ठसा – माधव कोंडविलकर

>  दुर्गेश आखाडे

कथा, कादंबरी आणि आत्मकथनातून दलित, पीडित आणि उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना मांडणारे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या आत्मकथनाचे लेखक माधव कोंडविलकर यांचे नुकतेच निधन झाले. आत्मकथनाबरोबरच त्यांनी अनेक कादंबऱया आणि कथासंग्रह लिहिले आहेत.

माधव कोंडविलकर यांचा जन्म राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या खेडय़ात झाला. ते प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात दापोलीमधून सुरू झाली. पुढे राजापूर आणि देवरुखमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. ज्ञानदानाबरोबरच त्यांना वाचन आणि लेखनाची प्रचंड आवड होती. त्यावरूनच त्यांच्यातील साहित्यिक नावारुपाला आला. त्यांच्यावर भगवान बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. आणि त्यांच्या लेखनामध्येही त्याचेच प्रतिबिंब उमटत होते. त्यांनी दलित, कष्टकरी आणि श्रमिक वर्गाच्या वेदना आपल्या लेखनातून मांडल्या. कोकणातील दलित वर्गाची होरपळ माधव कोंडविलकरांच्या लेखनातून वाचायला मिळते. माधव कोंडविलकर यांनी अनुभवलेल्या प्रसंगातून मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन आकाराला आले. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे गाजलेले आत्मकथन बोलीभाषेतील रोजनिशीच्या स्वरुपात होते. 1979 साली तन्मय दिवाळी अंकात त्यांचे आत्मकथन पहिल्यांदा प्रसिद्ध झाले. त्यानंतर 1979 साली त्यांनी मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनाचे प्रकाशन केले. आणि त्यानंतर मराठी साहित्य क्षेत्राचे या आत्मकथनाने लक्ष वेधून घेतले. या आत्मकथनामध्ये माधव कोंडविलकरांनी कौटुंबिक दारिद्रय़, संघर्ष, भुकेचे आणि व्यावसायिक उपेक्षेचे तटस्थपणे लेखन केले आहे. एका शिक्षकाची सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरील घुसमट हा या आत्मकथनाचा विषय आहे. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या पुस्तकाचा फ्रेंच आणि हिंदी भाषेत अनुवाद झाला. या पुस्तकातील काही उतारे शाळा आणि महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले होते. कोंडविलकरांची साहित्यसंपदा आज वाचकांसाठी पुस्तकरुपाने उपलब्ध आहे. त्यामध्ये अजून उजाडायचे आहे, आता उजाडेल, एक होती कातळवाडी, डाळं, भूमिपुत्र, निर्मळ, हाताची घडी तोंडावर बोट हे कादंबरी लेखन, घालीन लोटांगण, स्वामी स्वरुपानंद, देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक, देवदासी ही पुस्तके आणि इटुकले राव आणि छान छान गोष्टी हे बालवाड्मय प्रसिद्ध आहे. रत्नागिरीच्या यशदा प्रकाशनने त्यांची देशोधडी ही कादंबरी प्रकाशित केली. त्या कादंबरीमध्ये गिरणीकामगारांची व्यथा मांडण्यात आली होती. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनानंतर माधव कोंडविलकरांनी त्याचा पुढचा भाग लिहिला. त्या भागाचे नाव होते कळा त्या काळच्या. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन लोकप्रिय ठरले. वाचकांकडून प्रचंड पसंती मिळाली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना उत्कृष्ट लेखक म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेने माधव कोंडविलकर यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवले.

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनाचे नाटय़लेखक कै. अविनाश फणसेकर यांनी नाटय़रुपांतरण केले. समर्थ रंगभूमीने या नाटय़प्रयोगाचे राज्य नाटय़स्पर्धेत सादरीकरण केले. या नाटकाला प्राथमिक फेरीत तिसरा क्रमांक मिळाला होता. माधव कोंडविलकर यांचे लेखन आणि वाचन याकडेच अधिक लक्ष असायचे. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी लेखन, वाचन सुरूच ठेवले होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. माधव कोंडविलकर यांनी मुक्काम पोस्ट देवाचे गोठणेचा निरोप घेताना एक मोठी साहित्य संपदा पुढच्या पिढीसाठी उपलब्ध केली आहे. त्या काळातील ग्रामीण, सामाजिक जीवनाबाबत माहिती देणारी, दलित कष्टकरी वर्गाच्या वेदना, व्यथा, कामगार वर्गाची होणारी होरपळ, गिरणी कामगारांचा संघर्ष अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांच्या साहित्य संपदेतून उपलब्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या