आभाळमाया : चंद्र आक्रसतोय?

>> वैश्विक (khagoldilip@gmail.com)

चंद्राविषयीच्या चार लेखांत त्याच्या ताज्या परिस्थितीची माहिती घेणं उचित ठरेल. चांद्रविजय झाल्यापासून संशोधकांना चंद्र नावाचा उपग्रह आपला सखा वाटू लागलाय. त्याची रोजची खबरबात अनेक प्रयोगांतून घेतली जाते. चंद्रावरचं विरळ वातावरण (पृथ्वीच्या एक-षष्ठांश) हीच पूर्वी कुतूहलाची गोष्ट होती. म्हणजे पृथ्वीवरची एक फूट उंचीची उडी चंद्रावर सहा फूट होईल. तिथे ‘हाय जम्प’चा खेळ आयोजित केला तर किमान सहा फुटांपेक्षा वर उडी घेणाऱयांची नोंद होईल.

चंद्राची आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे आपल्याला कायम त्याची एकच बाजू दिसते. याचं कारण म्हणजे त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ सारखाच किंवा ‘जिओसिक्रोनस’ आहे. साहजिकच चंद्र त्याचा अर्धाच चेहरा आपल्याला दाखवतो. त्याच्याच कला आपण प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वाढत जाताना आणि दुसऱ्या पंधरवड्यात कमी होत अमावास्येला तो ‘अदृश्य’ होताना अनुभवतो.

‘अमा’ म्हणजे एकत्र आणि ‘वसती’ म्हणजे राहणे. ज्या दिवशी चंद्र-सूर्य एकत्र राहतात याचाच अर्थ एकाच वेळी उगवतात आणि मावळतात ती रात्र चंद्रविरहित दिसते. चंद्र दिवसा  सूर्यतेजात दडलेला असल्याने दिसत नाही आणि सूर्याबरोबरच मावळतो. तो कुठेतरी ‘गायब’ होणं शक्य नसतं.

चंद्राबद्दलची माहिती दर्यावर्दी लोकांना पूर्वापार होती ती त्याच्यामुळे होणाऱ्या ‘तिथी’ आणि समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे. असं म्हटलं जातं की, चारेक अब्ज वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या कवेत आला आणि सागरी भरती-ओहोटीमुळे समुद्री जीव उक्रांत होत जमिनीवर आले. त्या जलचरातून उभयचर आणि मग पशू, पक्षी, माणसं निर्माण झाली. म्हणजे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या वर्धनात चंद्राचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.

चंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षा परस्परांना सुमारे पाच अंशांनी छेदतात. त्यामुळे चंद्र-पृथ्वी आणि सूर्य यांच्या ठराविक स्थितीवरून ग्रहणं घडतात. पृथ्वी चंद्राच्या चारपट मोठी आहे. ती सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध सरळ रेषेत येते तेव्हाच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागते. ते खग्रास चंद्रग्रहण असते. मात्र चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध सरळ रेषेत आला की, खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळते ते नेहमी अमावास्येलाच होते. चंद्र त्यावेळी पृथ्वीच्या किती जवळ आहे यावर ग्रहणाचा काळ ठरतो. चंद्राची गडद छाया पृथ्वीवरच्या ज्या भागात पडते त्याला ‘टोटॅलिटी पाथ’ किंवा खग्रास सूर्यग्रहण पट्टा म्हणतात. त्यावेळी तिथे गेल्यास सूर्याची ‘डायमंड रिंग’ आणि प्रभामंडळ (करोना) पाहायला मिळते.

एवम्गुणविशिष्ट चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर हळूहळू वाढतंय ते तसंच वाढत गेलं तर पृथ्वीवरून खग्रास सूर्यग्रहण न दिसता कंकणाकृती सूर्यग्रहणच दिसेल. असं का घडेल ते नंतर एखाद्या लेखात पाहू. कारण 26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण हिंदुस्थानातून 2010 नंतर पुन्हा एकदा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

आताची चंद्राविषयीची ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणजे तो आक्रसतोय. चंद्राच्या गाभ्यातील उष्णता कमी होत गेल्या दशकातसुद्धा तो आणखी थंड झाल्याने  रेझिनच्या कापडावर जशा सुरकुत्या दिसतात तशा चांद्रपृष्ठावर दिसू लागल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे चांद्रपृष्ठावर कपारी तयार होतायत. त्यांना ‘थ्रस्ट फॉल्ट’ असं म्हटलं जातं. हे असंच होत राहिलं तर चंद्र अधिकाधिक सुरकुतत जाईल.

वैज्ञानिक याची तुलना तजेलदार द्राक्षाच्या कालांतराने सुरकुतण्याशी करतात. मात्र द्राक्षासारखं सुरकतून चंद्राची काही ‘मनुका’ होणार नाही. चांद्रपृष्ठावरच्या भेगा मात्र वाढतील. चांद्रपृष्ठावरील हालचालींचा चांद्रकंपाचा ‘डेटा’ 1960 पासून ग्रथित करण्यात येत आहे. त्यातली तांत्रिक माहिती जरा किचकट असल्याने टाळलीय. नासाच्या ल्युनार रिकन्सेन्सस ऑर्बिटर’ने सन 2000 पासून जमा केलेल्या माहितीनुसार चंद्रावर प्लेट टॅक्टॉनिकसारखे म्हणजे त्यांच्या हालचालींचे परिणाम दिसत आहेत.

आपल्या पृथ्वीवरही प्लेट टॅक्ॊनॉनिक असून आपली वस्ती भूकंपाने काही वेळा हादरते ती या ‘प्लेट्स’च्या भूगर्भीय हालचालींमुळेच अर्थात चांद्र-प्लेट पृथ्वीइतक्या ‘ऑक्टिव्ह’ नाहीत. त्यामुळे तिथे विध्वंसक चांद्रकंप होत नाहीत. मात्र मूनक्वेक (चांद्रकंप) होतात. हीसुद्धा महत्त्वाची माहिती आहे.

उद्या चंद्रावर वसाहती करायचं ठरलं तर त्याच्या नैसर्गिक‘लहरी’चं पूर्ण ज्ञान आपल्याला असायला हवं. गेल्या पन्नास वर्षांत आपल्याला चंद्र बऱ्यापैकी समजला आहे. त्याच्या आपल्या दृष्टीने अंधाऱ्या भागातही चीनचं यान उतरलंय. एकूणच चंद्राचा सर्वार्थाने शोध घेऊन त्याला ‘चंदामामा’ बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील काव्यामध्ये त्याला हे स्थान पूर्वीच लाभले होते. आता विज्ञानातही मिळतंय.