
>> अरुण मळेकर
‘खारफुटी’ ही सागरी किनार्याची तटबंदी असून तिचे रक्षण करणारी त्वचायुक्त कवचकुंडलेच आहेत. ‘खारफुटी’ सागरी लाटा, उधाण, वार्यापासून रक्षण करून जमिनीची धूपही रोखते. अतिसूक्ष्म कीटक, छोट्या प्रजातीचे मासे ते अजस्र मगरीपर्यंतचे विविध जैववैविध्य खारफुटी क्षेत्रात संचार करताना आढळतात.
मानवी जीवन समृद्धीबरोबर आरोग्यपूर्ण करण्यासाठी आपल्या सभोवतालचा अफाट निसर्गराजा आजही आम्हाला भरूभरून देतच असतो. त्याचे अनन्यसाधारण मोल हजारो वर्षांपूर्वी अज्ञात आर्यांनी मान्य करून पंचमहाभूतांतील परमेश्वराचे अस्तित्व मानले. त्यातील अनेक घटकांपैकी आपल्याला लाभलेला दर्याराजा म्हणजे ‘रत्नाकर’. निसर्गसृष्टीची मेहेरनजर लाभलेल्या आपल्या महाराष्ट्र भूमीला तर 720 कि.मी. लाबलंचक सागर किनारा लाभलाय.
सागर किनार्याची छोटेखानी खारफुटी वनस्पती म्हणजे जलचर प्राण्यांबरोबर मानवी जीवनालाही उपकारक ठरली आहे. सागराच्या सान्निध्यात नैसर्गिक प्रक्रियेनी संवर्धन होणारा रानझुडपांचा हा प्रकार आहे. समुद्रकिनार्यावर तसेच प्रामुख्याने खाडीकिनारी याची वाढ होताना आढळते. गोडय़ा पाण्याच्या जलस्रोताच्या सान्निध्यात नदीकाठीसुद्धा या वनस्पतीचे अल्प प्रमाण आढळते. इंग्लिशमध्ये तसेच शास्त्राrय परिभाषेत याला ‘‘मँग्रोव्हज्’’ (Mangroves) म्हणून संबोधले जाते… मूळ पोर्तुगीज शब्द ‘मॅन्ग्यू’ म्हणजे वृक्ष आणि इंग्लिश शब्द ‘ग्रोव्ह’ म्हणजे झुडुपांचा समूह. थोडक्यात ‘मॅन्ग्यु’ आणि ‘ग्रोव्ह’ या जोडशब्दावरून ‘मॅनग्रोव्ह’ शब्द तयार झाला. त्याचे मराठीत ‘‘खारफुटी’’ असे नामकरण होऊन कालांतराने या वनस्पतीच्या समूहाला ‘‘कांदळवन’’ नावानेही ओळखले जातेय.
समुद्राच्या खार्या पाण्याच्या प्रवाहात हीच वनस्पती हजारो वर्षे आपलं अस्तित्व टिकवून आहे. त्याची नैसर्गिक वाढ सागरी किनारा जमीन आणि समुद्राच्या हद्दीवर अगदी चिंचोळ्या परिक्षेत्रात होताना दिसते. खारफुटी फक्त सुरक्षित सागर किनारा, नद्यांच्या मुखाशीच आढळणार. खुले सागरी क्षेत्र, वालुकामय प्रदेश, खडकाळ किनार्यावर त्याची वाढ होत नाही. खारफुटीच्या वाढीसाठी पाणथळ क्षेत्र, डबके, चिखलाने व्यापलेल्या जागेची जरुरी आहे. खारफुटीची मुळं तळामध्ये साचलेल्या गाळापर्यंत घट्ट रुजलेली असतात. जगातील उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण प्रदेशात याची चांगल्या प्रकारे वाढ होते. म्हणूनच उत्तर दक्षिण अमेरिका, मध्यपूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत या वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. सागरी लाटा, अंतर्गत प्रवाहातील पोषक द्रव्य आणि साचलेल्या गाळामुळे खारफुटीची सातत्याने वाढ होते. हिंदुस्थानातील सागरी किनार्यावर सुमारे 35 प्रकारच्या तर महाराष्ट्राच्या किनार्यावर 20 प्रकारच्या खारफुटींची विविधता आहे. हिंदुस्थानी भूमीच्या किनारपट्टीचे सुमारे 7517 कि.मी. इतके विशाल क्षेत्र आहे. त्याच्या संरक्षण संवर्धनासाठी खारफुटी ही निसर्गनिर्मित यंत्रणाच आहे. क्षारयुक्त वातावरणात टिकाव धरण्याची नैसर्गिक क्षमता खारफुटीत असल्याने ते सागरी किनार्याचे रक्षकच झालेत. प. बंगालमधील ‘सुंदरबन’ म्हणजे खारफुटीसाठी जगातील सर्वात मोठे क्षेत्र असून त्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याने अभ्यासक तसेच पर्यटकांचे ते कायम आकर्षण ठरले आहे.
