वेब न्यूज – सूर्याचा मृत्यू

पृथ्वीवरील प्रत्येक जीव; मग तो मानव असो, जनावरे असोत वा वनस्पती; या सर्वांच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे तो म्हणजे सूर्य. धरतीवर सर्व प्राणिमात्रांबरोबर वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेसाठीदेखील सूर्य किती महत्त्वाची भूमिका निभावतो हे आपल्या सगळय़ांना ज्ञात आहे. सध्या हा सूर्य एका वेगळय़ा संशोधनामुळे चर्चेत आलेला आहे. संशोधकांनी सूर्याच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे आणि त्यामुळे सध्या सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. कधी आणि कसा होणार आहे सूर्याचा मृत्यू? त्यावेळी मानव अस्तित्वात असेल का? त्यावेळी पृथ्वी तरी अस्तित्वात असेल का? मुळात सूर्य निर्माण कसा झाला? प्रत्येक ताऱ्याची आयुर्मर्यादा ही निश्चित असते का? असे विविध प्रश्न या संशोधनाच्या प्रसिद्धीनंतर चर्चेत आलेले आहेत. संशोधकांच्या संशोधनानुसार सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी हीलियम आणि हायड्रोजनपासून बनलेल्या एका आण्विक ढगातून सूर्याची निर्मिती सुरू झाली. सूर्याजवळ असलेल्या एका सुपरनोव्हामधून अतिशय शक्तिशाली अशी शॉकवेव्ह उत्सर्जित झाली आणि तिच्या संपर्कात हा आण्विक ढग आला आणि त्या शक्तीने तो चार्ज झाला. या प्रक्रियेपासून सूर्याची उत्पत्ती झाली आहे असे संशोधकांचे मत आहे. मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2018 मध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सूर्यदेखील इतर 90 टक्के ताऱ्यांप्रमाणे आकसून जात पांढरा बटू तारा बनेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सूर्य अशा स्थितीत असेल तोपर्यंत पृथ्वीवर एकही माणूस उरणार नाही. पाच अब्ज वर्षांनंतर सूर्याचा मृत्यू होईल. सध्या सूर्याने त्याचे वय अर्धे ओलांडले आहे. अंतिम काळ जवळ येत असताना सूर्याचे लाल ताऱ्यात रूपांतर होईल, अशी आशा शास्त्र्ाज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सूर्याचा गाभा आकुंचन पावेल आणि या प्रक्रियेत सूर्याचे बाह्य स्तर आपल्या पृथ्वी या ग्रहाला घेरून मंगळाच्या कक्षेत पोहोचतील. याबरोबर संशोधक आता सूर्याच्या उत्पत्तीची निश्चित प्रक्रिया, त्याच्या ऊर्जेचे वय यावरदेखील संशोधन करत आहेत.