मित्राने सांगितले की, आज ताडदेवला एका स्टुडिओत लतादीदींच्या शोची रिहर्सल सुरू आहे. मी मित्राला म्हटलं,  मला तिथे घेऊन चल. तो म्हणाला, छे, छे! तुला घेऊन गेल्यावर मला बाहेर निघावं लागेल, एवढं सोपं नाही ते. तिथे दीदींच्या गाण्यांची रिहर्सल आहे आणि तुला नेणे तर शक्य नाही. मी पण मागे हटणारा नव्हतो. दीदींना आज भेटायचं असा निर्धारच केला होता. मी स्वतःच स्टुडिओ शोधून काढला आणि तिथे जायचं ठरवलं. त्या दिवशी जोरदार पाऊस सुरू होता. ताडदेवमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबलं होतं.  मुंबई सेंट्रल स्टेशनला उतरून मी पायी चालत स्टुडिओत पोहोचलो. चिंब भिजलो होतो. अंगावर नीट कपडेही नव्हते. स्टुडिओ छोटाच होता. तिथे काही निवडक संगीतकारांसोबत लतादीदींची रिहर्सल सुरू होती. मी स्टुडिओतून बाहेर आलेल्या एका माणसाला सांगितलं, मी कानपूरवरून आलोय, मी गाणं गातो. मला फक्त एकदा दीदींना भेटून नमस्कार करायचाय. अर्ध्या तासाने तोच माणूस स्टुडिओबाहेर आला. त्याला मी चिठ्ठी लिहून दिली. थोडय़ा वेळाने मला आत सोडण्यात आले. तिथे मी  उषा मंगेशकर यांना भेटलो. लतादीदी केबिनमध्ये होत्या. मी उषा मंगेशकर यांच्याकडे दीदींच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. मी  केबिनमध्ये गेलो. लतादीदींनी माझ्याकडे बघितलं. साक्षात सरस्वतीदर्शन मला घडलं.  मी वाकून दीदींना नमस्कार केला. त्यांनी आपुलकीने माझी चौकशी केली. तुम्ही काय करता, असं मला विचारलं. त्यावर मी म्हणालो,  गाणं गातो. प्रयत्न सुरू आहेत. एकदा पंचमदांना भेटता आलं तर बरं… दीदींनी माझ्याकडे बघितलं आणि लगेच हातात कागद पेन घेऊन लिहिलं… प्रिय पंचम, श्री. अभिजित भट्टाचार्य कानपूरवरून आले आहेत. गाणं गातात. एकदा तुम्ही त्यांचे गाणं ऐका.

सारंच स्वप्नवत वाटत होतं. नेमके काय होतंय सांगता येत नव्हतं.  तो 80 च्या दशकाचा काळ होता. दीदींना भेटण्यासाठी निर्मात्यांना वेळ घ्यावी लागायची. आणि मी… मी त्यांना चक्क भेटलो आणि त्यांनी माझ्यासाठी चिठ्ठीही दिली. निव्वळ अविश्वसनीय. पुढे पंचमदांना भेटेपर्यंत काही महिने गेले. त्यात ती चिठ्ठी कुठे गेली माहीत नाही. हाच किस्सा मी काही वर्षांनी एका कॉन्सर्टच्या रिहर्सलवेळी दीदींना सांगितला. साधारण 11 वर्षांनी. दीदींनी ऐकलं आणि त्या  हसल्या.

 लता मंगेशकर यांच्यासोबत देश-विदेशात अनेक स्टेज शो करण्याचे भाग्य मला लाभले. त्याकाळी ‘गाता रहे मेरा दिल’ आणि ‘कोरा कागज था ये मन मेरा ’ हे डय़ुएट मी त्यांच्यासोबत सादर करायचो. ‘कोरा कागज था ये मन मेरा’ या गाण्यापूर्वी एक आलाप आहे. या गाण्याच्या रिहर्सलवेळी संगीतकार अनिल मोहिले मला म्हणाले,  ‘या गाण्यांना छोटं करा. आलाप घेऊ नका. डायरेक्ट गाण्याला सुरुवात करा.’ दीदींनी ते ऐकलं आणि म्हणाल्या, या मुलाला पूर्ण गाऊ द्या.  आलापही  खूपच छान वाटतोय.  त्याकाळी लतादीदी चेन असलेला चष्मा घालायच्या. ज्या ज्या वेळी मी या गाण्याचा आलाप गायचो त्यावेळी चष्मा खाली करून त्या माझ्याकडे कौतुकाने बघायच्या. हे दृश्य मी कधीच विसरू शकत नाही.

पुढे मी त्यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकेसह विविध देशांच्या टूर केल्या. मी गर्वाने म्हणू शकतो, मला साक्षात सरस्वतीचे दर्शन झाले. या सरस्वतीच्या सहवासात संगीताची आराधना करण्याचे भाग्य माझ्या वाटय़ाला आले आहे. मी त्या गौरवशाली गायकांपैकी एक आहे, ज्यांना लतादीदींचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्यासोबत स्टेजवर गाण्याची आणि गाणी रेकार्ंडग करण्याची संधी मिळाली. खरोखरच माझ्यासारखा भाग्यवान मीच!

(लेखक प्रसिद्ध पार्श्वगायक आहेत.)