खारफुटीचे संशोधक, अभ्यासक, निसर्ग शास्त्रज्ञ यांच्या निष्कर्षानुसार सुमारे 10 कोटी वर्षांपूर्वीपासून ही वनस्पती आपले अस्तित्व इंडोनेशिया, मलेशिया भूमीवर सांभाळून होती. हिंदुस्थानात खारफुटीचे सर्वाधिक प्रमाण पूर्व किनार्यावर आढळते. आज वाढते शहरीकण, औद्योगिकीकरणाबरोबर अनेक विकासकामांच्या प्रकल्पांमुळे वन्यजीवांबरोबर वनसंपदेचा र्हास होताना दिसतोय. त्यात खारफुटी क्षेत्राचाही समावेश आहे. मुंबईसारख्या वाढत्या शहराला मध्यवर्ती ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-येऊर वनक्षेत्राचा परिसर म्हणजे शुद्ध हवा पुरवणार्या फुप्फुसाचं काम करताहेत. खारफुटी क्षेत्रही हे काम करतं. खारफुटी वाढत्या प्रदूषणयुक्त वातावरणातील प्रदूषके शोषून शुद्ध हवेचा पुरवठा करतात, त्यांच्या अस्तित्वाने वाढत्या तापमानाची तीक्रता कमी भासते आणि सागर किनार्याची होणारी धूपही थांबते.
खारफुटी ही किनारपट्टीची नैसर्गिक तटबंदी असून किनारा परिक्षेत्राचे रक्षण करणारी ही त्वचायुक्त कवचकुंडलेच आहेत. त्वचा मानवी शरीराचे संरक्षण करते तर खारफुटी सागरी लाटा, उधाण, वारा यापासून रक्षण करीत असते.
खारफुटीच्या क्षेत्रातील जागा ही छोट्या-मोठ्या माशांना प्रजननासाठी उपयुक्त वातावरण उपलब्ध करून त्यांची पैदास सातत्याने वाढवते. या सर्वांच्या अस्तित्वाने मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्याला खारफुटी आधारभूत ठरली आहे. रानावनात मुक्तपणे संचार करणारा वाघ हा प्राणी सुंदरबनसारख्या खारफुटीच्या क्षेत्रात मासे भक्षण करून आपली उपजीविका साध्य करतोय. खारफुटी क्षेत्रात रंगीबेरंगी फुलपाखरांचा नेत्रदीपक संचार तर मनोहारी आहे. ‘काजळा’ (River Mangroves) प्रकारच्या वनस्पतीच्या फुलांपासून खारफुटी क्षेत्रात मध तयार होण्याची प्रक्रिया अखंड चाललेली असते. खारफुटी क्षेत्राचे अन्य फायदे आहेतच. त्यातील काही मोठ्या वृक्षांचे लाकूड हे इमारत, जहाज बांधणीसाठी उपयुक्त आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे 750 कि.मी. सागरी किनार्यापैकी सुमारे 186 चौ.कि.मी. क्षेत्र अद्यापि खारफुटींनी व्यापलेले असून त्याचे अस्तित्व मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारी आढळते. शहरीकरण, वाढती विकासकामे, बेजबाबदार असंस्कृत नागरिक यांच्यामुळे आता खारफुटीच्या अस्तित्वाची पीछेहाट होतेय. जोडीला नवीन गृहप्रकल्प उभारणी आणि घरांचे नूतनीकरण करताना दगड, माती, चुनामिश्रित जे राबीट तयार होते ते सर्रास खारफुटीच्या क्षेत्रात टाकल्याने खारफुटीचे अस्तित्वच धोक्यात आलंय.
हा र्हास थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने 2012 मध्ये स्वतंत्र विभाग स्थापन करून ‘‘खारफुटी’’ संवर्धनासाठी प्रसार करण्याची संकल्पना निर्माण झाली. पण त्याचे अधिकारक्षेत्र अल्प असून मनुष्यबळही पुरेसे नाही. तरीसुद्धा सामाजिक जाणिवेने गोदरेजसारखे उद्योगसमूह आणि ‘पर्यावरण दक्षता मंच’ यासारख्या अशासकीय आस्थापनांचे चाललेले प्रयत्न खूपच आशादायी व दिशादर्शक आहेत.
खारफुटीचे संवर्धन करण्यासाठी जो कर्मचारी वर्ग आहे तो नुसताच प्रशिक्षित असून चालणारे नाही. त्यांना ‘खारफुटी’ संवर्धनासाठी ममत्व – आत्मीयता वाटायला हवी. (जसा ग्रंथपाल हा मुळात ग्रंथप्रेमी हवा). शाळा-महाविद्यालयात आता पर्यावरण विषयाचा अंतर्भाव आहे. त्याला प्रात्यक्षिकाची जोड देऊन वनखात्याच्या सहाय्याने वनपर्यटनांतर्गत खारफुटी क्षेत्राला शैक्षणिक सहली आयोजित केल्यास संस्कारक्षम विद्यार्थ्यांमार्फत खूप साध्य करण्यासारखे आहे. आता पर्यटनाच्या शाखा विस्तारताहेत. सामाजिक पर्यटनाबरोबर वनपर्यटनाचा एक भाग म्हणून पालकवर्गासह ज्येष्ठ नागरिकांच्या सहली खारफुटी क्षेत्रांसाठी आयोजित करून समाजमनावर चांगला परिणाम साधता येईल.





























































